Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!
Exclusive FREE session on RIG VEDA for you, Register now!

Hanamant Padwal

Others


3  

Hanamant Padwal

Others


काथवट

काथवट

2 mins 876 2 mins 876

रखमा काकू माझ्या वडिलाची चुलती, मोलमजुरी करणारी आणि कष्टात जगणारी. त्या दिवसाची आठवण आजसुद्धा पुन्हा परत त्या काळात घेऊन जाते. जातीवंत धंदा नसताना सुतारकामात तरबेज असणारे वडीलांचे चुलते. आम्ही त्यांना आप्पा म्हणायचो आणि चुलतीला काकू. आप्पा-काकू दोघांचा संसार भांडत तंडत चालू होता. मी तेव्हा लहान होतो, पण त्यांच्यात लुडबूड करत होतो. त्यांची भांडणं मजेशीर वाटायची, ती चालूच रहावी असं वाटायचं. कारण आप्पा भांडणात हसण्यासरखी वाक्ये वापरायचे. त्यांच्या अशा वाक्यावर काकूंचा खमंग शेरा असायचा अन् हसत हासवत भांडणाचा शेवट व्हायचा. बरेच दिवस आम्ही ज्यांना पाहिलंही नाही असे जगन्नाथभाऊ हे आप्पा-काकूचे सुपुत्र. फार दिवसांपासून कोणाचीही व कसलीही तमा न बाळगता बाहेरगावी अज्ञातस्थळी खपत होते. त्यांच्या कर्तृत्वाचे कारनामे अनेकांकडून ऐकायला मिळायचे.


आप्पा आणि काकू थकलेले जीव पण जगण्याची लढाई आधाराशिवाय लढत होते. आम्ही जवळच होतो पण पोटचे मूल मात्र कुठं होतं, काय करतंय याची काही कल्पना नव्हती. काकू दिवसदिवस शेतावर कामाला जायची. कधी याच्या तर कधी त्याच्या. सव्वा रुपया रोजगार मिळायचा दिवसभर केलेल्या कामाचा. चुलीवर हिरवी मिरची घालून केलेली डाळीची आमटी, काकूसोबत दुपारचं जेवण घेऊन गेल्यानंतर शिल्लक राहायची. मला ती आमटी कोणत्याही पक्वान्नापेक्षा जबर आवडायची. मी त्या आमटीवर दुपारी ताव मारत असे. रात्री काकू आल्यावर आमटीच्या तवलीला बघून काय प्रतिक्रिया देते याकडे माझे लक्ष असायचं. काकू कुत्र्या-मांजरांना आमटी फस्त केली म्हणून जबाबदार धरुन दोन-चार गावरान शिव्या हसाडायची. तवा मला मजा यायची. मी थोडावेळ गप्प राहून परत काकूला सांगायचो. त्यानंतरची काकूची प्रतिक्रिया आमटीसारखीच चवदार असायची.

रात्री कामाहून येणारी काकू थकलेली असेल हा आपला समज होता हे तिच्या बोलण्यातून व रात्रीच्या स्वयंपाकातील हालचालींतून लक्षात यायचे. काथवटीत भाकरी करतानाचा आवाज आणि तव्यावर चेंडूसारखी फुगणारी भाकरी बघून चुलीच्या ऊबीला बसून खावी वाटावी यात नवल ते काय? आज माळयावर जुन्या सामानात काथवट दिसल्यानंतर आठवणीचे हे एकएक पदर उकलत गेले. आजच्या युगात लोप पावत चाललेले शब्द आणि लोप पावलेल्या वस्तू येणाऱ्या पिढीला कशा कळणार... माझी काकू असो वा माझी आई... काथवटीशी असणारं त्यांचं नातं नि आम्ही घेतलेला अनुभव नैसर्गिक तर होताच पण जगणंसुध्दा जिवंतपणा टिकवून होते. चुलीतील हारावर लालसर तापलेले दूध, लसूण घालून मिरचीचा केलेला ठेचा अगर आविल्यावरल्या चिटकीत शिजणाऱ्या डाळीत लाल तिखट कच्चे तेल टाकून रात्रीची मुद्दाम उरवून ठेवलेली भाकरी खाण्यात जो आनंद होता तो आज पंचतारांकीतमध्येही येत नाही. पण हा अनुभव केवळ सांगण्यापुरताच राहिला आहे. असो. मी सांगत राहीन आणि शेवटपर्यंत मनात जपत राहीन चूल, तवली, आवेलं, निखारा नि बरंच काही आणि काथवट..!


Rate this content
Log in