नासा येवतीकर

Others

3  

नासा येवतीकर

Others

सोन्याचे बिस्कीट

सोन्याचे बिस्कीट

3 mins
478


माधवराव आज खूप खुश दिसत होते. त्यांच्या चेहऱ्यावर ती खुशी स्पष्ट दिसत होती. कारण काल रात्री शेतात विहीर खणत असताना एक पेटी मिळाली होती आणि त्यात एक चमकदार अशी बिस्किटच्या आकाराची वस्तू दिसली. तसे त्यांचे डोळे दिपुन गेले. होय...ते सोन्याचेच बिस्किट होते ! हे मनाशी समजून घेतल्यावर त्यांचे पाय जमिनीवर नव्हतेच. कधी एकदा घरी जातो आणि पत्नी माधवीला सांगतो, असे झाले होते. तसा तो तडक घराकडे जायला निघाला. दोन कि.मी.चा रस्ता कधी संपला हे कळले देखील नाही. घरात आल्या आल्या हातपाय न धुता तो थेट घरात गेला आणि माधवीला जवळ घेऊन कानामध्ये सोन्याची बिस्किट मिळाली, असे सांगितल्याबरोबर तिला आश्चर्याचा धक्का बसला. तिचे तोंड उघडे ते उघडेच राहिले. 'ही गोष्ट कोणाला सांगू नको' म्हणून माधवराव झोपी गेले. झोप कुठली येते? रात्रभर नुसता विचार करत राहिला की, या सोन्याचे बिस्किटाचे काय करायचे ? या विचारांच्या तंद्रित त्याला झोप लागत नव्हती. तिकडे माधवी देखील काय काय विकत घ्यावे, या विचारात रात्रभर जागीच राहिली. पहाटेपहाटे तासभर झोप लागली. सकाळ झाली. रोजच्याप्रमाणे यांची कामे होत नव्हती. सदा त्यांच्या डोक्यात सोन्याचे बिस्किटाचे करायचे काय? हाच प्रश्न घोळत होता. त्यामुळे कुठेही मन लागत नव्हते. रोजच्यासारखे पारावर काही लोक गप्पा मारत बसले होते. पण माधवरावाचे त्या गप्पामध्ये अजिबात लक्ष नव्हते.


माधवरावांचा परममित्र शंकरराव न राहवून म्हणाले, "काय झाले माधवराव, लाई गप्प गप्प, रात्री शेतात काय गावलं की काय"? असे बोलल्याबरोबर माधवराव होशमध्ये आले. "नाही, तसे काही नाही", असे म्हणू लागले. तेव्हा हे ही विचार करू लागले की, 'ही गोष्ट शंकर ला कशी कळली? नक्की माधवीने शंकरच्या बायकोला म्हणजे राधाला सांगितले असेल, म्हणून तर त्याला ही गोष्ट कळाली'. आत्ता जाऊन माधवीला विचारतो, म्हणून माधवराव उठले व ते सरळ घरी आले. माधवीला विचारणा केली. माधवी देवाचे शपथ घेऊन म्हणाली की,"तिने कोणाला ही गोष्ट सांगितले नाही". 'मग शंकरला ही गोष्ट कशी कळाली?' या विचारात ती रात्र संपली. त्यांनी सोन्याचे बिस्किट एका मडक्यात ठेवले होते. दिवसातून दोन तीन वेळा त्याला उघडून पहायचे. दोघांचेही कशात देखील मन लागत नव्हते. 'या सोन्याच्या बिस्किटमधून छान घर बांधावं', असा विचार केला. पण घर बांधले तर लोकांना ह्या सोन्याच्या बिस्किटाची गोष्ट कळू शकते, मग काय करावे? माधवी म्हणत होती, तिला गंठन आणि पोहा हार पाहिजे. पण हे घ्यायचे असेल तर सोन्याचे बिस्किट सोनाराच्या दुकानात न्यावे लागते आणि तिथेही जर कोणी विचारले की, 'सोन्याची बिस्किट कुठून आलेत?' तर काय उत्तर द्यावे? 'त्याचे काय करावे?' हे दोघांनादेखील कळेना.


दिवसामागून दिवस जात होते. त्या सोन्याच्या बिस्किटापायी रात्रीला झोप येत नव्हती, तर दिवसा चैन पडत नव्हते. त्याच काळजीपायी जेवण कमी होऊ लागले. अशक्तपणा वाढत चालला होता. गावात सर्वांना प्रश्न पडला की, माधवरावला झाले तरी काय? तो वाळलेल्या झाडांसारखा कोरडा पडत चालला होता. मित्रात बसणे, गप्पा मारणे, हे सर्व जवळपास बंदच झाल्यात जमा होते. त्याला काही सुचत नव्हते. गावातील प्रत्येकाने शंकररावाप्रमाणे अंदाज बांधला की, विहीर खणताना याला काहीतरी सापडले असणार. म्हणून तर तीच चिंता त्याला खाऊन टाकत आहे. हा हा म्हणता ही बातमी सर्वदूर पसरली. जो तो माधवरावला काय मिळाले म्हणून चौकशी करू लागले. सर्वांना उत्तर देता देता त्याच्या नाकी नऊ आले होते. गावातील श्यामरावने असे उगीच टोचले की, "काय माधवराव, लाई वाळून गेलाव, काय झाले ? काही सोनं बिनं भेटले की काय"? यावर रागात येऊन माधवराव म्हणाले, "होय, सोन्याचे बिस्किट भेटले. काय म्हणण आहे तुमचं?" माधवराव रागात बोलले पण ही बातमी खरेच आहे, असे समजून संपूर्ण गावात वाऱ्यासारखी पसरली.


जो तो माधवरावांना सापडलेल्या सोन्याच्या बिस्किटाचीच चर्चा करत होता. माधवरावांना घरातून बाहेर पडणेदेखील अवघड झाले होते. तशी ही गोष्ट पोलिस पाटलांच्या कानावर गेली. त्याने हळूच पोलीस स्टेशनला याची खबर दिली. तशी सायंकाळच्या दिवेलावणीच्या वेळी गावात पोलिसाची गाडी आली, ती थेट माधवरावांच्या घरासमोर जाऊन थांबली. पोलीस खाली उतरले आणि सरळ माधवरावांच्या दारवार गेले. टकटक असा आवाज केला. माधवरावानी दार उघडले. समोर पोलिसांना पाहून त्याची बोबडी वळली होती. 'माझी काही चूक नाही, मी काही केले नाही, ते बिस्किट जशास तसे आहे, काहीच खर्च केला नाही, ते सोन्याचे बिस्किट घेऊन जा, पण मला सोडा, मला सोडा," असे माधवराव जोरात ओरडू लागले. तसे माधवी बेडरूममध्ये आली आणि माधवरावांना झोपेतून जागे केले. "बाप रे ! काय स्वप्न पडले होते ? 'नको रे बाबा, सोन्याचे बिस्किट! यापेक्षा आपली कष्टाची भाकर बरी...'. म्हणत तोंडावर पाणी मारुन शेताकडे निघाला.


Rate this content
Log in