स्त्री एक प्रेरणा
स्त्री एक प्रेरणा


भारतीय स्त्री...
जीवाश्मांची वसुंधरा तू
हिमतीची वाघिणी तू
कुळाची स्वामिनी तू
पतीची अर्धांगिनी तू
लेकराची माऊली तू
तुजवाचून हे विश्व
किती काळ टिकणार...
हे एक सर्वमान्य सत्य आहे. भारतीय संस्कृती ही पुरुषप्रधान असूनदेखील, बहुतांशी घराचे घरपण हे त्या घरातील स्त्रीमुळे टिकून असते आणि कोणत्याही पुरूषाचा प्रपंच हा त्याच्या पत्नीच्या योग्य साथीमुळेच वाढत आणि घडत असतो. थोडेफार उदाहरण सोडले तर हे सर्वमान्य सत्य आहे तरीही आज अनेक घरात स्त्रीला दुय्यम स्थान आहे. या उलट ज्या घरातील स्त्री वारली, त्या स्त्रीशिवाय घर हे घरच रहात नाही. ज्या घरातील ती गेलेली आहे, तेथे जाऊन पहा किंवा त्या घरातील सदस्यांना तिची किंमत विचारा आणि ज्याच्या जीवनातील अर्धांगिनी गेलेली आहे, त्याला तिची खरी किंमत विचारा. ती असेल तर प्रत्येक ठिकाण स्वर्ग आहे आणि ती नसेल तर स्वर्गसुद्धा नरक आहे.
छत्रपती संभाजीराजांच्या जीवनातील येसूबाईंचे स्थान, शिवरायांच्या जीवनातील सईबाईंचे स्थान आणि राजे शहाजी महाराजांच्या जीवनातील माँसाहेब जिजाऊंचे स्थान आपल्या डोळ्यासमोर आणा. या सर्वजणींना त्यांच्या पतीची मनापासून साथ होती, मागून घेतलेली नाही. या सर्व स्वकर्तृत्वाने महान होत्याच पण त्यांच्या पतींनी त्यांना दिलेला दर्जा आणि सन्मान यामुळेच त्या अतिमहान झाल्या आहेत आणि इतिहासात सूर्यासारख्या तळपत आहेत.
स्त्री ही विनोदाचा विषय नाही. कल्पना करा या पुरूषांनी जर त्यांना विनोदाचा आणि टिंगलीचा विषय बनवला असता तर काय झाले असते? बरेच पुरुष मी असे पाहिले आहेत की पत्नीला फसवून लफडी करणारे. तू मला आवडत नाहीस. त्यांच्यापेक्षा कमी शिकलेली असेल तर तू माझ्या लायकीची नाहीस असे म्हणणारे महाभाग पण आहेत. तरीही ती या गोष्टीची दखल घेत नाही. मुलांसाठी माहेरच्या लोकांसाठी. यांनी एक गोष्ट लक्षात ठेवावी की हे सर्व तिला माहीत असते आणि समजतही असते, तरीही ती शांत असते हा तिचा बावळटपणा किंवा मूर्खपणा नसून तिची सहनशीलता आणि असामान्य संयम आहे.
एखाद्या स्त्रीचे पती वारले, घरातील पुरूष गेला तर स्त्री आपले दुःख बाजूला ठेऊन पुरूष बनते आणि घर पुन्हा उभे करते आणि घराचा कणा बनते, सर्वांना मायेची सावली देते, लेकरांना उभारी घेण्यासाठी त्यांच्या पंखात बळ भरते आणि जीवाचे रान करून फक्त त्यांच्यासाठी जगते. आधुनिक काळातील स्त्री मध्ये थोडा बदल झाला आहे मी मान्य करते. परंतु थोड्याशा उदाहरण सोडले तर बहुतांशी स्त्रिया आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडतात. स्वार्थ बाजूला ठेऊन कुटुंबाकडे जास्त लक्ष देतात.