Hanamant Padwal

Others

3  

Hanamant Padwal

Others

पोरांच्या बापानी तर नक्की वाचा

पोरांच्या बापानी तर नक्की वाचा

4 mins
812


   पोरांच्या बापानी तर नक्की वाचावे...


    माझ्या मनी प्रियाची तार छेडिते

    संसार मांडिते....

लग्न सोहळ्यात सुंदर आणि सुरेल आवाजात संगीत मैफिल गीत गाऊन लोकांची मने वातावरणात एकरुप करत होती. पण माझ्या मनात वधू आणि वधुपिता बद्दल विचारचं काहूर माजलं होतं अनेक मान्यवर मंडळी लग्नाला येत होती त्यांच्या स्वागताची तयारीही झालेली होती. अनेक नामोल्लेख करून त्यांना रिझवण्याचा प्रयत्न केला जात होता. सायंकाळच्या लग्नाचा आगळावेगळाच थाट बँड बाजा, रोषणाई सारं काही नेत्रदीपक होते. सहा महिन्यापासून लग्नाची तयारी दोन्ही घरांमध्ये सुरू होती.सर्व सोपस्कर पूर्ण केल्यानंतरही काही त्रुटी शिल्लक राहत असतात. परंतु या लग्नामध्ये जी घटना घडली ती थोडीशी मनाला चटका लावून जाणारी वाटली. पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले वधु वर आणि सुशिक्षित घराण्यात जुळलेले हे विवाह बंधन आज वेगळ्याच वळणावर येऊन थांबले होते.

विचाराला कृतीची जोड नसताना त्या विचाराला अर्थच राहत नाही. लग्न जुळवताना होणारी सर्व बोलणी देवानघेवान सर्व काही ठाकठीक झाले होते.दोघांच्या पसंतीही झालेल्या होत्या तीन दिवसांवर लग्न आले असताना अचानक वरपित्याने मुलगा लग्नास तयार नाही ही गोष्ट वधू पित्याच्या कानावर घातली.आणि सर्व नूर पालटून गेला. ऐकणाऱ्यांचे अवसान गळून गेले. प्रत्यक्ष त्या मुलीचे आणि त्या मुलीच्या पित्याचे, आणि घरच्यांची काय परिस्थिती झाली असेल याचा कधी कोणी काय विचार केला असेल किंवा नाही.ज्याना मुलगा आहे अशांना अशा पद्धतीने वागण्याचा जणू काही परवाना आहे की काय? वधूपित्यांच्या भावनेचा व त्या वधूच्या भावनेचा कोणी विचार करेल का काय ? काय पहाड कोसळला असेल त्यांच्यावर, किती वेदना झाल्या असतील.अनिष्ट परंपरेच्या विरुद्ध कोणी आवाज उठवणार,कधी आवाज उठवणार का या परंपरा कायम स्वरूपी चालतच राहणार .मुलीला जन्म देताना हजार वेळा विचार करावा अशी परिस्थिती निर्माण होत असताना देखील अशा घटना घडत आहेत.शेवटी मुलगी असणं हे पाप आणि मुलाला जन्म देऊन मुलाचा बाप होणं ही घमेंड म्हणावी का...? या पद्धतीचं वागणं किती योग्य आहे .जिवाचा आकांत करून वधूपित्याने सर्व तयारी केलेली असताना ऐनवेळी असा बदल किंवा असे वागणे त्यांना कसे शोभून दिसते. पण हे घडलं. मुलगी म्हणून जन्माला आल्यापासूनच नव्हे जन्माला येण्याआधी पासूनच किती समायोजन तिला करावं लागतं. तिच्या पातळीवर जाऊन कोणी विचार करतं की नाही. लग्नामध्ये वधू पित्याकडून हवं ते मागून घेऊन वरदक्षिणा या गोंडस नावात गुंडाळून अक्षरशः वधू पित्याला लुटलं जातं. यात काय मोठेपणा किंवा पुरुषत्व आहे. या घेतलेल्या वस्तू ,गोष्टी, पैसा जन्माला पुरतो का..?पण हे सर्रास घडते आहे. सौंदर्याची खाण असणाऱ्या रुपवतिच्या नशिबी अशा परिस्थितीला तोंड देण्याची वेळ येत असेल तर गरीब आणि रुपवती नसणाऱ्या मुलींची अवस्था काय असेल...? मुलगा म्हणजे मोठे धन आहे, मुलगा म्हणजे वंशाचा दिवा आहे ,मुलगा म्हणजे एक मोठीच जबाबदारी आहे ,मुलगा म्हणजे वरचढ बाजू आहे ,मुलगा म्हणजे सर्वकाही आहे. या भावनेने मुलांचे वडील वागताना दिसतात ही गोष्ट मी अत्यंत जबाबदारीने याठिकाणी प्रस्तुत करू इच्छितो मी सरसकट सर्वच मुलांच्या पित्यासाठी ही गोष्ट नक्कीच वापरत नाही. समाजभान असणारे काही पालक, काही मुले देखील आहेत त्यांचे तोंडभरून कौतुक केल्यावाचून राहणार नाही.परंतु काही कीड या समाजामध्ये नक्कीच आहे. हे मात्र विसरता येत नाही.किंवा दुर्लक्षित करता येत नाही. बदलत्या काळाप्रमाणे आपणही बदलले पाहिजे आणि आता मात्र मुलींसाठी किंवा मुलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे अत्यंत गरजेचे आहे कर्तव्याची जाण असणाऱ्या आजच्या मुलींचा वावर सर्वच क्षेत्रांमध्ये झपाट्याने होत आहे त्यांच्या कर्तुत्वाकडे उघड्या डोळ्यांनी पाहण्याची आवश्यकता आहे. परंतु परंपरा आणि अनिष्ट परंपरा यामध्ये गुरफटलेल्या समाजामध्ये काही प्रजाती निश्चितच आहेत त्यांनीदेखील बदलण्याचा आणि विचार करण्याचा पायंडा पाडून घेतला पाहिजे.

बोहल्यावर चढण्याआधी मनामधी किती रंगीबेरंगी स्वप्न सजवलेली असतात. कल्पनांचं काहूर काबूत ठेवून रात्र रात्रसजावट चालते ना त्या काळात. पण या साऱ्या गोष्टीला वादळाचा तडाखा बसावा आणि सारंच नस्तानाभूत व्हावं. अशी अवस्था मुलांच्या कांही अविचारी निर्णयाने होत असते. पण बळी पडते ती मुलगी. काय दोष त्या बिचारीचा ठरलेले लग्न मोडले जाते, केवळ मुलाच्या नकारामुळे आणि फक्त तीन दिवसात दुसऱ्या एखादया मुलाला वर म्हणून स्विकारायची नामुष्की त्या भाबडीवर येते. इथेही समायोजन तिलाच करावे लागते. बेलगाम झालेल्या मुलांना आवरताना बापाची त्रेधा होतेय. सुशिक्षित म्हणवून घेणारी मुले संस्कारहिन वर्तणूक कशी काय ठेवू शकतात. दुसऱ्याचे मन, अंतकरण जाणून घेण्याची त्यांची प्रवृती केव्हा निर्माण होईल. आईबापही आपल्या मुलांना अशा संस्काराचं बाळकडू कधी पाजतील. पोटी मुलगा आहे याचा अभिमान वाटत असेल तर तो संस्कारी मुलगा आहे असे वर्तन ठेऊन अभिमान द्विगुणीत करावा. पण निव्वळ मुलगा आहे म्हणून विकृत विचारांचं पोषण करत राहणं विघातक आहे. संपूर्ण आयुष्याची जोडणी विवाह संस्कारातून होत असते. पण त्याकडे निव्वळ खेळाप्रमाणे पाहणे म्हणजे आयुष्याचा बट्टया बोळ करणे नव्हे काय. भारतीय संस्कृती ज्या मूलभूत विचारधारेवर आधारीत आहे. तेच विचार नाकारण्याची प्रवृती म्हणजे आपली संस्कृती नाकारणेच नव्हे काय. मुलींचा सन्मान करा ही शिकवण्याची गोष्ट नसून ती जन्मताच रक्तात उतरण्याची गोष्ट आहे. मुलींचा सन्मान होत नसेल त्याच्याकडून स्वतःच्या आईचाही सन्मान होत नाही हे लपलेले सत्य आहे. म्हणून आता फक्त आत्मपरिक्षणाची वेळ आली आहे.

      


Rate this content
Log in