ती आणि तिचा दिवस
ती आणि तिचा दिवस
आजचा दिवस तिचा होता, खास तिच्यासाठी होता. आज प्रत्येक जण तिला काही ना काही उपाधी देत होते. कोणी दुर्गा म्हणत होते, कोणी लक्ष्मी म्हणत होते, कोणी अन्नपूर्णा म्हणत होते तर कोणी कालीमाता म्हणत होते. शिवाय ती रोजच्याप्रमाणे ताई, माई, आई कुणाची काकी, कुणाची मामी, कुणाची आत्या, होतीच.
आज तिला देव्हाऱ्यात बसवायची जणू काही चढाओढ लागली होती. कुठे शाळेतले विद्यार्थी तिला फुले देऊन "हॅपी वुमन्स डे" म्हणत होते. कुठे तिचे रुग्ण तिच्या रोजच्या सेवेबद्दल तिला मानवंदना देत होते. कुठे कुठे ऑफिसमधील बॉस तिला शुभेच्छा देत होता. कुठे घरांमध्ये देखील मुलांनी गुलाब दिला. आज तिच्या निमित्त जागोजागी खास कार्यक्रम ठेवले होते. कुठे बाईक रॅली, कुठे सत्कार समारंभ, कुठे महिलांसाठी खास खेळ, कुठे पैठणीचा कार्यक्रम दिवसभर तिला अगदी भरून आलं होतं. छे! भरून कसलं ती तर गुदमरून गेली होती. कारण स्वतःबद्दल एवढं चांगलं चांगलं ऐकायचं, कोणीतरी भरभरून कौतुक करायचं याची सवयच नव्हती.
तिला आजपर्यंत वर्षभर,
आई डबा!
अगं माझे शूज कुठे आहेत?
मॅडम तुम्ही रोजच काहीतरी कारण देऊन उशिरा येता!
काय मेलं नोकरीच कौतुक! आ
म्हीपण नोकऱ्या करून, घरदार सांभाळलं आणि सारे सणवार देखील केलेत हो!
हे असंच रोजच ऐकायची सवय, जरा चुकल्यासारखं झालं. संध्याकाळी घरात येताना तरीपण ती दबकत दबकत घरात आली. कारण आज अख्खा दिवस ती बाहेर उंडारली होती. तरीपण मनामध्ये खुशीचे मोर थुई थुई नाचत होते. आपल्याबद्दल कोण काय काय बोललं, कसा कोणी सत्कार केला, वगैरे वगैरे ते आठवत आठवत तिने घरात पाऊल टाकलं आणि रोजचा चिरपरिचित आवाज जेव्हा कानावर आला,
बस झाली आता दिवसभराची वुमन्स डे ची कौतुक! उद्या कामावर जायचे ना? सकाळपासून घरभर पसारा पडलाय तो कोणी आवरायचा? आज-काल यांना फारच डोक्यावर बसवलंय. काय तर म्हणे वुमन्स डे! अहो कशाला पाहिजे नसती थेरं? वर्षानुवर्ष सगळ्या स्त्रिया ही करते तेच काम करत आल्यात ना? त्यावेळी नव्हता असं काही!
त्याबरोबर दिवसभर पांघरलेली कौतुकाची शाल तिने दाराबाहेरच भिरकावून दिली. कमरेला पदर खोचला आणि पुढच्या सार्या घटनांना तोंड द्यायला, दिवसभर पडलेला पसारा उपसायला, उद्याची मुलांच्या शाळेची तयारी, त्यांचा होमवर्क उद्याची भाजी काय इत्यादी सगळ्या गोष्टींना तोंड द्यायला ती सज्ज झाली.
आता पुन्हा पुढच्याच वर्षी, ती मनाशी पुटपुटली.