Vasudha Naik

Others

2  

Vasudha Naik

Others

शिक्षक

शिक्षक

5 mins
38


शि.. शिकण्यास कायम तत्पर

क्ष... क्षमाशील व्यक्तिमत्व

क... कर्तव्याची जाण असलेला

   तर अशा या शिक्षकाला पूर्वी समाजामध्ये खूप मान होता. पूर्वी आपले शिक्षक आपल्यासमोर आले तर आपण रस्ता बदलून दुसरीकडे जायचं. कारण का तर त्यांचा मान ठेवण्यासाठी. आपले शिक्षक कुठेही दिसले,कधीही दिसले तरी त्यांच्या कायम आपण पाया पडत होतो.रिस्पेक्ट करत होतो."छडी लागे छम छम विद्या येई घमघम "या वाक्याची प्रचिती कायम त्यावेळी आलेली आहे.

  पूर्वी शिक्षकांना पगार कमी होते. परंतु शिक्षण छान होते. एकदा मूल शिक्षकांच्या ताब्यात दिले की, पालक परत शिक्षकांची तक्रार घेऊन कधीच येत नव्हते.

  मुलाला एखादा फटका मारला तरी सुद्धा शिक्षक हे मुलाच्या प्रगती साठीच करतात हे त्यांचे म्हणणे असायचे. कधीही परत पालक वर्ग हा शिक्षकांना उलट बोलण्यासाठी शाळेत येत नव्हता. तुम्ही आमच्या मुलांना का मारलेत? हा प्रश्न तर कधीच येत नव्हता. उलट पालक वर्ग म्हणत असायचा तुम्ही त्याला मारा,चोपा पण शिकवा. आम्ही काहीही तुम्हाला बोलणार नाही. 

   शिक्षक स्वतः,स्वतःच विश्व निर्माण करू शकत होता. स्वतःचा आनंद,हर्ष मुलांमध्ये शोधत होता. अध्यापन उत्तम करत होता. शिक्षकाला कोणाचेही वर्चस्व नव्हते. म्हणून तो कामच करत नव्हता असं नाही. पण आनंदाने काम करत होता. पगार कमी जरी असला तरी महागाई नव्हती.

  त्याकाळी सुद्धा मुलं डिस्टिंक्शन मध्ये येतच होती की, त्या काळची मुलं सुद्धा डॉक्टर,इंजिनियर,वकील झालीच की.

  सांगण्याचा मुद्दा हा की, आत्त्ताचा शिक्षक सुद्धा प्रामाणिकच आहे. तो सुद्धा मुलांना जीव तोडून शिकवतच आहे. पण काही शासकीय धोरणानुसार, मुलांना छडी मारायची नाही, अपमान होईल असे शब्द वापरायचे नाही. त्यांच्याच कलेने घ्यायचं. विद्यार्थी नापास करायचा नाही. वयानुरूप विद्यार्थ्याला प्रवेश द्यायचा. या सर्व नियमांमुळे पालक वर्ग मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करतोय असे वाटत आहे.

  वर्गात मुलांच्या हजेरीचे प्रमाण कमी होत आहे.मुलांना बोलायचे नाही तर वर्ग शांत बसवण्यासाठी जरा जरी आपण काही बोललो तर पालक लगेचच विचारायला येतात. छडी मारणे तर दूरच राहिले.

  पण मूल खूप त्रास देत असेल तर एखादा फटका जरी मारला,तरी पालक वाद घालायला लगेचच येतात.ते त्यांच्या मुलांना घरी बेदम ठोकतील, अगदी चटका पण देतील पण शिक्षकाने हात लावलेला चालत नाही.

  अगदी कमी पालक असे आहेत की ज्यांना आपल्या मुलांना खरंच शिकवायचं आहे आणि मुलांना शिस्त लावायची आहे असे पालक सांगतात आणि म्हणतात "बाई आमच्या मुलांना शिक्षा केली तरी चालेल पण मुलांना शिकवा,समजून सांगा त्यांना शिक्षा करा आम्ही काही बोलणार नाही."

  शिक्षक खरंच एवढा वेडा आहे का? मुलांना सतत मारत सुटतो का? मुलांना सतत शिक्षा करत असतो का?

   शिक्षकांपुढे ही जी लहान मुले आहेत ना,ती अगदी मातीच्या गोळ्या प्रमाणे असतात . त्याचा पूर्ण घडा बनवायचा असतो. त्याला शिकून सोडून मोठा करायचा असतो. संस्काररूपी विचार त्याच्या मनावर रुजवायचे असतात. बोधकथेतून त्याच्या मनाची सांगड घालून त्याला उत्तम नागरिक बनवायचे असते. अ,आ, ई शिकवून त्याला मोठं करायचं असतं. समाजाचा एक उत्तम नागरिक बनवायचं असतं.

  यातूनच मग कोण सैनिक होणार आहे,पुढे डॉक्टर होणार आहे,कोण इंजिनियर होणार आहे,तर कोणी वकील होणार आहे,तर कोणी मस्त ऑफिस मध्ये आपली बॅग घेऊन ऑफिसर म्हणून जाणार आहे.अगदी थाटात...

   पण जे शिकत नाहीत ना मुलं, अशी मुलं ती पण व्यवसायामध्ये पुढे जातातच, पण त्यांचे व्यवहार ज्ञान कमी पडते. संबंधित समाजात वावरताना त्यांची धांदल उडते.

  आता जरा शिक्षकांच्या पगाराकडे वळूया. शिक्षकांचे पगार जरा छान आहेत. पूर्वी पन्नास रुपयांपासून शिक्षकांनी काम केलेली आहेत. मी स्वतः 1996 साली 150 रुपयांवर काम केलेलं आहे.

  आता शिक्षकांचे पगार छान झालेले आहेत. याबद्दल मी शासनाला धन्यवाद देऊ इच्छिते. पण त्याचबरोबर शिक्षकांना अशैक्षणिक कामांचा बोजा वाढलेला आहे. अशा शिक्षकांना मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हवा तसा वेळ देता येत नाही 

  अशैक्षणिक कामासाठी त्यांना बाहेर पडावे लागते. शाळेची वेळ सांभाळून त्यांना शाळेच्या वेळे नंतर ही कामे करावी लागतात.

 तुम्ही म्हणाल याचे पैसे वेगळे मिळतात. पण या पैशांचा काय उपयोग? जर मुलांसाठी शिक्षकांची नेमणूक आहे तर शिक्षकांना ही अशैक्षणिक कामे करून समाधान तर मिळत नाहीच पण मानसिकता बिघडते.

  आता तर काय सर्व ऑनलाईन काम आहेत. आणि कोणतेही ऑनलाईन काम लगेचच मागण्याची प्रवृत्ती असते. आज,आत्ता, लगेच,ताबडतोब या शब्दांनी शिक्षकांची मानसिकता बदलतेय.

   पण ह्या आमच्या लहान मुलांसाठी शिक्षकांना मानसिकता नीट ठेवून मुलांची शैक्षणिक जबाबदारी पार पाडायची असते. लेखन,वाचन आलेच पाहिजे हे मनाशी ठरवूनच त्या साठी विविध उपक्रम, प्रकल्प शिक्षक राबवत असतो.मुलांनी रोज शाळेत यावे म्हणून दर शनिवार मुलाच्या आवडीचा,दफ्तरमुक्त शाळा घेऊन हजेरी कशी वाढेल हे शिक्षक पाहतात.

  शाळेच्या व्यतिरिक्त तो घरी सुद्धा तीन ते चार तास सतत काम करत असतो.मुलांच्या प्रगतीचा आलेख वाढवण्यासाठी प्रयत्नशील असतो.

  या सर्व बाजू प्रत्येक पालक,प्रत्येक समाजाच्या घटकाने विचारात घेतल्या पाहिजेत .

   असे म्हटले जाते की शिक्षकाला पगार भरपूर आहेत. का बर आता पगार दिसतात शिक्षकांचे?

   कामाचा लोड दिसत नाही का शिक्षकांचा? सतत बोलले जाते, वाचनात येते " शिक्षकांचे पगार कमी करा, शिक्षकांच्या कामाचे तास वाढवा. "

   शिक्षक शाळेत जवळजवळ सात तास असतो. घरी रोज दोन तास काम करतो. सतत मुलांच्या प्रगतीचा विचार असतो. त्याच्या उपक्रम प्रकल्पासाठी आपण काय घेऊ शकतो, त्यासाठी नियोजन चालू असते. या लहान मुलांना कोणता पद्धतीने समजेल याचा विचार सतत चालू असतो. तर मग शिक्षकांच्या शाळेच्या अध्यापन तासिकांचा विचार केला जातो. बाकी कोणताच विचार होता.

  कालच एका बातमीमध्ये असे वाचले की शिक्षकांनी येताना थम करायचा आणि जाताना देखील थम करायचा. वेळेमध्ये जर तफावत आढळली तर शिक्षकांचा पगार कट करायचा. हे खरंच योग्य आहे का हो? याचा विचार करायला हवा.

   मग घरातील शिक्षक कामाच्या तासांचा कोण विचार करतो का?

   माझे म्हणणे एवढेच आहे की उठ सुट शिक्षकांच्या पगारावर आपण बोलू नये. शिक्षकांच्या कामाचा आढावा घ्यावा. एक शिक्षक काय करू शकतो हे पहावे.

  एका शिक्षकाच्या वागणुकीवरून सर्व शिक्षकांचे मोजमाप करू नये.

   मी शिक्षक आहे याचा मला खूप अभिमान आहे. शिक्षकाला पगार जरी मिळाला नाही ना तरीसुद्धा शिक्षक शिकवायचे विसरत नाही. शिक्षणाचे कधीच मोजमाप करत नाही.

  आणि सलाम माझा समस्त शिक्षक वर्गाला. ज्याने मातीचा गोळा आज पूर्ण घड्यात बदलला.

 "शिक्षक हा शाळारुपी माळी आहे "असे म्हटले जाते. कारण जसे माळी रोप लावतो. त्याची निगा राखतो.त्याला खत पाणी घालून रूपाला वाढवतो, आणि वटवृक्षांमध्ये रूपांतर करतो.  त्याप्रमाणे शिक्षक आलेल्या लहान मुलाला संस्कारांचे खत पाणी घालून,मूल्य रुजवून, अध्यापन त्याला मोठा करत असतो आणि उद्याचा भावी नागरिक बनवत असतो.

   चला तर थांबते आता... यावर लिहिण्यासाखे खूप आहे.


Rate this content
Log in