शेतकरी जगला तर देश टिकेल...
शेतकरी जगला तर देश टिकेल...
"शेतकरी जगला तर देश टिकेल "
उपाशीपोटी राहून कोणीही देशभक्त होऊ शकत नाही. पण भरलेली पोटं बेईमान झाली तर त्यासारखं दुर्दैवंही नाही. आता बेईमान म्हणन्याचा
अर्थ असा, की ज्यांच्या कष्टानं, मेहनतीनं आपल्या ताटात भाकरी आली त्या अन्नदात्याला विसरून आणि त्याची साधी जाणीवही आपणास राहिली नाही तर देशभक्ती आणि इतर गप्पा या निव्वळ पोकळ ठरल्या वाचून राहणार नाहीत. या भारत देशात कृषी हा एकमेव सर्वाधीक केला जाणारा व्यवसायआहे आणि म्हणूनच भारताला कृषी प्रधाण राष्ट्र म्हणून ओळखले जाते.. पण सरकार आणि निसर्ग यांच्या कचाट्यात सापडलेली शेती आणि शेतकरी मरणोत्सव साजरा करते आहे, अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि त्यांच्या आत्महत्याचे आम्हाला काहीच वाटत नाही.आमच्या संवेदना गोठून गेल्या आहेत. पण दाताच नसतो तिथे झोळी पसरली काय किंवा ओंजळ केली काय, ती रितीच राहणार आहे... म्हणून दात्याचे स्मरण असावे विस्मरण नसावे. शेतात पेरल्यालं पदरात पडे पर्यंत कशाचाच भरोसा नसतो.निसर्गाचं अवेळी बरसणं, कधी दुष्काळ तर कधी नको तेवढी रिपरिप तर कधी गारपीट अशा अनेक दिव्यातून शेतकरी वाट काढत पुढं जात असतो.
पण त्याच्यासाठी ना कोणता वेतन आयोग ना कोणती जीवन फुलवणारी योजना. राबराब राबणारे हात, उन्हं झेलत कष्टणारे, पावसात बेणनी करणारे कष्टकरी,रक्ताला गोठवून आणि आठवून शेती पिकवणारा शेतकरी खऱ्या अर्थानं आजही दुर्लक्षित आहे. एसी. मध्ये राहून शेती तंत्र विकसीत करणारे असो वा ताटात आलेली भाकरी किती आणि कोणाच्या कष्टानं ओतपोत झालेली आहे. आणि त्यामागे कोणाची किती मेहनत आहे याची किंचितही जाण नसणारे हे देशभक्तीचे आणि सबुरीचे सल्ले देत असतात. पण कधी भेगाळलेल्या पायाला चिखलाचा मलम लावून, तर आग ओकणाऱ्या सूर्याला डोक्यावरील मुंडास्याने रोखणाऱ्या कृषकाला शहरी झगमगाटात वावरणाऱ्या, डांबरी रस्त्यावरून धावणाऱ्या आण
ि पायाला घाण लागते म्हणून जेवतानाही चप्पल न काढणाऱ्या लोकांना वेदना आणि दुःख काय असते याची पुसटशी तरी जाणीव असेल काय...?
महात्मा गांधीनी 'खेडयाकडे चला' नारा दिला, पण आज शहरीकरण आणि शहराचे आकर्षण वाढत आहे. तसेच वाढत्या औद्योगिकरणामुळे शेती क्षेत्र कमी होत आहे. सुखशाली जगण्याची जीवनशैली सर्वांना खुणावत आहे. त्यात निसर्गाची लहर आणि शासनाचा कहर याने कृषक पुरता खचून गेला आहे.तेव्हा खचलेली मनं आणि पिचलेली मनगटं उभारी येण्यास वेळ लागतो आहे. शेतकऱ्यांना फुकट कांही देण्यापेक्षा नियमित आणि सुरुळीत दयावे. शेतातील वारंवार जाणारी वीज उभ्या पिकाचा जीव घेते. योग्य दाबानं नियमित वीजपुरवठा शेतकऱ्याच्या पिकाला वाढवल्याशिवाय राहणार नाही.पिक पाणी जोमात असताना शेतकरी फुकट कांही मागणार नाही.पिकवलेल्या मालाला हमीभाव मिळाला तर शेतकरी केलेले कष्ट विसरून नव्या जोमानं आणि उमेदीनं आपणास अन्न पुरवठा करेल यात शंका नाही.पण जे चित्र काल होते ,परवा होते तसेच कमी आधिक प्रमाणात आजही आहे. संत तुकारामांनी शेतकऱ्यांचे मांडलेले दुःख असो वा अलिकडे महात्मा ज्योतिराव फुले .यांनी मांडलेले दुःख असो , या दुःखात फारसा फरक झालेला दिसत नाही.. अक्षरशुन्य राहिलेल्या पिढीला त्या त्या काळातील स्वतःला ज्ञानी म्हणवून घेणाऱ्यानी पिळून काढलं आर्थिक व शारीरिक बाबीत. पण शेतकरी हालापेष्टा झेलत उभा होता आणि उभा आहे. शेतकरी जगला पाहिजे असं आपणास वाटत असेल तर केंद्रीय पातळीवर व राज्यस्तरावरही शेतीला उदयोगाचा दर्जा दिला पाहिजे. या बाबत चर्चा होऊन अंमल झाला पाहिजे. औदयोगिक क्षेत्रात होणारे बदल आणि शासनाचा त्या बाजूने असणारा कल व त्याचा उद्योगपती घेत असणारा फायदा लक्षात घेता शेती हा उद्योग म्हणूनच मान्यता पावली पाहिजे. तर शेतकऱ्यास न्याय मिळाल्यासारखे होईल तो जगेल आणि देश टिकेल... !!