STORYMIRROR

Priya Satpute

Others

3  

Priya Satpute

Others

प्रियांश...३

प्रियांश...३

4 mins
241

पुरुष जन्माला येतो अगदी नऊ महिने, नऊ दिवस घेऊन, त्या माऊलीच्या शरीराचे अतोनात हाल करत... बाळंतपण म्हणजे बाईचा पुनर्जन्मच असतो हे आपण नेहमी ऐकत आलो आहोत. प्रत्यक्ष जेव्हा स्वतःच्या बहिणीच्या जुळ्या मुलांच्या बाळंतपणात ते पाहिलं तेव्हा पूर्ण रात्र घाबरून झोप लागली नाही. तुम्हां पुरुषांना साधं ठेच लागल्यावर तुम्ही कळकळून जाता. तेच स्त्रिया दर महिन्याला ठेच लागण्यापल्याड दुखण्यातून वयाची ५० ते ५५ वर्षे जात असते अन बाळंतपणात त्याच्या हजारपट्टीने जास्त वेदनांमधून जात असते पण, कित्येक स्त्रियांना सुनावलं जातं जगात तुला एकटीलाच पाळी येते का? माझ्या आई बहिणीला नाही होत असं काही, बस कर तुझी नाटकं, ऊठ कामाला लाग! अशी वाक्य बऱ्याच मागासलेल्या कुटुंबामध्ये ऐकू येतात. 

बाळंतपण हा विषयच कमालीचा अवघडलेला आहे! बरेचदा खूपजण बोलून जातात, यात काय नवीन ? जगातली काय पहिली बाळंतीण आहे का ही? आम्ही नाही झालो का गर्भार कधी? जळली मेलं नाटक ती! माहेरी करायची असतात बाळंतपण सासरी नाही! पाठव तिला माहेरी! पहिलं सासरी असतं, आम्ही पाठवणार नाही सुनेला मग सावट पडेल बाळावर! अशे एक ना अनेक गोष्टी कानांवर येतात. माणूस मग ती स्त्री असो वा पुरुष जोपर्यंत त्यांच्यावर एखादी गोष्ट ओढवत नाही तोपर्यंत ते दुसऱ्याला टोमणे, वाईट बोलणे, वाईट शिकवणे अश्या भानगडी करत राहतात. 

या सगळ्या कारभारात उपरी पडते ती गर्भार बाई! धड नवरा समजून घेत नाही ना आजूबाजूचे... जो हक्काचा माणूस, ज्याच्या हाताला धरून ती तिचं सारं आयुष्य सोडून त्याच्यापाठी आली तोच तिला समजून घ्यायला तयार नसतो, तेव्हा ती उघड्यावर पडते. हा समाज एकट्या स्त्रिला कधीच सुखाने निवांतपणे जगू देत नाही हे खरेच! दुर्दैवाने आधीच्या काळात रुढीवादी संस्कृती मुळे नवरा बायकोला एकमेकांपासून दूर ठेवले जायचे, माहेरी पाठवले की नवऱ्याने सारखे बायकोला भेटायला जायचे नाही कदाचित आजही खूप घरांमध्ये तेच सुरू आहे कारण, आम्हांला मिळाले नाही नवऱ्याचे प्रेम मग तुम्हांला का? हा बाणा जागा ठेऊन काही सासवा स्वतःचा कष्टाचा काळ पुन्हा सुनेला भोगायला लावतात. काळानुसार आईवडिलांनी स्वतःला बदलावं, आपल्या मुलांना देखील रुढीवादी परंपरा लादून आदिवासी न बनवता त्यांचा संसार कसा सुखमय होईल याकडे पहावं. 

बाई गर्भार असणे म्हणजे फक्त तिचं असते का? पुरुष नसतो?? नऊ महिने ती मांसाचा गोळा पोटात वाढवते, बाळंतपण म्हणजे बाईचा पुनर्जन्मच असतो! मरणाच्या उंबरठ्यावर उभी राहून तुमचा वंश पुढे जावा म्हणून ती अतोनात शारीरिक मानसिक त्रासातून जात असते तेव्हा त्या बाईची अपेक्षा ते काय असावी नवऱ्याकडून? बाई आई बनून जाईल हो पण, तुम्हां पुरुषांना कधी पान्हा फुटणार? तुम्ही कधी बाबा होणार? आणि खऱ्या अर्थाने नवरा होणार? मुलं राहणं आणि त्याला प्रत्येक दिवशी काही क्षण तरी तुम्ही अनुभवलं पाहिजे. आई जे काही विचार करते, अनुभवते ते सारं प्रत्येक क्षणी बाळापर्यंत पोहचत असतं. म्हणूनच जे पुरुष बायकोच्या बाळंतपणात अलिप्त राहत नाहीत ते मुलं जन्म घेण्याआधीच जन्मदाते झालेले असतात, जन्माला आलेले मुलं जसं आईला ओळखत तसंच मग ते आपल्या बाबाला सुद्धा ओळखून इवलेशे डोळे उघडून आपसूकच हसत! त्यांना देखील आपलं बाळ का रडत आहे पासून त्याला झोप आली आहे की शी सू केली आहे हे सगळं आपसूकच कळू लागतं आणि तेव्हाच तो पुरुष खऱ्या अर्थाने बाबा बनतो! पण, जर का तुम्हाला फक्त वंश वाढतोय ना, तिचं ती करतेय ना, करेल तिची आई, राहील माहेरी काही महिने मग आणू बाळ मोठं झालेवर असाच दृष्टिकोन राहणार असेल तर मग ते मूल ही तुमच्यापासून अलिप्तच राहणार हे विसरू नका! 

बाळंतपण हा स्त्रीच्या आयुष्यातील जीवन मरणाचा काळ, या काळाला तिच्यासाठी सुखमय, आनंदी बनवलं गेलं तर आई आणि मूल दोघेही सुखरूप निभावून येतील. या काळातच स्त्रीला सर्वात जास्त प्रेम आणि आधार हवा असतो तो तिच्या पार्टनर कडून, स्वतःचा पार्टनर आपली काळजी घेत असल्यावर ९० टक्के दुखणं ती विसरून जाते, पार्टनरच्या प्रेमापोटी ती बाळंतपणाच्या कळा सहन करून घराला नवं घरपण देते! आजकाल स्वतःहून नवरे लेबर रुम अथवा ऑपरेशन थेटर मध्ये आवर्जून उपस्थित राहतात हे खूपच कौतुकास्पद आहे पण, यातही खोडा म्हणून काही महाभाग जुन्या वळणांचे लोक त्याला ही नावे ठेवतात हे खरंच खूप दुःखद आहे. नवरा बायको यांना जोडणारा नवा दुवा दोघांच्या साक्षीने पहिला श्वास घेतो, ज्या बाळाच्या आगमनासाठी आतुरतेने सर्व वाट पाहत असतात, त्या आपल्या बाळाची नाळ कापून त्याला सर्वप्रथम हातात घेण्यापेक्षा मोठा आनंद तो काय असावा? या क्षणांमध्ये तर दोघे खऱ्या अर्थाने आई बाबा होतात, जणू नव्या आयामांची सुरवात दोघांच्या कुशीत इंद्रधनू बनून त्यांचा आसमंत उजळवून टाकते! या सुंदर क्षणांना उपरे म्हणवणारे रुढीवादी विचार बदलवून त्यांना आपल्या इंद्रधनूमध्ये सामावून घ्या नाहीतर तुम्ही कधीच बाबा होण्याचा हा सुंदर अनुभव जगू शकणार नाही.

|| शुभं भवन्तु || 



Rate this content
Log in