जिद्द,चिकाटीची गाथा..!
जिद्द,चिकाटीची गाथा..!
'श्री. जीवनराव गोरे माध्यमिक विद्यालय, आळणी' येथे पाचवीत शिकणाऱ्याला आदित्यला वाटायचं की, ' इतर मुलं शाळेत येताना जशी सायकल घेऊन येतात तसं आपणं ही शाळेला सायकलवर जावं, आपल्याला सुध्दा एक सायकल असली पाहिजे.'
परंतु 'मला सायकल घेऊन द्या,' असं आई वडीलांना सांगण्याचं धाडस त्याला काही होतं नव्हतं. कारण वडील गवंडी काम करणार तर आई रोजंदारीवर जाणार. ना राहायला नीट घर आहे, ना घालायला नीट कपडे आहेत. रोज काम करावं तेव्हाच घरात चूल पेटणार.
आई-बापाची दररोज होणारी परवड उघड्या डोळ्यांनी बघणाऱ्या आदित्यला खात्री होती की नवीन सायकल घेणं हे परवडणारं नाही.
सायकल घेऊन शाळेला येणारी मुलं बघीतली की, या कोवळ्या जीवाची घालमेल व्हायची. कुणाच्या तरी सायकलवर हात फिरवत आपल्याला सुध्दा शाळेत यायला सायकल पाहिजे असं स्वप्न तो बघायचा.
शाळा सुरू झाल्यावर काही दिवसांनी एका शिक्षकाने वर्गात नवोदयच्या पुर्व परिक्षेची सुचना सांगितली अन् नवोदय विद्यालयाचे महत्त्वही सांगितले.
तसेच या शिक्षकांने सांगितले की, 'या परिक्षेची जी काही तयारी आहे, ती मी स्वत: करून घेणार. मी माझ्या मेहनतीला कुठेही कमी पडणार नाही आणि तुम्हीही कुठं कमी पडू नका.'
पण यापुढे जाऊन Nitin Adasakar या मेहनती अन् मनस्वी शिक्षकाने सांगितले की, "ज्यांचा कुणाचा नंबर नवोदय विद्यालयाला लागेल त्याला मी सायकल घेऊन देणार आहे."
यावर आदित्य सावरून बसला अन् नीट लक्ष देऊन ऐकू लागला.
नितीन सरांचा तास संपल्यावर, वर्गाच्या बाहेर येऊन सरांना भेटला अन् बोलला, ' सर, नवोदयच्या परिक्षेत पास झाल्यावर खरंच तुम्ही सायकल देणार आहात.'
तेव्हा सर म्हणाले, ' अरे! मी दरवर्षी दहावीत पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्याला सायकल देतोच की अन् यावर्षी पासून नवोदयला लागणाऱ्य
ा विद्यार्थ्यांना सुध्दा सायकल देणार आहे."
( नितीन आडसकर सर, २००८ पासून गोरे विद्यालयात दहावीत पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्याला सायकल भेट देतात. त्यांनी हा उपक्रम सुरू केला. .)
त्याचवेळी आदित्य ने सरांना सांगितले, ' सर, ही सायकल मी मिळवणारच, त्यासाठी तुम्ही सांगाल तेवढा अभ्यास करणार.'
आणि खरंच ओ! आदित्य विजय कांबळे, याने २०१९ च्या नवोदय प्रवेश परीक्षेत जिल्हात ६७ वा नंबर मिळवला.
नवोदय विद्यालय, तुळजापूर येथे प्रवेश तर मिळालाच पण त्यापेक्षाही त्याला आनंद जास्त होता तो नितीन सराकडून आपल्याला सायकल मिळाली त्याचा.
मित्रांनो,
आदित्याची आई ७ वी तर, बाप ४ थी शिकलेला. सकाळी सकाळी लवकर उठून पोटापाण्याच्या ओढीनं ही मायबाप घर सोडणार. घरात दोन बहिणी अन् हा, हे तिघेही आई बाप कामाला गेल्यावर शाळेला जाणार.
शाळेतून घरी आल्यावर जेवण करून अभ्यासाला बस असं सांगणारं कुणीही नसताना हे दहा वर्षाचं पोरगं परिस्थितीच्या #जाणिवेतून अभ्यासाला बसणार.
सलाम याच्या जिद्दीला अन् त्याला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांना.
------------------------------------
थोडंसं वेगळं चित्र:
आई - बाप उच्च शिक्षित आहेत, शहारातील उत्तम शाळेत आहे, लाखो रुपये फीस भरून क्लासेस आहेत. एक म्हणता दोन वह्या आहेत, दोन म्हणता दहा पेन आहेत.
पाहिजे ते खायला आहे, म्हणेल तसे महागडे कपडे आहेत. शाळेला, क्लासला जायला गाडी आहे, रिक्षा आहे.
कशाची कशाची म्हणून कमी नाही. दुःखानं सांगावस वाटतंय या सगळ्यात मोठी कमतरता आहे ती #जाणिवेची.
आपलं चांगलं शिकलं पाहिजे, चांगल्या संस्कार आणि चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे. आणि यासाठी जे काही कष्ट करायचे आहेत ते केले पाहिजेत.
याचीच जाणीव कुणाला राहीली नाही.