स्वयंपाक घर आणि मी
स्वयंपाक घर आणि मी
माझ्या माहेरी आणि मी सर्वात लहान. घरामध्ये आई, दोन मोठ्या बहिणी, त्यामुळे मला कधी स्वयंपाक घरात पाऊल टाकण्याचा प्रसंग आला नाही.
अगदीच दोघी शिकायला वगैरे गेल्या, ट्रेनिंगला गेल्या आणि कधीतरी आई माहेरी गेली असेल ,आई लांब बसली असेल.अशावेळी मी चुलीवर स्वयंपाक केला आहे. भाताचा आधण चुलीवर रटरट करेपर्यंत चुलीवर ठेवायचं त्यानंतर ते वैलावर शिफ्ट करायचं.आणि त्यावर झाकण ठेवून द्यायचं अगदी मस्त सुंदर भात शिजतो. तव्यावर टाकलेली भाकर चुलीतून थोडासा इंगळ बाहेर काढून तेथे लावून ठेवायची ती फुगते. पाट्यावरती चटणी वाटणे, बाभळीच्या काटेरी लाकडांवर स्वयंपाक करणे, हे सगळे मी कधी तरी केले आहे ,पण नाइलाजाने. मजबुरीने आवड म्हणून नाही. त्यानंतर बारावी झाल्यावर घराबाहेर पडले. ट्रेनिंग ला मेसच साडेतीन वर्षे आयत जेवण होतं.
माझी खरी कसोटी लागली नोकरीला गेल्यावर, आयुष्यात कधी कोकण बघितलेच नव्हते. नोकरीच्या निमित्ताने घरापासून एवढ्या लांब जावे लागले. आणि स्टोव्ह वर ती स्वयंपाक करायचा, परत आपला आपणच डबा भरून घेऊन जाऊन कामावरती जायचं. बर आमची ड्युटी फिरतीची असायची. माझ्या अंडर सहा सब सेंटर होते. तिथल्या प्रत्येक नर्सला क्रॉस चेकिंग साठी जावं लागे. कधी पाय चालत, कधी बोटीने, कधी सकाळी सहा वाजताच्या एसटीने, निघावे लागे.
एवढ्या सकाळी उठून डबा केला तर केला, पण बहुदा तो करावाच लागे. कारण तसं तिथे काही मुंबई सारखी पोळी भाजी कुठे विकत मिळत नव्हती. कधी कधी माझ्या हाताखालच्या एएनएम मी व्हीजिट ला गेल्यावर माझ्यासाठी जेवण शिजवून ठेवत असत.
किती तरी वेळा मी नुसता कुकर लावून ,डाळ भात खात असे. तर कितीवेळा माझ्या शेजारीच दाभोळ मध्ये वडापावाचे दुकान होते. त्यातून मी वडापाव आणून त्यावर भागवल असेल. कधी खिचडीच करत असे, फक्त शनिवारी माझा उपास असायचा तेव्हा मी अगदी साग्रसंगीत कोशिंबीर, बटाट्याची भाजी, चपाती भात आणि दापोली वरून श्रीखंड मागवत असे.
तोही काळ गेला, पाच वर्षानी लग्न झाले ,आणि मी मुंबईमध्ये आले. सासुबाईची मोठी सून, त्यामुळे माझी खरी कसोटी आता लागणार होती. पण माझे नशीब सगळीकडे त्या बाबतीत चांगले होते. सकाळचा स्वयंपाक मला करावा लागायचा नाही. दीर, भाचा आणि मी आमच्या तिघांचा डबा सासुबाई सकाळी उठून करायच्या. सुदैवाने मिस्टरांना कंपनीचे कॅन्टीन असल्याने मला कधी त्यांना डबा देण्याचे टेन्शन नव्हते. पण संध्याकाळी मात्र घरी गेल्यावरती सगळी जबाबदारी माझी. संध्याकाळी मात्र पाच वाजता घरात बशीवर ढीग लावून खाणारे तीन पुरुष आणि आम्ही तीन बायका सासुबाई भाची आणि मी.
संध्याकाळी पाच वाजता काहीतरी नाश्ता बनवावा लागे, तो पण दररोज वेगळा. आज पोहे, उद्या शिरा, परवा उपमा, एक दिवस डोसे ,एखाद दिवस दही बटर, एखाद दिवस तांदळाच्या कण्या आणि माझ्या माहेरी मला यातलं काही माहीत नव्हतं. इडल्या डोसे घरी बनवता येतात हे मी सासरी आल्यावर शिकले. हळू हळू बरच काही शिकले. अर्धा किलो पोहे भिजवले तरी कोणाला पुरायचे नाहीत. नुसते बशीवर ढीग लावून खायला पाहिजे. आता नुसते बशी भरून, अगदी ढीग लावून सगळेजण नाष्टा घ्यायचे. मला फार राग यायचा. संध्याकाळी मात्र सोप्प काम होतं, भाकरी बडवल्या की संपलं.
दिवाळीचे फराळाचे पदार्थ वगैरे तर मी कधी हातही लावला नव्हता. आईच्या राज्यात फार फार तर करंजी चे पीठ कधीतरी पाट्यावर वरती टेचून दिलेले. बेसन भाजण्या पासून सासूबाईंनी मला सारे शिकवले. एकदा तर जोक झाला मी स्वयंपाक घरात बेसन भागत होते लाडू साठी थोडं थोडं बेसन घेऊन ते मंद आचेवर कसं भाजायच हे मला शिकवलं होतं. बेसन भाजताना माझ्या हाताला भाजलं तर मी स्वयंपाक घरातून आई भाजलं असं ओरडले. सासूबाईंना वाटलं बेसन भाजून झालं, त्या मला बाहेरून सांगतात अजून चांगलं भाजू दे.
मग मी आतून म्हणाले, काय हो आई! मला भाजलं आणि तुम्ही म्हणता अजून भाजू दे .मग माझा दिर आणि त्या दोघेही हसायला लागले. त्या म्हणाल्या अगं मला वाटलं बेसन भाजून झालं. मग त्यांनी उठून माझ्या हाताला बर्नाल वगैरे लावलं. त्यानंतर माझा दीर कितीतरी दिवस वहिनी अजून भाजू दे ,वहिनी अजून भाजू दे ,असं मला चिडवत होता .त्यांच्या हाताखाली तीन वर्षात मी बऱ्यापैकी शिकले. त्यांना वेगवेगळ्या रेसिपी बनवण्याची आवड होती. त्या काळात युट्यूब वगैरे नव्हते, देवाची मेहरबानी. नाहीतर माझ्या सासूने रोज नवीन काहीतरी बनवले असते आणि मलाही बनवायला लावले असते. त्यानंतर वेगळी झाले मग पूर्ण जबाबदारी माझ्यावर आली. मुलांचे डबे, माझं जेवण, पण मला दैनंदिन चपाती-भाजी हा प्रकार रोजच्यारोज बनवायला कंटाळवाणा वाटतो. मला आवडत नाही. सुदैवाने गेल्या पंधरा वर्षापासून माझ्याकडे स्वयंपाकाला बाई आहे. तिला मी सगळ्या व्हरायटी शिकवल्यात आणि ती करते पण, आणि वैशिष्ट्य म्हणजे माझा ओरडाआरडा ऐकून पण ती कधी उलट बोलत नाही.
आता मला काहीतरी स्पेशल असेल तर करायला आवडतं. आठवड्यातून एखाद्या वेळी डोसे, इडल्या, मिसळ पाव, पाव भाजी असे साधारणता सहजपणे जमणारे पदार्थ मी करते. केक बिक च्या भानगडीत मी कधी पडले नाही. एकदा रेसिपी वाचून कुकरमध्ये केक लावला, शिट्टी काढून घेतली पण काय झालं माहित नाही कुकर चा वाॅल वितळला आणि केक वरती पडला. बर! घरातून आमच्या नवरोजी यांचे याबाबतीत काडीमात्र प्रोत्साहन नसते. बाबा यावेळी चुकलं तर पुढच्या वेळी बनवू असं नाही म्हणणार, तर दहा वेळा त्या बिघडलेल्या केकचे उदाहरण देत बसणार. आणि बाई! तू आता काय केक वगैरे बनवू नको!असं सांगणार .या प्रकाराने मी असं वेगळं काही बनवायचं सोडूनच दिलं.
डिंकाचे लाडू ,आवळ्याचं लोणचं, सुरणाचा लोणचं, मुरांबा, साखर आंबा, मोरावळा, कुरडया, पापड, सांडगे हे सारं मी आवडीने बनवते. पण आता गोष्ट अशी आहे की, सारे हेल्थ कॉन्शस झालेत, त्यामुळे घरात तळणीचे पदार्थ फार कमी होतात. आणि वर्ष वर्ष केलेल्या गोष्टी अशाच पडून राहतात. मुलांना तर खाण्यासाठी मागे लागावे लागते.त्यामुळे हळूहळू या गोष्टी कमी केल्या.
मी अगदी हाताला खूप चव असणारी सुगरण वगैरे मुळीच नाही ,परंतु काहीतरी आवडीने बऱ्यापैकी बनवून घरच्यांना खाऊ घालणारी नक्कीच आहे. आता स्वयंपाक घराची साफसफाई, कोणती वस्तू कुठे आहे? काय संपला आहे? काय आणायचं आहे? फ्रिज मध्ये कोणती भाजी आहे? हे मात्र माझ्यापेक्षा नवरोजी ना जास्त चांगलं माहीत असतं.
कारण रोजच्या डे टू डे ऍक्टिव्हिटी साठी मी किचनमध्ये लक्षच घालत नाही .
रविवार मात्र काहीतरी स्पेशल डिश बनवून घालण्याचा असतो .सगळा दिवस, अर्धा दिवस तरी नक्कीच किचनमध्ये जातो.तेव्हा मात्र कधीकधी छान वाटतं ,तर कधी कधी असं वाटतं अरे माझी एक सुट्टी पण यांना करून खाऊ घालण्यासाठी आहे का? शिवाय आपले सणवार असतातच.त्यामध्ये मूळ पक्वान्नं जरी बाहेरून मागवले, तरी चटण्या, भाज्या ,कोशिंबिरी ,तळण, भजी, वरण-भात ,पुरणाचा स्वयंपाक असेल तर कटाची आमटी, अगदी पुरणपोळ्या बाहेरून मागवल्या तरी शास्त्राला म्हणून थोडं पुरण घालणे. घरच्या देवांचा नैवेद्य म्हणून पुरण पोळ्या करणे, हे सार असतंच. सकाळी उठल्यापासून या गोष्टींचा टेन्शन असतं. सासूबाईंचा दंडकच असायचा, बारा वाजता नैवेद्य झालाच पाहिजे. मग तो देवांना असो नाहीतर पितरांना.
शिवाय आपल्याकडे सगळ्या देवांचे नैवेद्य, गाईचा घास गोग्रास, पितरांचा नैवेद्य ,अशा बऱ्याच गोष्टी पाळाव्या लागतात. अशा बऱ्याच आपत्ती पूर आपत्ती कराव्या लागतात आता यात पण मी मुलांना ट्रेन केले आहे. माझा छोटा( वय वर्ष 25 चालू त्याचे वय अशासाठी सांगितले नाहीतर उगाच सगळ्यांना वाटायचे बाई छोट्या मुलांना वेठीला धरते की काय? पण आता त्याच्या वयात आपले संसार थाटून आपण जबाबदाऱ्या घेत होतो. म्हणून यांना पण आत्तापासून सगळ्या गोष्टींचा ट्रेनिंग देत आहे) सगळे नैवेद्य वाढतो अगदी मूद पाडून व्यवस्थित, आणि बाकीची वरकड मदत नारळ खरवडून देणे, भाज्या चिरून देणे, काकडी कोचून देणे, अशी बऱ्यापैकी मदत घरातील तीन पुरुष मंडळी मला करतात.
असो मग बऱ्याच वेळा आपले छंद, इतर ॲक्टिविटी बाजूलाच राहतात.असो एकंदरीत जे काय आहे ते छानच चालू आहे.
