सिंहावलोकन
सिंहावलोकन


जीवनाच्या वाटेवर चालताना प्रत्येकाने सिंहावलोकन केलेच पाहिजे. सिंहावलोकन याचा अर्थ आहे सिंहासारखे पुढे चालत असताना प्रगती करत असताना मागे वळून पाहणे, दृष्टीक्षेपात गोष्टी घेणे. कारण सिंह दोन पावले चालला की मागे वळून बघतो. मानव निसर्गातील प्रत्येक गोष्टींकडून काही न काही शिकत आलाय. निसर्गाचा अभ्यास करून तो आज आपण प्रगतीच्या मार्गावर आहे म्हणून सिंहाचा हा गुण आपण आपल्यापुरता का होईना आत्मसात करणे काळाची गरज आहे.
काही काळ पुढे चालल्यानंतर प्रगती केल्यानंतर यशस्वी झाल्यानंतर जेवढे सिंहावलोकन महत्वाचे आहे त्याच्याएवढेच अपयशी झाल्यावर, दुर्घटना झाल्यावर, काहीतरी निसटून गेले असे वाटल्यावर, सापडत नाही मिळत नाही असा बोध झाल्यावर सिंहावलोकन महत्वाचे आहे. मला जीवनाकडे सम्यक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे असे वाटते त्यादृष्टीने सतत प्रयत्नशील राहतो. आपल्या पिढीच्या चुकांची किंमत पुढच्या पिढीना चुकवावी लागते हा काळाचा नियम आहे, म्हणून आपल्या पिढीसाठी चुका होऊ न देणे किंवा त्यासाठी सजग राहणे महत्वाचे आहे.
आयुष्यात योग्य निर्णयाअभावी काय हातातून निसटून गेले आणि आपण कुठे शून्यात रमलो होतो याचा विचार होणे आणि त्या चुका पुन्हा आयुष्यात होऊ न देणे ही फार महत्वाची गोष्ट आहे. आयुष्यात वयाच्या मोहानुसार घडणाऱ्या घटनांना किंवा आयुष्यात सर्वस्व बहाल करावे असे वाटणाऱ्या व्यक्तींना आयुष्यात किती वेळ द्यावा आणि कोणता वेळ द्यावा याचा विचार होणे महत्त्वाचे होते. योग्य निर्णय घेताना सिंहावलोकन अवश्य करावे.