The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

Shraddha More

Others

4.7  

Shraddha More

Others

बालपण देगा देवा…!🤗

बालपण देगा देवा…!🤗

3 mins
859


बालपण... 'बाल' या शब्दातच किती गोडवा आहे ना...? आपल्या जीवनातील सर्वात सुंदर आणि आनंदमय असणारा क्षण म्हणजे बालपण . बालपणासारखे रमणीय अनुभव कोणतेच नाही. मला तरी असच वाटत. माझ्यानते तुम्हाला देखील असच वाटत असेल , हो ना…?

बालपण हे असतच इतकं मजेशीर, प्रत्येक क्षणातून, अनुभवातून आंनद देणार. नुकत्याच जन्मलेल्या बाळाचंच उदाहरण घ्या ना, त्याला कसलीच काळजी नसते, कसलेच विचार नसतात. आरामात उठायचं, आणि रात्री आरामात झोपायचं. आपल्याला भूक लागली की रडायचं, काही मिळवायच असेल तर रडायचं म्हणजे लगेचच आपल्या समोर ती गोष्ट किंवा पदार्थ हजर. याउलट तरुणपणात सतत विचार चालूच असतात. कोण चांगले विचार करत असतात तर कोण वाईट. प्रत्येकाला कोणत्या न कोणत्या गोष्टीची काळजी असतेच. कॉलेजला जाणाऱ्यांना नवीन प्रवास सुरु होणार याची काळजी, ऑफिस ला जाणाऱ्यांना ऑफिस नधल्या कामाची काळजी, वैवाहिक बंधनात अडकलेल्या लोकांना त्यांच्या संसाराची काळजी आणि वयोवृद्ध आजी-आजोबांना तर संपूर्ण जगाचीच काळजी. रोज सकाळी लवकर उठा आणि रात्री पण उशिरा झोप अशी परिस्थिती असते. एखादी गोष्ट हवी असेल तर रडणं शक्यच नाही, नोठे झालो ना आता.…

बालपणातील जीवनात खेळच खेळ असायचे आणि आता…जीवनच एक खेळ आहे. लहानपणी पहिल्या पावसात भिजयची एक वेगळीच मजा असते. मनसोक्त भिजायचं, गाणी गायची, लहानलहान कागदाच्या होड्या करून पाण्यात सोडायच्या, चिखलात खेळायचं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सर्व क्षण मित्रमैत्रिणीबरोबर अनुभवायचे…भिजून घरी गेल्यानंतर भिजलेल्या ओल्या कपड्यातच आईने बनवलेल्या गरमागरम भाजीचा आस्वाद…आहाहा…! आता जर भिजलेल्या कपड्यात घरी आलो तर भजी तर सोडाच उलट आपल्यावर अजून ओरडांचाच वर्षाव होतो. पहिल्या पावसाची ओढ आजही तितकीच असते. पण त्या पावसात मिसळून जायला कोणाकडे वेळच नसतो. बहुतेक वेळा पाऊस अश्यावेळी पडतो की ज्यावेळी आम्ही कॉलेज मध्ये किंवा कलासमध्ये असतो, मग तर काय…!

लहानपणात एक नवीन उत्साह असतो. प्रत्येक गोष्टीची जिद्द असते. लहान बाळ चालायला शिकत असेल तर लक्ष देऊन पाहिलं तर कळेल ते किती वेळा खाली पडतं. एक ठिकाणी पडलं तर लगेच ढोपरांनि दुसऱ्या जागी जाऊन, जिथे आधार मिळेल अश्या ठिकाणी जाऊन उठायचं प्रयत्न करतो आणि जेव्हा खरच तो आधार घेऊन उभा राहतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर वेगळच हसू येत. पण आता एखाद्या अनुभवात आपण चुकलो, हरलो तर तिथेच थांबतो. एवढा वेळ झाला प्रयत्न करतोय यशच मिळत नाही तर पुढे काय मिळणार असा विचार करून ती गोष्ट तिथेच सोडून देतो. ती जिद्द आपल्या सरलेल्या लहानपणाबरोबर लहान होऊन जाते.

लहानपणी या संपूर्ण जगात आपणच सुंदर , सगळ्यांचे आवडते आहोत असं वाटत असत आणि खरच आपण सगळ्यांचेच आवडते असतो. घरात नवीन पाहून आला की घरच्यांची विचारपूस नंतर पण आपली विचारपूस आधी करतो. गालगुच्चे घेतो, चॉकोलेट-गोळ्या आणून देतो, नवीन नवीन खेळणी आणून देतो आणि मग घरातल्या इतरांची विचारपुस चालू होते. त्यातही सर्वाधिक विषय आपल्यावरच असतात.

बालपणातील मैत्रीदेखील खूप निरागस असते. कोणाकडून कसलीच अपेक्षा नसते, विशेषतः मित्र-मैत्रीण या दोघांमध्ये तर विशेष मैत्री असते. अगदी शाळेत बाकावर शेजारीशेजारी बसा, एकत्र डबा खा, एकमेकांच मजेशीर कौतुक करा, हातात हात घालून फिरा, या सर्व गोष्टींमध्ये प्रेम असत , प्रेम म्हणाले तर वेगळंच विचार आले असतील ना…? पण तसं काहीच नाही आहे, त्या मित्रमैत्रिणी मध्ये फक्त मैत्रीच प्रेम असत. अगदी निखळ, निरागस, अतिशय स्वच्छ पाण्यासारखं. त्यांच्या प्रेमात आकर्षणाची ओढ नसते तर मैत्रीची ओढ असते. लहान मुलांची ही मैत्री पाहण्यात प्रत्येकाला कौतुक असतं. पण आता प्रेम म्हणाले तरी प्रत्येकाच्या विचारात फरक पडतो. मुलगा आणि मुलगी फक्त मित्र असूच शकत नाही असं त्यांना वाटतं. मुलाने मुलीचा हात पकडला, मिठी मारली म्हणजे या दोघांमध्ये काहीतरी आहे असाच विचार प्रत्येकाच्या मनात डोकावतो. अगदी भाऊ-बहिण असले तरी, लोकांच्या या नजरेमुळे आता आता काय निखळ मैत्री करणार म्हणा …

आता या गोष्टी पुढे चालूच राहणार आहेत. याला काहीच उपाय नाही. आपल्यापुढे वाईट प्रसंग आले की बालपणातील सुंदर क्षण आठवायचे आणि नवीन उमेद घेऊन जगायचं एवढंच माहीत आहे. पण आपण कितीही मोठे झालो तरी एकदा तरी पुन्हा लहान व्हावं, लहान मुलांमध्ये मिसळून जावं, बालपणाइतका नाही पण त्या आठवणीतला आनंद अनुभवता येईल… दिवसभरातील थोडासा वेळ स्वतःला द्या, स्वतःच स्वतःशी लहान मुलांप्रमाणे बोला, बालपण नक्की आठवेल. मी तर माझ्या बालपणातील आठवणी खूप वेळ आठवते… हे वाचून तुम्हालादेखील तुमचं बालपण आठवलं असेल ना… आणि आठवलच पाहिजे त्याशिवाय ते बालपण कसलं…!


Rate this content
Log in