आदर्श पोपटराव पवार..!
आदर्श पोपटराव पवार..!
आणि पोपटराव पवार बदलापूच्या त्या ग्रामपंचायतीमधून निराश होऊन निघून गेले!
पोपटराव पवार यांना बदलापूरच्या पुढे एका ग्रामपंचायतने (नाव लिहीत नाही त्या ग्रामपंचायतचे कारण त्यामुळे हल्ली भावना दुखवायच्या आणि गावात बंद वैगरे व्हायला नको) ग्रामसभा बोलवली.
कारण होते आपल्या गावाला आदर्श गाव योजनेमध्ये सामील करून घेणे. सुमारे सात - आठ वर्षांपूर्वीचा काळ असेल.
तेव्हा पोपटराव पवार हे त्यावेळच्या राज्य सरकारच्या आदर्श गाव योजना समितीचे अध्यक्ष होते. त्यांच्याकडे ठराव गेल्यानंतर समितीच्या प्रक्रियेनुसार पोपटराव पवार त्या बदलापूरजवळील ग्रामपंचायतीच्या भेटीवर आले. सोबत ग्रामसभेचा ठराव घेऊन आले होते. त्यावरील सह्या असलेल्यापैकी काही नावे निवडून त्यांनी ग्रामसेवकाला सांगितले, या ग्रामस्थांना बोलवून आणा.
त्यातील जी काही मंडळी उप
लब्ध होती ती पोपटराव यांनी कडेला घेतली. त्यांना एक कोरा कागद देऊन त्यावर नाव लिहायला सांगितलं, त्यापुढे सह्या करायला सांगितले. त्यातील बरेच निरक्षर होते, तर अनेक लोकांच्या सह्या खोट्या होत्या. त्यामुळे ग्रामसभेत नसलेल्या लोकांची उपस्थिती दाखविली गेल्याचे खोटा बनाव पोपटराव पवार यांच्या लक्षात आला.
संबधित पदाधिकारी व अधिकारी यांची तोंडं पडली. कारण त्यांची चोरी पकडली गेली होती. पण पोपटराव पवार हे तिथून शांतपणे निराश होऊन निघून गेले. अशा प्रकारे एका आदर्श गावात नाव नोंदणी होऊन लाखो रुपये अनुदान मिळेल अशी जिभल्या चाटत बसलेल्या त्या मंडळींचा डाव, पोपटराव पवार यांच्या चाणाक्षपणे उधळला गेला.
तसाही आदर्श शब्दच आदर्श राहिला नाही हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे. अशा पोपटराव पवार यांना पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!