आठवणीतील होळी
आठवणीतील होळी
माझं मराठीचं
मोठपण
सांगतात सारे सण
राहू इथं एकोप्यानं.
ठेवू धर्माची जाण
देऊ थोरांसी मान
घेऊ ध्यानात
शिकवण...
खरंय आपल्या भारतीय सणांची परंपरा आपल्याला खूप काही शिकवते. आपल्या या सणांचे निसर्गाशी खूप जवळचे नाते आहे. प्रत्येक ऋतुंशी त्यांचे ऋणानुबंध आहे. शिशिराची पानगळ संपून झाडांना नवीन पालवी फुटू लागली की वसंत ऋतूची चाहूल लागते. कोकिळेचे मंजुळ स्वर कानी येऊ लागतात आणि आपसूकच होळीची आठवण येते. होळी हा सण जसा आनंद साजरा करण्याचा तसाच तो दुष्ट आणि वाईट प्रवृत्तीचे निर्दालन करण्याचा आहे. या होळीशी निगडीत अनेक कथा आहेत. विविध प्रांत त्यांच्या प्रथेप्रमाणे होळी साजरी करतात. होळी शक्यतो प्रदोष काळी पेटवली जाते. त्या मागची आख्यायिक अशी की-
हिरण्यकश्यपू नावाचा राजा होता. तो स्वतःला देवांपेक्षा सर्वश्रेष्ठ मानायचा. पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा मात्र प्रचंड विष्णुभक्त होता. हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला त्याच्या भक्तीपासून परावृत्त करायचा बराच प्रयत्न केला.पण त्याला काही यश आले नाही. त्याला खूप राग आला आणि त्याने आपली बहिण होलिका हीला बोलावले. त्याने तिला अग्नीत प्रवेश करून प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसायला सांगितले. होलिकेला अग्नी जाळू शकणार नाही असा वर होता हे हिरण्यकश्यपूला माहीत होते, त्यामुळे होलिकेला काही होणार नाही पण प्रल्हाद मात्र जळून खाक होईल अशी पक्की खात्री होती. पण झाले उलटेच. म्हणतात ना की देव तारी त्याला कोण मारी. विष्णुच्या परम भक्तीमुळे प्रल्हादच्या केसालाही धक्का लागला नाही पण होलिका मात्र जळून भस्म झाली. या कथेतून आपल्याला वाईटावर चांगल्याचा विजय होतो हाच संकेत मिळतो. ही घटना घडली त्या दिवशी फाल्गुन पौर्णिमा होती म्हणूनच या दिवसाला होळी पौर्णिमा, हुताशनी पौर्णिमा असे म्हणतात. सर्वांनी एकत्र यायचे आणि बेभान होऊन होळी साजरी करायची.
होळीशी संदर्भीत आणखी एक आख्यायिका प्रचलीत आहे ती अशी की -
ढुंढा नावाची एक राक्षसीण होती. ती लहान मुलांना खूप त्रास द्यायची. मुले खूप घाबरायची तिला. त्यामुळे त्रस्त अशा त्यांच्या पालकांनी तिला हाकलून द्यायचा प्रयत्न केला पण काहीच उपयोग झाला नाही. एक दिवस सूर्यास्ताच्या वेळी गावातील सर्व पुरुष एकत्र जमले. येतानाच प्रत्येकांनी आपआपल्या घरून पाच पाच लाकडे, गोवऱ्या आणल्या होत्या. एक खड्डा खणून त्यात मधोमध ती लाकडे व गोवऱ्या रचल्या आणि त्याला विस्तव लावून पेटवून दिले. आग भडकू लागली. समस्त गावकऱ्यांनी त्या अग्निभोवती फेऱ्या मारत ढुंढा राक्षसीणीच्या नावाने बोंबा मारू लागले. हा सर्व प्रकार त्या राक्षसीणीने पहिला. तिला वाटले की आता हे सर्व गावकरी आपल्याला पकडून त्या आगीत ढकलतील. ती खूप घाबरली आणि दूर दूर पळून गेली. गावातून अमंगल निघून गेली म्हणून प्रत्येकाने घरी पुरणपोळीचा स्वयंपाक केला. पुरणपोळी घेतली त्यावर कुरडई, पापड्या सोबत भात-आमटी घालून होळीची मनोभावे पूजा करून त्या पवित्र अग्नीला नैवेद्य अर्पण केला. हीच परंपरा पुढे चालू राहिली. फक्त होळीची लाकडे रचताना सर्वात प्रथम मधोमध एरंडाच्या झाडाची फांदी त्या ढुंढा राक्षसणीचे प्रतीक म्हणून उभे करतात. बऱ्याच ठिकाणी होळीच्या सभोवती सुंदर रांगोळी
घालतात. त्या होळीला साडी नेसवतात. त्या एरंडेच्या झाडाला ओटी बांधतात. साडीचोळीचा मान करणे ही आपली संस्कृती आहे ना. मग मनोभावे पूजा करून होलिकायै नमः म्हणून होळी पेटवतात.
अस्तपाभयसंत्रस्तै कृत्वा तं
होलि बाहलशै:।
अतस्ता पुजयिष्यामी भुते भुतिप्रदा भवः।।
असा मंत्र बोलत प्रदक्षिणा घालून होळीला नारळ अर्पण करतात.
परंतु, आजकालच्या धकाधकीच्या जीवनामुळे सणांचे रूपच पालटून गेले. बदल ही काळाची गरज आहे असे म्हणतात. मनुष्याची विचारसरणी बदलली. आपली नैसर्गिक संपत्ती असलेल्या वृक्षांची कत्तल करून होळीत जाळल्या जाणाऱ्या लाकडांमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला. यासाठी पर्यावरणप्रेमींकडून अनेक उपक्रम राबवले जातात. नुकतीच शिशिराची पानगळ झालेली असते. सर्वत्र पालापाचोळा, सुक्या काटक्या इतरत्र पडलेल्या असतात. ती सर्व गोळा करून त्याची होळी करावी. असे केल्याने पर्यावरणाचे रक्षणही करता येईल आणि आपला परिसरही स्वच्छ ठेवता येईल. परिसर स्वच्छ ठेवणे हे आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे. स्वच्छता नसेल तर रोगराई वाढेल आणि ती ढुंढा राक्षसीण त्या रोगराईच्या रूपात वावरत असते. तीचा नायनाट करण्यासाठी स्वछता पाळणे फार गरजेचे आहे.
होळीची एक अशी आठवण माझ्या मनातून गेलेली नाही. काय झाले की त्या वर्षी आम्ही होळीसाठी गावी गेलो होतो सर्वजण आनंदाने होळी साजरी करत होते. होळीने चांगलाच पेट घेतला होता, आगीच्या ज्वाळा उंच भडकत होत्या. सर्वजण आनंदात असताना अचानक काय झाले काही कळले नाही. कोणीतरी त्या होळीच्या आगीत पडल्यासारखे जाणवले. नंतर कळले की कोणी पडले नव्हते तर ती सुमन होती. तिने स्वतःहून आगीत उडी मारली. गरीबाघरची गुणी पोर ती. अहो तिचे लग्न होऊन एक वर्षही झाले नव्हते. सर्वांनी प्रयत्न करून तिला कसेबसे बाहेर काढले. बरीच भाजली होती. बघवत नव्हते तिच्याकडे. तपासाअंती कळले की लग्न झाल्यापासून तिच्या गरीब बापाने हुंडा दिला नाही म्हणून तिचा नवरा आणि सासु-सासरे दररोज तिचा अमानुष छळ करत होते. तिचं जीणं नकोसे करून टाकले होते. खूपच हृदयद्रावक घटना होती ती. तो दिवस आठवला की आजही काळजात धस्स होते.
म्हणूनच वाटते की होळीत दहन करायचे ते अमानुष हुंडापद्धतीला, दहशतवादाला, भ्रष्टाचाराला, जात पात मानणाऱ्या रुढीला, व्यसनी आणि वासनेच्या आहारी गेलेल्या नराधमांना. त्याचप्रमाणे निराशा, दारिद्र्य, अहंकार, कुविचार यांचेही दहन व्हायला पाहिजे. होळीचा मुख्य उद्देश हा वाईटाचा नाश आणि एका नव्या विचारांची सुरुवात.
होळीचा दुसरा दिवस धुळवड. काहीजण त्याला रंगपंचमी म्हणतात. बच्चे कंपनीचा तर आवडीचा सण. पालकांनी त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले पाहिजे. रंगपंचमी साजरी करताना सामाजिकतेचे भान ठेवले पाहिजे. डोळ्यांना आणि त्वचेला इजा पोहचवणाऱ्या रासायनीक रंगांचा वापर न करता नैसर्गिक रंगांचा वापर केला पाहिजे. काही ठिकाणी दुष्काळाचे सावट आहे. लोकांना प्यायलासुद्धा पाणी मिळत नाही. बऱ्याच ठिकाणी आठ दिवसांनी किंवा पंधरा दिवसांनी पाणी येते. तेव्हा आपणही कोरड्या रंगांनी रंगपंचमी साजरी करून पाणी वाचवले पाहिजे. अशा सर्व छोट्या छोट्या गोष्टींचे पालन केले तर आनंदाच्या सणाला गालबोट लागणार नाही. आता बहुतेक ठिकाणी इकोफ्रेंडली होळी साजरी करतात.
आणि आनंदाने गाणे म्हणतात
खेळताना रंग बाई होळीचा
होळी रे होळी, होळी रे होळी,
नैराश्य अहंकाराची जाळूया मोळी,
झाडे लावू, झाडे जगवू, पर्यावरण सांभाळी,
वसंतऋतूंच्या आगमने साजरा करूया होळी