रंगुनी रंगात साऱ्या
रंगुनी रंगात साऱ्या
खरच आहे ही सृष्टी विविध रंगांनी सजली आहे. तीला सजवणारा रंगारी परमेश्वर आहे. हाती कुंचला घेऊन त्याने अवघी सृष्टी रसंगीबेरंगी करून टाकली. सुर्यकिरणामध्ये सात रंग सामावलेले असतात. लाल निळा पिवळा हे त्रिमूर्ती, तीन प्रमुख रंग. याच तीन मूळ रंगांच्या मिश्रणातून अनेक रंग निर्माण होतात. रंग हे आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य घटक आहे. प्रत्येक रंगांचं महत्व वेगवेगळे . तरीही त्यांना आपल्या रंगातील गुणांची घमेंड नसते. ज्याचे त्याचे स्थान, महत्व वेगवेगळे. पण हेच सारे रंग एक झाले तर पांढरा रंग निर्माण होतो जो शांततेचा प्रतीक आहे .
आपल्या दैनंदीन जीवनात आपण रंगांशी फार निगडीत असतो. हेच पहा एक विवाहित स्त्री हळदीकुंकू हे सौभाग्याचे लेण लेते. कुंकू लाल आणि हळद पिवळी. आपल्या रक्ताचा रंग लाल. लाल रंग हा रजोगुणी रंग आहे. पिवळा रंग हा धर्माचा सात्विक रंग आहे आणि हा सत्वगुणी रंग आहे. तिच्या हातातील चुडा हिरव्यारंगाचा जो भरभराटीशी निगडीत आहे. तसेच हा रंग बुद्धिशी निगडीत आहे, यश देणारा आहे. स्त्रीच्या गळ्यातील सौभाग्याच्या पोतीचा रंग काळा. बरेच जण काळा रंग अशुभ मानतात. पण नेहमी वाईटातून चांगले शोधावे. स
्त्रीच्या पाठीवर सळसळणारी काळी वेणी तिच्या सौंदर्यात भर पाडते. लहान मुलांना नजर नको लागायला म्हणून काळा तीट लावतात. कोकिळेचा रंग काळा असला तरी ती मंजुळ स्वराने सार्यांना भुलवते.
पहाट झाली की निळ्या आकाश केशरी होऊन जाते. हिरवेगार शेत डौलाने डोलू लागते. रंग हे मनुष्याला मानसीक आनंद देतात,नवचेतना देतात. या रंगांचा मोह देवांनाही झाला आणि त्यांनी आपआपल्या आवडत्या रंगांची निवड केली. कस म्हणून काय विचारता थोडा विचार करा .गणपती बाप्पाला लाल रंगाचे जास्वंद खूप आवडते. शंकराच्या पिंडीवर हिरव्या रंगाचे बेलपत्र वाहीले जाते.जेजुरीच्या खंडेरायाला पिवळ्या रंगाच्या भंडाराची उधळण खूप आवडते. कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या दारी गुलाबी रंगाच्या गुलालाची उधळण करतात. सर्व जगाच्या विठूमाऊलीला काळ्या रंगाचा बुक्का फार आवडतो. श्री क्षेत्री गाणगापूरी असलेल्या दत्तांना सफेद रंगाचे भस्म फारच आवडते. रामभक्त मारुतीरायला शेंदरी रंगाची उटी आवडते. अशा या रंगांचा मोह देवांनासुद्धा पडला मग मनुष्याचे काय. काळ्या ढगामध्ये पांढरी वीज दाखवणाऱ्या त्या परमेश्वराचे रंगीबेरंगी सृष्टी निर्माण केल्याबद्दल शतशः ऋणी आहे मी.