आजी आजोबा
आजी आजोबा
मला ही हवे आहेत आजी आजोबा
जमाना बदलला याला बरीच वर्षे झाली.आजच्या जमानात वावरणाऱ्याला कदाचीत माहित नसेल की पन्नास साठ लोकांचंही कुटुंब असतं. आणि ही सर्व माणसं एका मोठया वाडयात राहात होती. पण होय हे खरं आहे आणि हा खरेपणा पटवून दयावा लागतोय आज. नवरा बायको आणि दोन मुलं असा आजचा संसार आहे. लाखो रुपये देऊन घर घ्यायचं आणि दिवसभर त्याला कुलूप लावायचं. आणि स्वतः पैसे कमवण्यासाठी दिवसभर घराबाहेर रायचं.मुलांना पाळणाघर नावाच्या कोंडवाडयात डांबून, आई वडिलांना वृद्धाश्रमात सोडायचं .ही आजच्या जमान्याची संस्कृती आहे. संस्काराचे स्त्रोत म्हणून आजी आजोबा असायचे तो स्त्रोत कायमचा बंद होऊन आजी आजोबा ही प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर असताना कोणी जर म्हणत असेल की ,'मला ही आजी आजोबा हवे आहेत.' तर ही हाळी आज काळजाचा ठाव घेणारी आहे.
कोण्या नशिबवानाच्या घरी आजी आजोबा होते. आणि त्यानेच आपल्या बालसवंगड्याना त्यांच्या असण्यानं घरात नांदणारं चैतन्य सांगितलं. त्या आजी आजोबांचा बळहिन थरथरणारा देह पण कनखर आणि जुन्या काळात रुतून बसलेला अनुभव टीव्ही नावाच्या खेळण्यापुढं रममान होणाऱ्या बालकांना नवलाईचा वाटल्यावाचून राहणार नाही.आजी आजोबा कडून ऐकायला मिळणाऱ्या गोड गोड गोष्टी टीव्हीवरील कार्टून पेक्षाही मनात उतरणाऱ्या वाटू लागल्या आणि कोणत्याही बडबड गीताला मागे सारणारं आजीचं गाणं ओठावर नाचू लागलं. टू रुम्स किचन आता लहान वाटू लागलं कारण घरात माणसांची संख्या वाढून सहा वर गेली होती. कारण आता आजी आजोबा घरीच राहायला आली होती. मी जरी लहान पण माझ्याहूनही आजोबा लहान होऊन घोडा घोडा खेळ खेळतोय आम्ही. त्यामुळं आता आमचा फ्लॅट... नाही नाही आमचं घर लहान वाटायला लागलय. आम्ही आता मोठ्या घरात जाणार कारण आता माझ्याही आईबाबाचं मन बदललय आणि आजी आजोबांनी त्यांच्याही मनात घर केलंय. ही सारी कथा एका लहानग्यानं दुसऱ्या लहानग्याला ऐकवली होती, आजी आजोबा असतात आणि त्यांच्या सोबतीत किती मज्जा असते याची खात्री पटली होती. शाळेतून घरी जाता सारं विसरुन तो गेला आणि फक्त एकच गोष्ट ध्यानामधे ठेवून आईबापाला म्हणाला, " मला ही आजी आजोबा हवेत. "