पेपर बोट... एक गोड आठवण !
पेपर बोट... एक गोड आठवण !
आज मस्त धुंद पाउस सुरु होता...पाऊस उघडला आणि मी पटकन बाहेर पडले...पुन्हा पाऊस यायच्या आत कामे उरकून टाकावी म्हणून भरभर निघाले...पाऊस पडून गेल्यामुळे छोटे छोटे पाण्याचे डबके साचले होते.थोडाफार चिखल सुद्धा झाला होता...तो पाहून वैताग आला आणि ' शी किती घाण झालिये सगळीकडे ' असं मनातल्या मनात म्हणत असतानाच दोन लहान मुलं त्या पाण्याच्या डबक्यात पेपर बोट बनवून सोडत होते...तितक्यात अजून काही मुलं त्यांना येऊन मिळाली... आपापल्या होड्या पाण्यात सोडून कोणाची होडी पुढे जाते हे पाहत त्यांची मस्त मज्जा सुरू होती...
मी त्यांना पाहून थबकले ! ' खरचं बालपणीचा काळ सुखाचा ' म्हणतात ना ते काही खोटं नाही ...मन अगदी पंख लावून बालपणात गेलं...पाऊस येणार असा अंदाज दिसला की मुद्दाम रेनकोट घरी विसरणे , जवळ छत्री असली तरीही मुद्दाम ती बाजूला घेऊन मनसोक्त भिजणे यातला आनंद काही औरच...आणि पाऊस पडून गेला की आमची गँग निघायची पेपर बोट कॉमपीटिशन साठी...ही एक अलिखित स्पर्धा असायची त्यासाठी आम्ही आधीपासूनच तयार असायचो...
बरेच दिवस आधीपासून कागद जमा करायला लागायचे , न्यूज पेपर , रद्दी पेपर , त्यातच एखादा जाड किंवा रंगीत कागद हाताला लागला की काय आनंद व्हायचा ! पेपर बोट साठी आम्हाला कोणही कागद विकत वगैरे आणून द्यायचे नाहीत पण रद्दी पेपर , बिन कामाचे असे कागद वापरायला फुल्ल परवानगी असायची...मग काय घरातल्या मोठ्या मंडळी कडील छान दिसलेला कागद मिळवण्याची धडपड चालू असायची.." हा पेपर मी घेऊ का ? "
"कामाचा नाही ना हा कागद ? "
" तुझ्याकडे किती आहेत असे पेपर मला दे ना थोडे " आसं म्हणत सगळ्यांच्या मागे लागायचे आणि छान छान पेपर जमवायचे...त्यातही एक आगळी गंमत असायची...शाळेत क्राफ्ट साठी मिळणारे पेपर्स सुद्धा जपून ठेवलेले असायचेच..
मग सुरू व्हायची बोट बनवन्याची तयारी...अस्मादिक होड्या बनवण्यात एकदम एक्स्पर्ट ! अनेक प्रकारच्या बोटस बनवता येत असल्यामुळे साहजिकच माझा भाव वाढलेला असायचा ! अगदी भाव खात ऐटीत सगळ्यांना बोट बनवून देत असे...हो पण कोणाच्या समोर काही आम्ही आमचे स्किल दाखवायचे नाही बरं का आणि कोणाला शिकवण्याच्या भानगडीत तर आजिबात च पडायचे नाही ...नाहीतर आपली व्ह्याल्यू डाऊन व्हायची !
मस्त पेपर बोट तयार करून आम्ही सगळी बच्चे मंडळी पावसाची वाट बघत असू...त्यातल्या त्यात शनिवारी पाऊस पडला की रविवारी कोणीही न सांगता सगळे जण आपल्या आपल्या पेपर बोट घेऊन ग्राउंड वर हजर असायचे...तिथे असणारे मस्त मोठे पण उथळ पाण्याचे डबके पेपर बोट कॉम्पीटिषण साठी एकदम परफेक्ट होते...मग जो काही सामना रंगायचा...काय मज्जा यायची... आरडा ओरडा , धम्माल असायची नुसती...त्या साध्या कागदाच्या होड्या किती आनंद देऊन जायच्या...!
आणि मग शेवटी झालेला तो कागदाचा लगदा , बुडलेली बोट , ती बघून अतोनात दुःख व्हायचं...कागदाची ती बोट , ती बुडणारच हे माहिती असूनही ती बुडालेली बोट नेहेमीच मन विषण्ण करून जायची...एखादी फार आवडती बोट मी थोडा वेळ पाण्यात सोडून लगेच काढून घेत असे...
" येय मी विनर मी विनर " मुलांच्या ओरडण्याचा आवाजाने मी भानावर आले ! समोर बालपण दिसत होते...
" आता अजून बोट बनवू चला " सगळी मुलं तिथेच बसून आपल्या दप्तरातून कागद काढू लागली...
" मला शिकवा ना कोणीतरी , मलाही करून द्या ना मला नाही येत..." एक छोटासा मुलगा रडवेला होऊ. गयावया करत होता ..
मी पुढे सरसावले...आणि त्याला पटापट सुंदर आणि वेगवेगळ्या प्रकारच्या होड्या तयार करून दिल्या...त्याच्या चेहेर्यावर दिसणारा आनंद मलाही आनंद देऊन गेला...
" चला रेस लावुया " मुलं आपापल्या होड्या घेऊन तयार होती...
मी सुद्धा त्यांच्या सोबत माझीही एक पेपर बोट पाण्यात सोडली...माझ्या बालपणाची गोड आठवण म्हणून...किती छान वाटत होतं...मुलं तसाच धिंगाणा करत होती...
आजही बुडणारी पेपर बोट बघून मन कासाविस होत होतं...!!
