पहिला दिवस
पहिला दिवस


डियर डायरी,
9 वाजले अजूनही उठली नाही ही. तिकडेही अशीच वागत असेल. काम तर एक करायला नको. सारखं वर जायचं नाहीतर तो मोबाईल आहेच. आई बाबांची ही बडबड अनु बेडवर पडल्या पडल्याचं ऐकत होती. कालचा एक दिवस तिला बरं नव्हतं म्हणून तिचं कोडकौतुक झालं. पण दुसऱ्या दिवसापासून येरे माझ्या मागल्या... या विचारांनी ती बेडवरून उठली नेहमीप्रमाणे सगळं आवरलं. खोलीचा केर काढला कारण आईने पुन्हा कटकट केली असती आणि ती तिच्या व्यायामासाठी वरच्या खोलीत निघून गेली. कोरोनामुळे समुद्रही पाहता येणार नाही, असं मनाशीच म्हणत म्हणत अनु व्यायाम करायला लागली. व्यायाम झाला आणि अनुच्या डोक्यात विचार आला की, च्यायला 21 दिवस कसे काढायचे? घरात बसून काम करायची तिला सवय होती. पण संध्याकाळ झाली की ती कोणाची नसायची, समुद्रावर जाणं, तिच्या टीमला भेटणं हा तिच्या नित्यनियमाचा भाग होता. संध्याकाळी 6 ते 10 हा तिचा वेळ असायचा. त्यावेळेत तिच्या घरच्यांनी तिला डिस्टर्ब करायचं नाही हा दंडकच होता पण आता संध्याकाळी ही कुठे जात येत नव्हतं. मग तिला वाटलं बरं झालं ना, आपण पूर्ण वेळ काहीतरी मिळवण्यासाठी म्हणून पळत असतो. कधीकधी तर उगाच पळत असतो. आता स्वतःला जरा नीट न्याहाळू, परीक्षण करूयात पण उगाच काही निष्कर्ष काढायचे नाहीत. ठीक आहे असंच करू, असं म्हणून तिने डायरीचा निरोप घेतला पुन्हा भेटण्यासाठी.
तुझीच
अना...