Jyoti gosavi

Others

2.6  

Jyoti gosavi

Others

तुकाराम बीजेच्या निमित्ताने

तुकाराम बीजेच्या निमित्ताने

4 mins
58


हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा


संत तुकारामांचा हा अभंग मला अत्यंत आवडीचा आहे.त्यामध्ये परमेश्वराला ते पुनःपुन्हा जन्माला घालण्यास सांगतात, आणि हेच मागणे मागतात की, तुझा विसर कोणत्याही जन्मात पडू नये. बाकीचे सर्व साधुसंत मुमुक्षु हे मोक्ष मागतात ,देवाला जन्म-मरणाचा फेरा चुकविण्या याविषयी सांगतात. कित्येक लोक आपली तपसाधना व्रते वैकल्ये ही सर्व मोक्षप्राप्तीसाठी करत असताना ,संत तुकाराम मात्र देवा !तू मला  खुशाल जन्माला घाल . असे सांगतात .

बाकीचे साधुसंत गर्भ यातना नको म्हणतात.


"सहजे कोंडिले गर्भवासी"


 गर्भात असताना अतिशय यातना असतात.तेव्हा तो जन्माला येणारा जीव त्याला खाली डोके वर पाय करून त्या गर्भाच्या पाण्यामध्ये कोंडलेले असते. शुक्र आणि शोणिताचा पुतळा म्हणजे गर्भ , त्याच्यावरती रक्त आणि मासाचे लेपण आणि 72 हजार नाडयांनी बांधलेली मोळी म्हणजे तो जीव. त्यामुळे इतर सर्व संत किंवा सामान्य माणसे परमेश्वराकडे मुक्ती मागत असतात. 

असे म्हणतात प्रत्येक जीव गर्भामध्ये असताना "सोहम सोहम"असे म्हणतो म्हणजे मला यातून सोडव, या जन्म यात्रेतून सोडव .आणि बाहेर आल्यानंतर तो इतका स्वार्थी होतो की "कोहम कोहम" म्हणजे लहान मुलाचे "ट्याहा ट्याहा" किंवा "क्याहा क्याहा" म्हणजे मी केव्हा म्हणालो? मी केव्हा म्हणालो? असे म्हणतो. या पृथ्वीच्या वर जन्मल्यानंतर त्याला जगण्याचा मोह होतो ,अशा ठिकाणी मोहात न पडता संत तुकाराम पुन्हा पुन्हा परमेश्वराची भक्ति घडावी म्हणून जन्म वारंवार जन्मपंक्ती मागतात. 


    हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ।। गुण गाईन आवडी । हेचि माझी सर्व जोडी ।। नलगे मुक्ति धन संपदा । संतसंग देई सदा ।। तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हासी ।।


        हा अभंग आरती, भजन वा कीर्तनानंतर म्हटल्या जातो. शेकडो वेळा हा अभंग आम्ही आरतीनंतर म्हटलाही असेल, पण आमचे म्हणण्यात व तुकोबांचे म्हणण्यात खूप अंतर आहे. तुकोबा म्हणतात


    हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ।।


एक तर हे की स्मरण करीत असतो, तेव्हाच देवाचे स्मरण झालेले असते. त्या अन्य काळी आम्हाला विसरच पडलेला असतो. हा अभंग म्हणून आमचे देवाचे स्मरण करणेच हे सांगते की, स्मरणाचे काळापर्यंत आम्हाला देवाचे स्मरण नव्हतेच. आता स्मरण करत आहोत. संसाराचेच स्मरणात होतो. देवा आता तुझे स्मरण करत आहोत. पण आता विसर होऊ देऊ नकोस. पण देव कसा विसर पाडेल ? विसर तर संसारामुळे आम्हाला पडतो देवाचा. परंतु तुकोबारायांचे देव असा अविरत स्मरणात आहे की, त्याचे विस्मरणच होऊ नये. ही स्थिती मोडू नये व चुकूनही विसरच न व्हावा यासाठी तुकोबाराय देवाला विनंती करतात. तुकोबा व देव एकरुप झाले आहेत. अविस्मरणीय अशी स्थिती आहे तुकोबांची देवासोबत. जशी आमचे करिता देवाचे स्मरण ही घटना आहे, तशी तुकोबारायांसाठी विस्मरण ही घटना होऊ शकते म्हणून त्या शंकेतून ते देवाला त्याचा विसर न पडण्याचे दान मागतात. आमचे स्मरण म्हणजे वेळोवेळीचे दान मागणे आहे. रोजच विसर आहे व विसर न व्हावा म्हणणे आहे. देवाला त्याचा विसर न पडण्याचे आमचे दान मागणे मोठे विरोधाभासी आहे.     


गुण गाईन आवडी । हेचि माझी सर्व जोडी ।।


देव तर निर्गुण आहे. मग तुकोबा देवाचे गुण गाण्याची गोष्ट कशी करत आहेत ? देवाचे दोन्ही गुण आहेत. निर्गुण व सगुण. देवाचे ब्रह्नांडाचे निराकाराचे कार्य आहे व अवतार रुपाने सगुण कार्यही आहे. दोन्ही कार्याचे गुण आवडीने गाण्यात तुकोबांचा आनंद आहे. दुसरे ते म्हणत आहेत की, हिच माझी सर्व जोडी आहे. सर्व जे काही जोडलेले आहे ते तुझे गुण आहेत. आम्ही घरदार, साधन, सामुग्री, संपत्ती जोडलेली असते. तुकोबा म्हणतात, देवा, तुझे गुण गाण्याने जो आनंद मिळतो तिच माझी संपत्ती आहे. पुढे तुकोबा म्हणतात.


नलगे मुक्ति धन संपदा । संतसंग देई सदा ।।


मुक्ती का नको ? धन संपदा नको ठीक आहे. कारण धन संपत्ती आमच्यासाठी सुखाची आहे तर संतानी जाणले ती दुःखाचे मूळ आहे. पण सर्व भगवत भक्त तर मुक्तीचीच शुभकामना ठेवतात. मात्र मुक्त होण्यात तुकोबा जाणतात, मुक्ती झाली म्हणजे देवा आम्ही तुलाही मुकलो. तुझ्या स्वरुपाशी एकरुप झाल्यावर मी व तू हया दरम्यान चालणारा भक्तीचा आनंदच संपला. म्हणून मुक्ती नको संत संग दे. ज्यामुळे तुझ्या निर्गुण निराकार रुपासी जुळून मुक्त होण्यात जो आनंद मिळणार नाही तो संत संगाने मिळतो. म्हणून जन्मोजन्मी, गर्भवास सोसून तुझ्या सगुण भक्तीरसाचा आनंद आम्हाला घ्यायचा आहे.     तुका म्हणे गर्भवासी । सुखे घालावे आम्हासी ।।


गर्भवासातून तर आम्ही आलो, पण गर्भवासाची यातना आमच्या अनुभवात नाही. दुसर्‍या जीवाला गर्भवासात आम्ही आज विज्ञानाने निर्माण केलेल्या यंत्राव्दारे पाहू शकतो. तरी पण तो अनुभव आम्ही आठवू नाही शकत. अनुभव नाही सांगू शकत. कारण हा अनुभव देह बुध्दीने घेण्यास शरीरच पूर्ण नसते. मात्र चेतना तर तो भयंकर असा अनुभव घेते. गर्भ रुपाने आमची आईच्या उदरात स्थापना झाल्यापासून आमचा देह तेथे पूर्ण विकसीत होतो. गर्भाचे पोकळीत जार जळामध्ये शरीर तरंगत विकसीत होत असते. तेव्हा शरीर, मेंदु तो अनुभव आठविण्याचे अवस्थेतच नसतात. तेच जाराचे पाणी नाका,तोंडात, कानात डोळ्यात भरुन असते. जन्मानंतर आम्ही शरीराचे स्तरावरच जगतो. चेतनेच अनुभव मागे पडतात. दुसर्‍या रितीने आज आम्ही गर्भ सदृश्य वातावरणाची बाह्य व्यवस्था करु शकतो. काही ध्यान मार्गामध्ये अशी गर्भ वातावरणाची बाह्य कृत्रिम व्यवस्था करुन गर्भावस्थेच्या ध्यान विधी साधकांकडून करवून घेतल्या जातात. या ध्यान विधीशिवाय आम्हाला तशा कृत्रिम गर्भाशयाची तशीच सजल व्यवस्था केली व शिक्षा म्हणून नऊ महिने ठेवतो म्हटले तर कुणी राजी होणार नाही. ही देवाची माया आहे की नऊ महिन्याचा कारावासाहून भयंकर असा गर्भवास माणसाचे स्मरणात उतरत नाही. म्हणून तुकोबा म्हणतात, इतका भयंकर गर्भवासही सुखे स्विकारु जर संत संग मिळत असेल. कारण संत संग हा पर्यायाने विठ्ठलाचा संग आहे. संत म्हणजे ते संत जे निष्काम झाले सर्व कर्मात. ज्यांनी जाणले विठ्ठलाला, पावले विठ्ठलाला, जे विठ्ठल रुपच झाले. त्यांचे भेटणे, त्यांचा संग हा विठ्ठलाचा संग आहे.


Rate this content
Log in