Shraddha More

Others


3.6  

Shraddha More

Others


रात्रीची जादू…

रात्रीची जादू…

2 mins 481 2 mins 481

दिवसा नुसती कटकट, शब्दांचा ब्लास्ट असतो. समोरचा माणूस काय बोलतोय हे सुद्धा कधी कधी ऐकू येत नाही. सतत काहीनकाही सुरू असतं. दिवसभरातल्या कामांची लिस्ट तयारच असते. सतत अलर्ट… सगळ्यांची धावपळ. सगळीकडे नुसता गाजावाजा… पण रात्री हे सगळं थांबलेलं असतं. रात्र ही फक्त आपली असते. आजूबाजूचे सगळे झोपलेले असतात. घरात सुद्धा शांतता. पिन पडल्यावरसुद्धा आवाज येईल इतकं सगळं शांत असतं. सकाळी घड्याळात किती वाजले ते बघायला सुद्धा पुरेसा वेळ नसतो पण रात्री त्याच घड्याळाची टिकटिक अगदी स्पष्ट ऐकू येते. शेजारच्या घरात सुरू असणारा टीव्ही चा आवाज असा कानावर येतो की आपल्याच घरात टीव्ही सुरू आहे. थोड्यावेळाने कुत्र्याचं भुंकणं, त्याचे वेगवेगळे रडण्याचे-ओरडण्याचे आवाज... सगळं काही असतं. ते ऐकून मग अंदाज लावायचा, त्यांना भूक लागली असेल का, कोणी अनोळखी माणूस आलाय का…अस सगळंच… आणि नंतरच्या नीरव शांततेत रातकिड्यांचा आवाज हा एखाद्या कवीला कवितेच्या चालीसारखा वाटणारा.

पावसाळ्यात रात्रीत खिडकी म्हणजे तर……….…

पावसाचा आवाज , ढगांचा गडगडाट, विजांची कडकडाट, वाऱ्याची गार झुळूक… सगळंच खूप भारी असत. पावसाचा ओलावा सगळं काही देऊन जातो. रात्रीच्या अंधारात खिडकीच्या बाहेर हात घालून हातावर झेललेले पावसाचे थेंब आणि खिडकीतून चेहऱ्यावर उडणारे पावसाचे फवारे… यापेक्षा सुंदर काय असू शकत.. जे काही दिवसा करू शकत नाही ते सर्व रात्री करता येत. लाज, ऑक्वर्डनेस अस काहीच नसतं. आपण आपल्या मनासारखं जगत असतो. रात्रीची लय च वेगळी असते. रात्री खूप काही सुचत असतं, जाणवत असतं, मन मोकळं होऊन जातं या रात्रीत.

रात्रीची खरी मजा तर घराबाहेरच असते. घरात कस सगळं बंदबंद असतं. बाहेर संपूर्ण आकाश मोकळं असत. गावी तर अंगणात नाहीतर गच्चीवर झोपायचं… मस्त रात्रीच्या गप्पा… वर आकाशात पाहिलं की मग जाणवतं की किती मोठं आणि अफाट आहे हे आभाळ. अगदी मोकळं… पण चांदण्यांनी गच्च भरलेलं. त्या मोकळ्या आकाशात फक्त एक चंद्र आणि खूप चांदण्या यांनी सर्व उजाळून टाकल्यासारखं वाटतं.

शहरात तर घराबाहेर फिरायचं, मस्त बाईकवर…अगदी मध्यरात्री… बाहेरच जग किती सुंदर असत हे बघायचं. रात्री जाण्याची जरा भीती असतेच, कितीहि झालं तरी मुलगी आहे, भीती तर वाटणारच. पण तरीही जायचं. रात्रीच्या काळोखात, मोकळ्या आकाशात समुद्र पाहायचा आणि त्या समुद्राला बिलगलेला तो चंद्र आणि त्यांना धरून ठेवणाऱ्या चांदण्या…… रस्त्यावर सुसाटपणे जाणाऱ्या गाड्या… सायकल वर चहा-कॉफी विकणारे आणि ते विकत घेणारे रात्रप्रेमी… अशी रात्रीच्या दुनियेत रात्री अडीच-तीन वाजता सायकल वर कॉफी पिण्याची मजा स्टार बक्स च्या कॉफी ला सुद्धा नसेल.

रात्री सर्व काही न्याहाळण्यासारखं असतं. प्रत्येक गोष्टीकडे आपण आकर्षित होतो. प्रत्येक आवाज नवीन सूर घेऊन येतो. मग तो पाऊस असो किंवा रस्त्यावर जाणाऱ्या गाड्या. थंडीची रात्र, त्या रात्रीतली शेकोटी, शेकोटीवर भाजलेला मका, आई गं......!

खरंच किती सुंदर आहे आहे हे. ही रात्रीची जादू खरंच भारावून जाण्यासारखी आहे.


Rate this content
Log in