वडिलास पत्र
वडिलास पत्र
तिर्थरुप दादा,
शि. सा. नमस्कार...
दादा मी तुमची ताई, उज्ज्वला अतीलाडोबा होते न हो. मला आठवतंय अजून तुम्ही शाळेत सोडवायला यायचा. आणायला यायचा. तुम्ही खूप काही पैसे कमवत नव्हता, पण मला कधीच काही कमी केले नाही. माझे त्या काळातही मध्यम परिस्थितीत अती लाड पुरवले. आणि मला उत्तम शिक्षण दिले. खाजगी शाळेत घातले. आई गावाला गेली की तुम्ही मला तिच्याबरोबर पाठवत नसत... का तर माझी ताई मला सोडून कुठे जाणार नाही. असे आनंदात बालपण घालवले. मोठी झाले लग्न अगदीच सतराव्या वर्षी लावून दिलेत. आनंद दुःख दोन्ही उपभोगत तुम्ही माझी पाठवणी केली. माझा संसार सुरू झाला. माझा वाढदिवस आजतागायत तुम्ही विसरला नव्हता. मी शाळेत सकाळीच जाते म्हणून मला गजरा, मिठाईचा बाॅक्स घेऊन सकाळीच हजर राहायचा... गेली बत्तीस वर्ष तुम्ही हे पाळले. तसेच माझ्या लग्नाचा वाढदिवसदेखील कधीच विसरला नाहीत.
तसेच नागपंचमी,संक्रांत या सणांना हक्काच्या बांगड्या माहेरच्याच. दिवाळीत साडी माहेरचीच. अजूनही तुम्ही हे करत होता... पण... २०/९/२०१७ ला माझे दादा देवाने हिरावून नेले माझ्यापासून. दादा तुम्ही या जगाचा निरोप घेतला आणि तुमची लेखणी मला बहाल करून गेलात...
दादा मी आज कविता करते. लेख लिहिते. हे पाहून तुम्ही खूप आनंदी झाला असता. हे सुख पाहायला नाहीत. पण नभातून तुम्ही माझ्यावर नक्कीच प्रेमवर्षाव करत असणार. कौतुक करत असणार.
आता तुमची उणीव नितीन, आई भरुन काढतात. पण तुम्ही ते तुम्हीच.
बाबा गेलास तू दूर निघूनी
आम्हास परके करूनी
आठवण तुझी येता
बसते मी उदासीन होवूनी...
दादा आठवण तुझी येता
डोळे भरून येतात माझे
कविता करू लागले दादा
कविता स्मृतीगंधात रूप तुझे...
तुमचीच लाडोबा ताई-उज्ज्वला...