Jyoti gosavi

Others

4.0  

Jyoti gosavi

Others

पुरणाची पोळी आणि सुगरण पणा

पुरणाची पोळी आणि सुगरण पणा

3 mins
417


 मागच्या पिढीतल्या माझ्या आई ,आत्या, काकी, मामी, मावशी या सर्वांना सलाम. आणि मानाचा मुजरा. हाताशी तोकडी साधनसामुग्री असताना सदर स्त्रियांनी उत्तम उत्तम स्वयंपाक रांधून आमच्या पिढीला खाऊ घातला आहे. आम्हाला वाढला आहे. स्वतःचा सुगरण पणा सिद्ध केला आहे. शिवाय आपल्याकडे महाराष्ट्रात व्हेजिटेरियन लोकांमध्ये उत्तम सुगरण म्हणजे पुरणाची पोळी आणि इतर समाजामध्ये पुरणाची पोळी पण आणि मटन भाकरी वगैरे . आज होळी म्हणून पोळ्या करायला गेले आणि घामटा निघाला. दिवसेंदिवस या गोष्टी माझ्या च्याने होत नाही हे जाणवलं. 


परंतु जेव्हा स्वयंपाक घरामध्ये आपल्या मागच्या पिढीतल्या स्त्रिया काम करीत असत, तेव्हा काही या गोष्टी जाणवत नव्हत्या. आज आपल्या हाताशी पंचमहाभूते हात जोडून उभी आहेत. बटन दाबलं की अग्नि, नळाची चावी फिरवला की पाणी, कुकर, मिक्सर, फूड प्रोसेसर, अशा बऱ्याच गोष्टी आणि मुख्य म्हणजे आपल्या हाताशी काम करणारी घरातली पुरुष मंडळी. 

पूर्वीच्या काळी यातलं काहीच नव्हतं .मी स्वतः माझ्या आईला चूली वरती अगदी मोठ्या मोठ्या मऊसूत पुरणपोळ्या करताना बघितलेल आहे. त्यावेळची साधन म्हणजे चुलीवरती स्वयंपाक, जळण पण धड असेल याची शाश्वती नाही .कधी कधी तर बाभळीच्या काटेरी लाकडांवरती देखील माझी आई स्वयंपाक करत होती. प्रथम सकाळी सणवार म्हटल्यानंतर रात्री उरलेला सगळा स्वयंपाक म्हणजे शिळ ,चूली पासून लांब बाहेर काढणे .चुलीला पोतेरे देणे ,शक्य झालं तर चूली पुरता भाग रात्रीच शेणाने सारवून घेणे. मग अंग वगैरे धुवून स्वयंपाकाला लागणे. आमच्या घरी अगदी काही सोवळ्यातला स्वयंपाक वगैरे नव्हता. परंतु त्यादिवशी आमची लुडबुड आईला खपायची नाही. त्यानंतर चुलीला हळदीकुंकू वगैरे वाहून त्या काळच्या स्त्रियांच्या सांकेतिक भाषेमध्ये, म्हणजेच आत्ताच्या कोड लँग्वेज मध्ये चुलत सासूबाईंची पूजा केली. स्वयंपाकाला सुरुवात करताना पहिली एक छोटीशी तळ हाता पेक्षा देखील लहान पोळी तव्यावरती भाजायची आणि चुलीच्या मुखात अग्नी स्वाहा करायची.


 उखळ-मुसळ, पाटा-वरवंटा, खलबत्ता ही त्या काळातली स्वयंपाक घरातली साधने आणि अशा सर्व साधनांना हाताशी धरून माझी आई एकटीने खिंड लढवायची. आमचा सहभाग जास्तीत जास्त पाट्या वरती पुरण वाटून देणे. साधे घरचे घरगुती गहू त्याच्या कणकीच्या पुरणपोळ्या अतिशय मऊसूत बनतात. तेव्हा त्यात मैदा वगैरे घालण्याची पद्धत नव्हती. मी मुंबईला आल्यावर ती पहिल्यांदा सासुबाई कडून शिकले अर्धी कणिक अर्धा मैदा घेऊन पीठ मळले असता पोळी फुटत नाही. शिवाय सढळ हाताने तेलाचा वापर आता आपण करतो. 

तो माझ्या आईच्या काळात नव्हता. परंतु तरीही तिची पुरणपोळी किंवा त्या काळातल्या सर्व स्त्रियांच्या पुरणपोळ्या सुंदरच बनायच्या. आमच्या पश्चिम महाराष्ट्रात प्रत्येक सणाला पुरणपोळी हा प्रकार हमखास असतो. तेव्हा आत्ता सारखा प्रत्येक सणाला वेगळा वेगळा मेनू नसायचा. 

श्रीखंड पुरी, बासुंदी पुरी, गुलाबजाम वगैरे काही नव्हते. त्यामुळे येणारा प्रत्येक सणाला या माय माऊल्या बिचाऱ्या अर्धा दिवस तरी स्वयंपाक घरातच असत आणि मोठ्या निगुतीने चारीठाव स्वयंपाक करून घरातील सर्वांना देव-देवता सहित तृप्त करीत असत. शिवाय हा स्वयंपाक बाराच्या ठोक्याला पूर्ण झालाच पाहिजे, बाराच्या ठोक्याला देवाला नैवेद्य दाखवला गेला पाहिजे हा त्या वेळचा दंडक होता. त्यामुळे उद्या सण असला की आज रात्रीच सारवून घेणे ,चुलीला पोतेरे देणे ,या गोष्टी त्या रात्रीच करून ठेवत असत .आणि भल्या पहाटे उठून स्वयंपाकाला लागत असत. दुपारी बाराच्या आत घरच्या देवांचा नैवेद्य दाखवला गेला पाहिजे .शिवाय तो वाढण्याची विशिष्ट पद्धत, जेवणारा च्या डाव्या हाताला मिठापासून सुरुवात त्याच्याखाली चटणी त्याच्याखाली कोशिंबीर त्याच्या खाली भाजी उजव्या हाताला तळण पापड भजी चटका, पंचामृत इत्यादी.  वास्तुपुरुषाचा नैवेद्य, गाईचा गोग्रास, कावळ्याला घास, पितरांचा नैवेद्य, या साऱ्या गोष्टी वाढून, त्या त्या ठिकाणचे नैवेद्य दाखवून परत पदर खोचून पुरुषांना वाढायला या उभ्या, कारण पुरुष मंडळींची आणि लहान मुलांची पंगत आधी होत असे. आणि पहाटे तीन चार वाजल्यापासून खपून स्वयंपाक रांधणारी  गृहलक्ष्मी मात्र जेवायला सगळ्यात शेवटी. तोपर्यंत अन्नाच्या गारगोट्या झालेल्या असत. आणि पहाटेपासून दमलेली थकलेली ती गृहिणी उगाच कसेबसे चार घास पोटात ढकलून ,पुन्हा पुढची आवराआवरी, दुपारची भांडी, उष्ट्या, खरकट्या जागी शेंणगोळा  लावणे या गोष्टीच्या तयारीला लागत. धन्य ती घरातील आई मावशी काकी मामी गृहीणी जिच्यामध्ये एवढी ऊर्जा होती. त्यांना हात जोडून नमस्कार


Rate this content
Log in