Avanee Gokhale-Tekale

Others

3  

Avanee Gokhale-Tekale

Others

रियाझ, चंद्रघंटा आणि ती..

रियाझ, चंद्रघंटा आणि ती..

3 mins
607


काल तिनी एका प्रसिद्ध कवी च्या मुलाखतीमध्ये ऐकले होते की गायक किंवा चित्रकार जसा रियाझ करतो तसे लेखकाने देखील रियाझ केला पाहिजे.. तेव्हा पासून तिच्या मनात ते वाक्य फिरत होते.. ती सारखा विचार करत होती कि आपण पण रोज रियाझ करायचा.. म्हणजे नेमके आपण काय काय करू शकतो.. तिनी ठरवलं रोज काहीतरी लिहिले पाहिजे.. काहीतरी वाचले पाहिजे.. रोजच्या धावपळीमध्ये थोडा वेळ स्वतःला दिला पाहिजे.. 

तिनी खास लवकर चा गजर लावला होता.. सकाळी जरा walk ला जाऊ उठून.. मग थोडा सूर्योदय वगैरे बघता बघता काहीतरी सुचेल कदाचित.. पण कसलं काय.. उठली आणि लक्षात आलं की आज कुसूम ची सुट्टी आहे.. (कुसूम म्हणजे तिची कामवाली.. मुलाला बरं नाही कळल्यावर हिनीच तर सांगितलं होतं तिला कि येऊ नको दोन दिवस कामावर.. आणि वर पैसे पण दिले होते दवाखान्यात जायला.. ) मग कसलं walk आणि काय.. ती उठली तेच kitchen मध्ये गेली.. गॅस वर एका बाजूला पोहे, मध्ये साबुदाणा खिचडी(हो घरात काही जणांचे नवरात्रीचे उपास होते ना..) आणि तिसऱ्या शेगडी वर भाजी शिजायला ठेवली आणि तिनी भांडी घासायला घेतली.. सगळ्यांचे नाश्ते, डबे तयार केले.. मुलांना तयार करून शाळेत सोडले आणि ती बसली ५ मिनिट निवांत.. नाश्ता आणि चहा घ्यायला.. पटकन पेपरमधल्या headline वर नजर टाकली.. आज नवरात्रीची तिसरी माळ.. देवाची थोडक्यात पूजा करून मग ऑफिस साठी आवरायला गेली ती.. 

मध्यम उंची, सावळा वर्ण, गडबडीमुळे जाड व्हायला वेळच मिळाला नाही म्हणून राहिलेला सडपातळ बांधा, केसांचा step cut, लाल plain सिल्क ची साडी आणि त्याला golden मोठे काठ आणि गोल्डन पदर.. नाजुकशी लाल टिकली.. कानात गळ्यात माणकांचा सेट आणि त्याखाली आलेले नाजूक मंगळसूत्र.. हातात मोती, माणिक असलेले नाजूक गोठ.. आणि हलकासा make-up.. म्हणलं तर traditional आणि म्हणलं तर professional.. क्षणभर ती थबकून स्वतःकडे बघत राहिली.. केसातल्या क्लिप मध्ये लावलेला गजरा आपल्या ऑफिस च्या काचेच्या बिल्डिंग मध्ये "जरा जास्तच होतंय का" हा विचार करत तिनी परत काढून पाण्यात घालून ठेवला आणि गळ्यात ऑफिस चे I-card लटकावून, खांद्याला लॅपटॉप बॅग टांगून निघाली ती.. एकीकडे विचार चालूच होते.. आज काहीही झालं तरी काहीतरी वाचायचं आणि काहीतरी लिहायचं.. रियाझ चुकला नाही पाहिजे.. मग पटकन एक कवितांचे पुस्तक टाकलेच तिनी बॅग मध्ये निघता निघता.. ट्रेन मध्ये पळत जाऊन window seat पकडू.. निवांत थोडे वाचले काही म्हणजे सुचेल काहीतरी लिहायला..

ट्रेन पळत पकडली खरी पण आज नेमके बसायचे सुख नव्हते.. एका हातात बॅग सावरत दुसऱ्या हातात छत्री(कोणी सांगावा पावसाचा भरवसा, ठेवावी निदान दसऱ्या पर्यंत सोबत म्हणून निघता निघता हातात घेतलेली) त्यामुळे वाचायचे राहून गेले.. शेवटी ट्रेन मधल्या बायकांबरोबर साडया, नवरात्र आणि recipe अशा विषयांवर गप्पा मारण्यात गुंग झाली ती.. 

ऑफिस मध्ये तर कसलाच विचार करायला वेळ नाही मिळाला तिला.. त्याच दिवशी प्रोजेक्ट deploy असल्यामुळे तिथे वेगळीच धूम.. बॉस च्या अंगात तर बाजीप्रभू संचारला होता.. गडावर तोफेचे बार ऐकू येईपर्यंत सगळे झुंज देत होते.. शेवटी एकदाचा code deploy झाला आणि सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला.. मग success celebration म्हणून आणलेला pizza खाणे, फोटो काढणे सगळे सोपस्कार करून निघेपर्यंत अंधार पडला होता..

परत एकदा धावत पळत ट्रेन पकडली.. सगळ्या बायकांच्या मध्ये चेंगरून उभे असताना कमरेतून तळपायापर्यंत एक सणक गेली एकदम.. एकदम ताकद गेल्यासारखे झाले.. पायात गोळे आले.. तिनी तारीख आठवली परत एकदा आणि स्तब्ध झाली ती जागेवरच.. आता फक्त फार उशीर व्हायच्या आत घरापर्यंत पोहोचाव म्हणजे झाले..घरी पोचली तर तिचा चेहरा बघूनच नवऱ्यानी सरबत आणून दिले हातात.. त्यातच केवढी उभारी मिळाली तिला.. सगळे घर जेवण करून झोपाळले आणि मग तिनी डोळे मिटले..

हे रियाझ वगैरे काही आपल्याला झेपण्यातले काम नाही.. इथे श्वास घ्यायला उसंत मिळेना.. आणि त्यात कसले काय रोज लिहायला वेळ मिळणारे.. आणि सुचले तर पाहिजे काही.. आंबलेले अंग करंजी च्या आकारात गुंडाळून डोळे मिटून पडली ती.. आणि तिच्या डोळ्यासमोर लक्खकन दिसली.. लाल साडी नेसलेली, लाल भडक कुंकवाचा मळवट भरलेली चंद्रघंटा.. चेहरा थोडा ओळखीचा वाटला तिला.. सकाळी आरशात निरखून पाहिलेला चेहरा थोडासा असाच होता असं उगीचच वाटून गेलं तिला.. आणि काहीश्या उत्साहात तिनी आपले डायरी आणि पेन काढले.. एकटाकी लेख लिहून पूर्ण केला तिने.. तिच्या नकळत तिचा रियाझ चालूच तर होता दिवसभर.. सकाळी पाण्यात काढून ठेवलेला गजरा अजूनही तिच्याकडे बघून हसत होता.. Rate this content
Log in