तो रेल्वे प्रवास...
तो रेल्वे प्रवास...


माझा जिल्हा मागास जिल्हा म्हणून ओळख असणारा जिल्हा. परंतु मनाने समृद्ध असणारी माणसं माझ्या जिल्ह्यामध्ये आहेत. शहराच्या नावाने माझ्या गावाशेजारी नुकतेच रेल्वे स्टेशन झाले होते. आता गावाला रेल्वे येणार होती. पंढरपूरसारखे तीर्थक्षेत्र जवळच असल्याकारणाने या रेल्वे स्टेशनवरून बऱ्यापैकी गर्दी जमणारी होती. आसपासच्या गावातून खेड्यातून आणि तालुक्यातून याच ठिकाणी लोक रेल्वेने प्रवास करण्यासाठी येत होते. परंतु रेल्वेचे तिकीट कोठे काढायचे, कोणता डबा जनरल आहे किंवा कोणत्या डब्यामध्ये बसायचे याचे पुरेसे ज्ञान या भागातील लोकांना नसल्याकारणाने अनेक गमतीजमती घडताना दिसत होत्या.
वास्तविक रेल्वेने प्रवास करण्याचा कधी संबंध नसल्याकारणाने शहाणे आणि सुशिक्षित माणसालादेखील रेल्वेने प्रवास करताना अनेक अडचणी निर्माण होतात. स्टेशनवर पोहोचल्यानंतर पहिले दृश्य मनसोक्त हसण्यासारखे दिसून आले. कारण येणाऱ्या वाहनाला आपण हात दाखवून जसे थांबवतो त्याप्रमाणे येणाऱ्या रेल्वेलादेखील हात करून थांबवणारी काही माणसे दिसून आली. इंजिनबरोबर धावत पुढे जाणारी काही माणसे, तर कोणत्याही डब्यात रिकाम्या जागेवर बसणारी काही माणसे. टीसीलाही न आवरणारी काही माणसं. खरंच गमंत असते कधीकधी अशा वेळी प्रवास करताना, जागा मिळावी म्हणून काही लोक चक्क खिडकीमधून आत जात होते. आत गेलेले जवळ असेल ती वस्तू सीटवर टाकून जागा धरत होते. इरसाल मराठीत कोण कोणाला भांडत होते. एकमेकांचे बाप काढून भांडत होते. दोन महिला तर फारच हातघाईवर आल्या होत्या, निमित्त होते खिडकी चालू ठेवणे आणि बंद करणे. शब्दांची तुंबळ फेकाफेकी झाली आणि कोणी शहाणा ते भांडण मिटवण्यासाठी मध्यस्थी झाला. त्यालाच शहाणपण शिकवू नको म्हणून एकीने गप्प केले.
गाडी एव्हाना सुरुही झाली होती. पण बसण्यासाठीची धडपड आणि रेटारेटी काही संपत नव्हती. आणि त्यात त्या दोघींच्या भांडणाचा मनमुराद आनंद घेणारे खूपच तल्लीन होवून त्यांच्या अलंकारीक शिव्या ऐकत होते. एका मध्यस्थ्याला गप्प केल्यामुळे दुसरे कोणी त्या दोघींचे भांडण मिटवण्यासाठी धाडस करताना दिसेना. मोसम कट होवून थोड्या वेळाने भांडणाला उतरती कळा लागताच एका वयस्काने मध्येच हस्तक्षेप करून हात जोडत विनंती केली आणि भांडणाचे नेमके कारण विचारले. तर आपल्या नवऱ्याच्या मालकीचा डबा असल्यागत ती म्हणाली, 'मला गरम होतंय म्हणून खिडकी उघडी राहू दे म्हणते.' तर हिला गार लागतंय म्हणून ही खिडकी बंद कर म्हणतेय... आता मला सांगा, 'गरम होतय की गार लागतंय..?' त्या मध्यस्थी वयस्काने परत हात जोडले आणि सांगितलं बायांनो अगं खिडकी बंद पण होणार नाही आणि उघडी पण राहणार नाही... कारण तिला काचच नाही. तिची काच फुटली आहे. तेव्हा त्या दोघी एकमेकींकडं बघत गालात हासल्या. पण डब्यातील सर्व मंडळी जोरदार आणि दिलखुलास हसली.. !
पुढच्या स्टेशनवर गाडी थांबली. तेवढयात वडापाव, चहा, भेळ व इतर फेरीवाले एकच गोंगाट करत डब्यात शिरले आणि डब्यातील बहुतेक जण घरून उपाशीपोटी निघाले असावेत, अशा पद्धतीने खाद्यपदार्थ खायला घेत होते. गाडीने शिट्टी वाजवली आणि गाडी पुढे निघाली. उतरणारे झटपट उतरून गेले. त्यात फेरीवाले पण होते आणि चढणारे पटकन चढून वर आले. त्या वर आलेल्यांमध्ये टाळ्या वाजवत दोन तृतीयपंथी भडक मेकअप करून डब्यामध्ये शिरले. प्रत्येकाच्या समोर जाऊन टाळ्या वाजवत ते पैसे मागत होते आपल्या घरच्यांच्या बरोबर आलेल्या काही मंडळींना या तृतीयपंथीयांची दहशत आणि लाज वाटत होती. भीतीपोटी त्यांनी पैसे मागण्याअगोदरच खिशातून नोट काढून त्याच्यासमोर धरली जात होती. बघताबघता संपूर्ण हात नोटांनी गच्च भरला होता त्या तृतीयपंथीयांचा. काही तरुणांपुढे पैसे मागत असताना विचित्र अंगविक्षेप करून आणि अश्लील शब्दाचा वापर करून पैसे काढून घेण्यामध्ये हे पटाईत होते. नेमके त्याच गोष्टीचा स्वतःची इमेज सांभाळणाऱ्याला धसका होता आणि त्यामुळे निमूटपणे खिशातून पैसे काढून त्यांच्यासमोर धरले जात होते. बघताबघता हजारो रुपयांची कमाई करून ते निघूनही गेले.
तेवढ्या वेळात एक अपंग डबा स्वच्छ करत पुढेपुढे जात होता. हातामध्ये एक झाडू होता. संपूर्ण डब्बा तो स्वच्छ करत पुढे पुढे निघाला असताना प्रत्येकाच्या पुढे हात करत होता गुडघ्यावर रांगत निघालेला हा अपंग बघून आणि त्याची स्वच्छतेची मोहीम पाहून प्रत्येकाला त्याची कीव येत होती. कोणी पाच कोणी दहा रुपये त्याच्या हातामध्ये देत होते. अंगावर असणाऱ्या फाटक्या सदऱ्याच्या खिशामध्ये तो पैसे टाकत डबा स्वच्छ करत निघाला होता. पुढचे स्टेशन आले तेव्हा एक आश्चर्याचा धक्का बसला. जेव्हा तो डब्यातून खाली उतरला नि ताड ताड ताड चालू लागला. न तो अपंग होता न मुका होता. त्याबद्दल खरंच माहिती असल्यासारखे एकाने लगेच सांगायला सुरुवात केली की अशी माणसं फसवी असतात. आता मिळालेल्या पैशाची तो दारू ढोसणार आणि निवांत दिवस घालवणार. अशी माहिती समोरच्याकडून कळाली परंतु या गोष्टीने असे घडू शकते, की खरोखरच एखादा विकलांग असेल तर त्याला प्रामाणिकपणे कोणी मदत करणार नाही.
काय ही विचित्र दुनिया आहे, असा विचार डोक्यात घोळत असतानाच फरशीचेचे दोन तुकडे एकावर एक आपटत संगीत म्हणून त्याचा वापर करत अंध आणि त्याला सोबत घेऊन दुसरी मुलगी सुंदर गोड गळ्यामध्ये गाणी गात डब्यामध्ये शिरली. खरं पाहिलं तर रेल्वेचा डबा आणि तोही जनरलचा निव्वळ कमाईसाठीचा डब्बा आहे की काय असे वाटू लागले. कारण एकापाठोपाठ एक कमाई करून घेऊन जाणारे अनेक जण या डब्यामध्ये शिरलेले पाहिले आणि कमाई करून घेऊन गेलेले पाहिले. परंतु का कुणास ठाऊक या अंधांकडे पाहून थोडीशी कणव निर्माण झाली. ती छोटी मुलगी आपलं भवितव्य घेऊन स्टेशनवर या डब्यातून फिरत होती. सुंदर आणि गोड आवाजामध्ये लोकांचे गाण्यातून मनोरंजन करत होती. फरश्यांचे दोन तुकडे संगीत म्हणून त्या गाण्याला साथ देत होते. गीताचे बोल मागेपुढे होत असले तरीसुद्धा श्रवणीय असेच त्यांचे गाणे होते. भारतीय समाजामध्ये कशाप्रकारचे लोक असतात किंवा आहेत याबाबत थोडासा विचार करत मी राहिलो. खरंच किती विचित्र प्रकारचे नमुने आपल्याला या साध्या प्रवासामध्ये पाहायला मिळतात. कितीतरी ठग असतात. तसेच गरजूदेखील असतात. परंतु विश्वसनीय गोष्टीपेक्षा बेभरवशाच्या गोष्टी अधिक असतात हे मात्र यातून लक्षात आले. मीही माझ्या खिशातील काही रक्कम खर्च केली होती. अर्थात ती सार्थ होती किंवा नाही हे देव जाणे. कारण मी देताना ती प्रामाणिकपणे आणि चांगल्या भावनेने दिलेली होती. त्यांनी मला ठकवले, की चुकीच्या लोकांना मदत करून मी ठकलो, याचा फार काळ विचार करायला मला उसंत नव्हती कारण मला उतरायचे स्टेशन आले होते. मी डब्यातील सर्व गोष्टी स्टेशनवर सोडल्या आणि मी माझ्या कामासाठी निघून गेलो.