पहिले बाजीराव पेशवे
पहिले बाजीराव पेशवे


जर का मला कालचक्र फिरवण्याची संधी मिळाली किंवा इतिहासाची पाने बदलण्याची, एखादी घटना टाळण्याची, संधी मिळाली तर मी पहिले श्रीमंत बाजीराव साहेब पेशवे यांचा अकाली मृत्यू नक्कीच टाळेन किंवा त्यात बदल करेन. अवघ्या चाळीस वर्षांचे आयुष्य. वयाच्या एकोणीसाव्या वर्षी मिळालेल पेशवेपद, आताच्या काळाचा विचार केला तर एकोणीस वर्षाची मुलं अजून शिक्षण घेत असतात. तर त्यांनी एवढ्या मोठ्या स्वराज्याचा कारभार सांभाळला आणि तेही यशस्वीपणे ही काही सोपी गोष्ट नव्हती.
वीस वर्षांच्या कारकीर्दीत 36 लढाया केल्या व त्यातील एकही लढाई ते हरले नाहीत. त्यांनी लढाईचे एक वेगळेच तंत्र मराठ्यांना दिले. मैदानी लढाईतदेखील आपण जिंकू शकतो हा आत्मविश्वास दिला. वेगवान हालचाली, मुत्सद्देगिरी, उत्कृष्ट हेरपथक त्यांच्या लढाईचे वैशिष्ट्य होते. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले तर बाजीरावांनी त्या स्वराज्याचे साम्राज्य उभारले. जे स्वप्न शिवाजी महाराजांनी पाहिले होते ते स्वप्न बाजीरावाने प्रत्यक्षात आणले. श्रीरंगपट्टणमपासून पेशावरपर्यंत मराठी साम्राज्य उभे केले. नुसते उभे केले नाही तर त्याचा एक दबदबा निर्माण केला. स्वतः शाहू महाराज असे म्हणत असत की, जर एका बाजूला एक लाख सैन्य व दुसऱ्या बाजूला बाजीराव असेल तर मी बाजीरावांचीच निवड करेन. यातच बाजीरावांविषयी सारे काही आले.
आयुष्यभराच्या लढाईमध्ये पावणेदोन लाख किलोमीटरची घोडदौड या माणसाने केली. जर बाजीरावांचे आयुष्य अजून वीसेक वर्षे वाढले असते तर पानिपतची लढाई झालीच नसती व पहिल्या लढाईत मराठ्यांची वाताहत, पराभव झालाच नसता कारण की लढाई बाजीरावानी जिंकलीच असती. अब्दालीला पुन्हा वाकडी नजर करुन भारताकडे पाहण्याची हिंमतदेखील झाली नसती इतकेच काय यवनांचा पूर्णपणे बीमोड करावा व त्यांना मुळापासून या देशातून उखडून लावावे व खऱ्या अर्थाने हिंदूपदपातशाही स्थापन करण्याचे बाजीरावांचे स्वप्न होते. पण शाहू महाराज स्वतः मुघलांच्या कैदेत राहिल्यामुळे मुघलांनी त्यांना सन्मानाने वागवले. यामुळे व त्यांचे धर्मांतर करण्याची सक्ती न केल्यामुळे त्यांना मुघलांबाबत एक सॉफ्टकॉर्नर होता. त्यामुळे शाहू महाराजांनी संपूर्ण मोघलाई बुडविण्यास मना केले.
परंतु पुढे जर बाजीराव राहिले असते तर आपण आजदेखील जे त्रास भोगतोय, उदा. सततचे होणारे दहशतवादी हल्ले, सतत असणारे लढाईचे सावट, अंतर्गत भेदी, या सार्या गोष्टी घडल्याच नसत्या व पूर्वी जसा भारत 'सोने की चिडिया' होतા किंवा भारतातून सोन्याचा धूर निघत होता तशाच पद्धतीने आपण सारे सुखनैव व शांतीने जगू शकलो असतो.