Shraddha More

Others

5.0  

Shraddha More

Others

ओ…वुमनिया!

ओ…वुमनिया!

4 mins
412


आत्ताच महिला दिन होऊन गेला. टीव्ही वर महिलांसाठी विशेष कार्यक्रम दाखवले गेले. सोशल मीडियावर म्हणजेच व्हॉट्सऍप, इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवले गेले. कोणी शायरी तर कोणी कविता. यातलं स्वरचित तर खूप कमीच असेल, गुगल वर शोधलं आणि महिला दिन म्हणून स्टेटसवर ठेवलं. यात काही वावगं नाही म्हणा… निदान एक दिवशी तरी कोणत्याही माध्यमाने का होईना पण महिलांचं कौतुक केलं जात होतं. महिला किती ताकदवान आहेत, किती सुशिक्षित आहेत याची उदाहरणं होती.

सध्याच्या परिस्थितीत तर फक्त एकच दिवस मर्यादित नसून इतरवेळीसुद्धा स्त्रियांचं बऱ्यापैकी कौतुक केलं जातं ही,पण आधी तस नव्हतं. पूर्वी तर साधं मुलींनी शिक्षण घेणंसुद्धा एखादा गुन्हा केल्यासारखं होत. परपुरुषांशी बोलायचं नाही. मान वर करून पाहायचं नाही. सतत डोक्यावर पदर. स्त्रियांची व्याख्या म्हणजे चूल आणि मूल ! इतकीच. सावित्रीबाई फुले यांनी महिला असून पुढाकार घेऊन स्त्री शिक्षणाला सुरुवात केली. त्यांनी केलेल्या मेहनतीचं फळ म्हणचे आजची सुशिक्षित स्त्री.


स्त्रियांना सुशिक्षित करता करता सुशिक्षित असूनही न शिकलेल्या माणसाप्रमाणे वागणाऱ्या क्रूर माणसांकडे मात्र कोणीच लक्ष दिलं नाही. सतत मुलींनाच फक्त नियम… सातच्या आत घरी यायचं, मोठमोठ्याने हसायचं नाही, अस नाही चालायचं, तसं नाही बसायचं, असेच कपडे घालायचे, तसंच राहणीमान ठेवायचं.

अरे पण का……? मुलींचं राहणीमान कसं असावं हे ती मुलगी स्वतः ठरवेल ना… इतकी सक्षम तर ती नक्कीच आहे. वाईट या गोष्टीचं वाटत की पुढे जाणाऱ्या मुलींचे पाय खेचणाऱ्यांमध्ये साक्षात स्त्रीयादेखील पुढाकार घेत असतात. स्त्रियांचीच मतं स्त्रियांनाच समजू शकत नसतील तर इतरांकडून काहीच अपेक्षा उरत नाही. रस्त्यावर एखादी मुलगी क्रॉप टॉप मध्ये दिसली की चार बायका त्यांच्या कपड्यांवरून त्यांना हिणवतात. अरे तुम्ही पूर्वीपासून जे ब्लाउज घालता ते तर पूर्णच क्रॉप असतं. तेव्हा पोट दिसत नाही का. मुलीच्या ड्रेसचा गळा जरा मोठा असलेला त्यांना चालत नाही पण तेच ब्लाउजचा गळा पूर्ण उघडच असतो ते दिसत नाही का…? आजींनी नेसलेल्या नऊवारी साडीतून दिसलेले पाय चालतात पण एखाद्या मुलीने घातलेले शॉट्स नाही. का…? या का चं उत्तर मात्र कोणाकडे नसतं. आईची आजी नऊवारी नेसायची, आईची आई सहावारी नसते , आई ड्रेस घालते, आईची मुलगी जीन्स घालते तशीच तिची मुलगी शॉट्स घालते. जश्या पिढ्या बदलत जातात तसेच माणसांचे विचारही बदलू शकतात. प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार, आवडीनुसार कपडे घालतो. आजी नऊवारी नसते म्हणून आई नऊवारी नेसून नाही फिरू शकत. तिच्या सोयीप्रमाणे ती ड्रेस घालते, जीन्स घालते.


कोणत्याही व्यक्तीने काय परिधान करावं हा सर्वस्वी त्या व्यक्तीचा निर्णय असावा. पुरुषमंडळी साधं टॉवेल मध्ये असली असली तरी त्यावर कोणी आक्षेप घेतं का… नाही ना! कोणाच्या कपड्यांवरून तो माणूस कसा आहे हे ठरत नसतं. एखाद्या अतिशय गरीब माणसाने नवीन कोरेकरकरित कपडे घातले म्हणजे तो श्रीमंत होतो असं नाही ना, तसंच आहे हे. कोणी कसेही कपडे घातले तरी त्या व्यक्तीचा स्वभाव आणि ती व्यक्ती ही तीच राहणार आहे. देवाला जर ठरवायचंच असतं तर त्याने जन्मतः मुलाला कपड्यातच आणलं असतं. माणूस जन्माला निर्वस्त्रच येतो. याचाच अर्थ त्याला त्याच्या सोईनुसार कोणतेही कपडे परिधान करण्याचा अधिकार आहे. त्या व्यक्तीने काय घालावं हे इतरांनी ठरवण्यात काहीच अर्थ नाही.


एखाद्या मुलीचा बलात्कार झाला किंवा साधं वाईट नजरेने जरी तिच्याकडे पाहिलं गेलं तरी दोष मात्र त्या मुलीलाच. इतक्या रात्री बाहेर कशाला गेली, त्या रस्त्यावरून का गेली, असेच कपडे का घातले…अरे…… त्या मुलीने काहीही घातलं तरी वाईट नजर ही वाईटच. बुरखा घातलेल्या मुलीवर सुद्धा बलात्कार तर होतोच. ती तर आपादमस्तक ( पायापासून डोक्यापर्यंत ) झाकलेलीच असते. तिचं काय दिसतं यांना. त्या मुलीला लवकर घरी बोलवण्यापेक्षा मुलांनाच उशिरापर्यंत घराबाहेर का ठेवावं…? बलात्कार करण्याला वयाचं तर बंधनच नसतं. बलात्कार होणाऱ्या मुलींना ही नाही आणि बलात्कार करणाऱ्याला ही नाही. 16 वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो तसंच 26 वर्षाच्या बाईवर आणि साठी पार केलेल्या वृद्ध महिलेवरसुद्धा बलात्कार होतो. यावरच न थांबता माणूस इतक्या खालच्या पातळीला गेला आहे की 6 वर्षाच्या खेळण्या-बागडण्याचे वय असलेल्या आणि 6 महिन्याच्या कोवळ्या जीवाला सुद्धा सोडलं नाही जात. 6 महिन्याची मुलगी जिला स्वतःलाच आपले अस्तित्व काय आहे हे कळत नाही आहे पण तेच या नराधमांना सुरू झालेलं अस्तित्व संपवण्याची घाई असते. स्वतःच्या आईला किंवा बहिणीलाही यांनी सोडलं नाही…


दिवसभरात निदान एक तरी बलात्कार झाल्याची बातमी झळकतेच. ते ऐकूनच कधी स्वतः एक स्त्री असल्याची भीती वाढत जाते. 2017 मध्ये सरकारी आकडेवारीनुसार बलात्काराच्या 32,500 पेक्षा जास्त घटना नोंदवण्यात आल्या. भारतीय न्यायालयांनी त्यावर्षी बलात्काराशी संबंधित सुमारे 18,300 प्रकरणे निकाली काढली असून अखेरपर्यंत 1,27,800 पेक्षा जास्त खटले प्रलंबित केली आहेत. 2017 च्या तुलनेत 2018 मध्ये 3.03% आणखी वाढ झाली आहे. असच जर बलात्कार वाढत गेले तर काय होईल याचा विचार करणं सुद्धा कठीण आहे.


बलात्कार झालेली मुलगी हे सर्व सहन करते आणि बलात्कार करणारा मात्र मोकळा. काही मुली आत्महत्या करतात. तर काही फक्त शारीरिक दृष्ट्या जिवंत असतात. पण आजची स्त्री ही सुशिक्षित तर आहेच पण त्याच बरोबर शारीरिक आणि मानसिक दृष्ट्यासुद्धा सक्षम होण्याचाही प्रयत्न करतेय. स्वतःला संकटांपासून सावरण्याचा प्रयत्न करतोय, तर तिचं फक्त सांत्वन न करता तिला आधार देणं जास्त गरजेचं आहे. असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. पण त्याच पद्धतीने प्रत्येक स्त्रीच्या मागे समाज खंबीरपणे आहे असं जाणवलं पाहिजे. तर खरा त्या महिला दिनाला अर्थ येईल.


Rate this content
Log in