पारा
पारा
जन्म आणि मृत्यू यामधील आयुष्य सुंदरतेने जगण्यासाठी माणसावर प्रेम केले पाहिजे. जीवन विविध रंगांनी सजवले पाहिजे. उत्तम सवयी, सकारात्मक दृष्टिकोन, उपासना, उपक्रमशीलता आणि उत्साह हे जगण्याचे सुंदर मार्ग आहेत. ज्याला जगायचे कशासाठी समजले त्याला जगण्याचा खरा गुरूमंत्र सापडला असे म्हणता येईल. आत्मविकासासाठी ज्ञानाची गरज आहे.
मानवी व्यक्तिमत्त्व हे जीवनाचे श्रेष्ठ मूल्य आहे. आयुष्यभर जपलेल्या मूल्यांवर जीवनाची सार्थकता अवलंबून असते. ज्ञान हे नव्या जगाचे भांडवल आहे. आपल्या जीवनात आपल्यालाच रंग भरता आले पाहिजे म्हणजे जीवन सुखकर होते
.
रंग आणि माणूस यांचं गहिरं नातं आहे. निसर्गात अनेकानेक रंग आहेत. प्रत्येकाचा रुबाब वेगळा, मोहकता वेगळी. मूळ रंग कितीही असोत पण एका रंगात दुसरा मिसळून जे मिश्रण बनतं ना त्याला तोड नाही. माणसाच्या स्वभावांनाही रंग असतात. कधी ते भडक असतात, कधी मवाळ, कधी मृदु मुलायम तर कधी दुष्ट खुनशी. त्यांच्या रंगानुसार त्यांचं वर्तन असतं. मानवी रंगांचा हा खेळ मात्र कधीतरी जीवघेणा ठरु शकतो. त्यांच्यासाठी आणि दुसर्यांसाठी पण! हीच माणसं सरड्यासारखी रंग बदलतात तेव्हा त्या रंग बदलाची घृणा वाटते. माणसानं कसं नितळ असावं. पार्यासारखं शुद्ध....!