मनातली सल
मनातली सल


एकमेकांच्या प्रती प्रेमभावना, एकजूट सांघिक शक्ती, माणुसकी ,भावनिक आत्मीयता, सहानुभूती हे सर्व गुणधर्म असलेला देश म्हणजे आपला भारत देश .पण अचानक कुठून कोण जाणे कोरोना नावाचा वायरसने आपल्या भारतावर आक्रमण केले, भीतीचे पडसाद घुमू लागले. माणूस माणसावर शंका घेऊ लागला फक्त स्वतःच्या काळजीपोटी .कसा अप्पलपोटी बनला बघा समाज. आधीच धावपळीच्या युगात माणसाकडे वेळ न्हवता, सर्व काही मोबाईलद्वारे चालते. वागण्यातून, बोलण्यातून, मोबाईलवरील संभाषण टाईप करताना संकुचितपणा जाणवू लागला. मुळात संवाद खुंटत चालला. असे असताना देखील कधीतरी वेळ काढून एकमेकांच्या भेटी घेणे,चौकशी करणे, मग ते छोटेखानी पार्टीच्या स्वरूपात का होईना पण होत होते.तेवढेच मनाला समाधान वाटायचे हो..
पण आता या कोरोना वायरसमुळे अचानक भेट झालेल्या मित्राला बघून आंनदीत होतात आणि सवयीप्रमाणे हस्तांदोलन करायला हात पुढे जात नाही तोवर पटकन हात मागे घेतला जातो , मनाला किती यातना होतात आवडत्या माणसाला प्रेमाने भेटताही येत नाही. ज्या स्पर्शातून आपल्याला अनामिक प्रेमाची, स्नेहाची,मायेची जाणीव व्हायची तेच आता बंद झाले आहे.हा कोरोना आपल्यात दुरावा निर्माण करत आहे असे तुम्हाला नाही का वाटत. कोणीतरी बाहेरच्याने आपल्यातील एकीत फूट पाडावी एवढेही आपली नाही तकलादू नाहीत .असेच चालले तर काय होईल ...! बंधू भगिनींनो कोरोना पासून दूर रहाण्याची योग्य ती काळजी घ्या पण त्याची लागण आपल्या मनावर होऊ देऊ नका, माणुसकी वाया जाऊ देऊ नका आणि आपल्या भारतातील शांती नाहीशी करू नका.