Ajay Nannar

Others

2  

Ajay Nannar

Others

नाशिक जिल्ह्यातील पर्यटन स्थळे

नाशिक जिल्ह्यातील पर्यटन स्थळे

8 mins
236


काळाराम मंदीर

काळाराम मंदीर सरदार रंगराव ओढेकर यांनी सन 1782 मध्ये जुन्या लाकडी मंदिराच्या जागेवर बांधले. प्रभु रामचंद्र आपल्या वनवासा दरम्यान ज्या जागी राहिले त्या ठिकाणी हे मंदीर होते,असे मानले जाते.सदर मंदीराचे बांधकामासाठी 2000 कारागिर 12 वर्ष राबत होते.पश्चिम भारतातील प्रभु रामचंद्राच्या सुंदर मंदिरांपैकी एक असे हे मंदीर आहे.245 फुट लांब व 145 फुट रुंद मंदिर परिसराला 17 फुट उच दगडाची भिंत आहे.मंदिरासाठी सर्व बाजुंनी मोकळा असलेला स्वतंत्र सभामंडप आहे.मंदिरात प्रभू रामचंद्र, सिता, लक्ष्मण यांच्या काळया पाषाणातील 2 फुट उंचीच्या मुर्त्या आहेत.चैत्र महिन्यात येथे रामनवमीचा उत्सव आयोजित करण्यात येतो.


खंडोबा मंदीर

हे मंदिर देवळाली छावणी परिसरात लहान टेकडीवर वसलेले आहे.भगवान शंकराचे अवतार मानले जाणारे श्री खंडोबा महाराजांचे हे मंदिर 500 वर्ष जुने आहे.पौराणिक कथेनुसार मल्ल दैत्य व मणी दैत्य या दोन राक्षस बंधुशी मंदिर संबधित आहे. या दोन्ही दैत्यांनी भगवान शिवाची आराधना करुन त्यांना भुतलावर कोणीही मारु शकणार नाही, असा वर प्राप्त करुन घेतला वर प्राप्ती नंतर संत, ऋषी व निरपराध लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली.भगवान शिवाने श्री खंडोबाचा अवतार घेऊन या दोनही दैत्यांचा वध केल्यानंतर भगवान शिव या टेकडीवर विश्रामासाठी आले, म्हणुन या मंदीरास ‘विश्रामगड’ असे देखील म्हटले जाते. या टेकडीला ‘खंडोबाची टेकडी ’असे देखील म्हणतात.


कावनई-कपिलधारा तिर्थ

हे तिर्थक्षेत्र इगतपुरी तालुक्यात असुन नाशिक शहरापासुन 50 कि.मी. अंतरावर स्थित आहे. इगतपुरी पासुन कावनाईचे अंतर 12 कि.मी. आहे. श्री संत गजानन महाराज यांनी या परिसरात तपश्चर्या केली असे मानले जाते. हे ठिकाण कावनाई किल्ल्याच्या पायथ्याशी असुन सभोवतालचा परिसर नयनरम्य आहे. कपिलधारा तिर्थ येथे विविध मंदीरे असुन जवळच माता कामाक्षी मंदीरदेखील आहे. या ठिकाणी वर्षभर वाहणारा नैसर्गिक पाण्याचा झरादेखील आहे.


कुशावर्त तिर्थ

कुशावर्त तिर्थ हे त्र्यंबकेश्वर शहराच्या मध्यभागी श्री त्र्यंबकेवर ज्योतिर्लिंग मंदिरा पासुन अदमासे 300 मी.अंतरावर स्थित आहे. कुशावर्त तिर्थ हे 21 फुट खोलीचे नैसर्गिक पाण्याचे झरे असलेले कुंड सन 1750 मध्ये बांधण्यात आले.गोदावरी नदी ब्रम्हगिरी पर्वतावरुन लुप्त झाल्यांनतर हया ठिकाणी प्रकट होते अशी काही लोकांची श्रध्दा आहे. या कुशावर्तात आधी स्नान करुन मग त्र्यंबकेश्चर मंदिरात दर्शनार्थ जाण्याची परंपरा भाविक पाळतात. कुशावर्तात खाली जिवंत पाण्याचे झरे आहेत व गोदावरीच्या उगमस्थानापासुन नंतरच्या नदीप्रवाह कुशावर्तात ये‌ऊन पुढे वळण घेतो. कुशावर्त परिसरातही काही छोटी मंदिरे आहेत. या तीर्थकुंडाच बांधकाम इ.स. १७५० मध्ये झाले आहे. आत उतरण्यासाठी १५ दगडी पायर्‍या व त्या चारही बाजूने आहेत. अलीकडे येथे संरक्षणात्मक जाळी लावली आहे. गौतम ऋषींनी प्राचीन काळी येथेच गंगेला अडवले होते व तीर्थात पुण्यस्नान केले होते अशी पौराणिक कथा आहे.


मांगी तुगी मंदीर

मांगी तुगी मंदीर नाशिक पासुन 125 कि.मि. अंतरावर सटाणा तालुक्यात आहे.समुद्रसपाटीपासुन 4343 फुट उंचीवर मांगी शिखर तर समुद्र सपाटीपासून 4366 उंचीवर तुंगी शिखर आहे. मांगी तुंगी हे प्रसिध्द धार्मिक स्थळ आहे. मांगी तुंगीच्या पायथ्याशी ‘’भिलवाडी’’ हे गांव आहे. येथे साधना केल्याणे मोक्ष प्राप्ती मिळते असे मानले जाते.


मांगी

मांगी शिखराची उंची जास्त नसली तरी येथे सराईत गिर्यारोहकच चढु शकतात. शिखराच्या पायथ्याशी भगवान महावीर, अदिनाथ, पार्श्वनाथ, हनुमान, वाली, सुग्रीव इ. यांच्या 356 कोरीव मुर्ती आहेत. गुफांमध्ये देखील काही कोरीव काम आढळते. या ठिकाणी “ मांगीगिरी मंदीर ‘’ आहे.


तुंगी

तुंगी शिखर मांगी शिखरापेक्षा उंच आहे. या शिखराला देखील तुंगी शिखरासारखीच प्रदक्षिणा करता येते. प्रदक्षिणा मार्गावर तीन गुंफा आहे. त्या पैकी एका गुंफेत “ तुंगीगिरी मंदीर ‘’ असून. भगवान बुध्दांच्या 99 कोरीव मुर्ती येथे आहेत.


बालाजी मंदीर

जुन्या नाशिक शहरात गोदावरी नदी काठी जुने बालाजी मंदीर तर गंगापुर रोड जवळ सोमेश्वर मंदीरा जवळ नवीन बालाजी मंदीर आहे.श्री बालाजींच्या कृपेने प्रतिकुल ग्रहदशेत सरंक्षण होते, अशी भाविकांची श्रध्दा आहे.

 

चांभारलेणे

“चांभारलेणे” हा 11 व्या शतकातील जैन मंदीरांचा समुह आहे. नाशिक शहराच्या बाहय भागात रामशेज किल्ल्याजवळ एका टेकडीवर ही मंदीरे स्थित आहे. 


धर्मचक्र प्रभाव तिर्थ विल्होळी

हे स्थळ नाशिक शहरापासुन 12 कि.मि. अंतरावर मुंबईच्या दिशेने राष्ट्रीय महामार्ग क्र.3 वर विल्होळी गाव येथे स्थित आहे. पवित्र त्रिलोकनाथ मंदिर तीन मजली आहे. मंदिराबाहेर सिद्धाचल, अबु, गिरनार व सामेतशिखर यांच्या प्रतिकृती आहेत. तळमजल्यावर भगवान महावीरांची 12 फुट उंचीची मुर्ती आहे.मुर्तीच्या भोवती चार मुलनायक आहेत. मंदीरातील भगवान पाश्वर्नाथांची मुर्ती अतिशय देखणी असुन अष्टपथ महातीर्थ यांचीदेखील मूर्ती मंदिरात स्थापित आहे.


तपोवन

तपोवन म्हणजे ‘’तपस्वी लोकांचे वन’’ हे ठिकाण नाशिक येथे पंचवटी पासुन 1.5 कि.मी.अंतरावर खालच्या बाजुस गोदावरी नदी तिरी आहे. तपोवन हे एकेकाळी दंडकारण्याचा भाग होता.रामायण या महाकाव्याशी हया निसर्गरम्य ठिकाणाचा संबध असुन वनवासा दरम्यान प्रभु राम, लक्ष्मण, सीता या ठिकाणची फळे ग्रहण करत होते.या ठिकाणीच रावणाची बहिण शुर्पणखेचे लक्ष्मणाने नाक कापले, यामुळे ‘’नाशिक’’ हे नाव पडले असे देखील म्हटले जाते.या पवित्र परिसरात रामपर्णकुटी,लक्ष्मीनारायण मंदिर,जनार्दनस्वामी मंदीर,अशी मंदिरे आहेत.सिंहस्थ कुंभमेळया दरम्यान हया ठिकाणी साधूंचे वास्तव्य असते.


गोंदेश्वर – हेमाडपंथी मंदीर

हे मंदिर नाशिक पासुन 40 कि.मी. अंतरावर सिन्नर जवळ स्थित आहे. येथे जाण्यासाठी राज्य परिवहन मंडळाच्या बसेस उपलब्ध आहेत.नाशिकरोड रेल्वे स्टेशनपासुन 32 कि.मि.अंतरावर आहे. भगवान महादेवाचे हेमाडपंथी स्थापत्यशैलीचा नमुना असलेले हे मंदीर असुन सद्यस्थितीत हया शैलीतील चांगल्या स्थितीत असलेल्या काही मंदीरांपैकी एक आहे.


कैलास मठ

हा आश्रम नाशिक येथील पंचवटी भागात स्थित असुन यास ‘’भक्तीधाम ‘’असे देखील म्हणले जाते.या ठिकाणी विविध देवतांची मंदीरे आहेत. “कैलास मठ” हा जुना आश्रम असून या ठिकाणी वेद शिकविले जातात. परमपुज्य स्वामी हदयानंद महाराज यांनी सन 1920 मध्ये या आश्रमाची स्थापना केली. सदयस्थितीत आचार्य महामंडलेश्वर स्वामी संविदानंदजी स्वरस्वती येथील प्रमुख आहेत. श्रावण महिन्यात तेथे विविध धार्मिक उत्सव साजरे केले जातात.


मुक्तिधाम

मुक्तिधाम हे नाशिक शहरात नाशिकरोड रेल्वे स्टेश्नजवळ स्थित आहे.या मंदीराचे बांधकाम पांढऱ्या रंगाच्या मकराणा संगमरवरी दगडांत केले आहे. या मंदीराचा श्वेतरंग पवित्रता व शांतीचा संदेश देतो. येथे 12 ज्योर्तिलिंगाची प्रतिकृती स्थापित करण्यात आलेली आहे. मंदीराच्या भिंतीवर गितेचे 18 अध्याय कोरलेले आहेत.


पंचवटी

नाशिक शहरात पंचवटी परीसर हा गोदावरी नदीच्या डाव्यातीरावर आहे. काळाराम मंदीरा जवळ वटवृक्षांचा समुह असुन हा समुह पाच वटवृक्षांपासून तयार झाला असल्याने या परिसरास ‘ पंचवटी ’ असे म्हटले जाते. ‘पंच’ म्हणजे पाच व ‘वटी’ म्हणजे वडाचे झाड असा अर्थ होतो.

काळाराम मंदिर, कपालेश्वर मंदिर, गंगा-गोदावरी मंदिर, सुंदर नारायण मंदिर, टाळकुटेश्वर मंदिर, निळकंठेश्वर मंदिर, गोराराम मंदिर, मुरलीधर मंदिर, तिळभांडेश्वर मंदिर, बालाजी मंदिर, सांडव्याची देवी मंदिर, विठ्ठलमंदिर, पाताळेश्वर मंदिर, नारोशंकर मंदिर, रामकुंड, दुतोंडया मारुती, कार्तिकस्वामी मंदिर, काटयामारुती मंदीर, पंचमुखी हनुमान मंदिर, भद्रकाली मंदिर, कपुरथळा स्मारक अशी अनेक मंदिरे पंचवटी व सभोवतालच्या परिसरामध्ये गोदावरी नदीच्या दोन्ही तीरांवर आहेत. या मंदिरांमुळेच नाशिकला ‘’पश्चिम भारताची काशी ‘’असे म्हटले जाते.


पांडव लेणी

नाशिकच्या पांडव लेणीही प्रसिध्द आहेत. नाशिक नवीन बसस्थानकापासुन ५ व महामार्ग बसस्थानकापासुन ४ कि.मी. अंतरावर एका मोठ्या टेकडीवर या लेण्या आहेत. ही लेणी मात्र प्राचीन आहेत. सुमारे २५०० वर्षापूर्वींची. येथे जो पाली भाषेतील शिलालेख आहे त्यावरुन ही लेणी २००० वर्षांपूर्वीचीच असल्याचे निश्चित समजले जाते. एकूण २४ लेणी आहेत. काही लेण्या व त्यातील मूर्त्या चांगल्या स्वरुपात तर काही खंडीत स्वरुपात शिल्लक आहेत. बुध्दस्तुप, भिक्षूंची निवासस्थाने, बुध्दबोधिसविता, जैन तीर्थकर ऋषभदेवजी, वीर मणिभद्रजी, माता अंबिकादेवी यांच्या मूर्त्या, पाच पांडवसदृशमूर्त्या, भीमाची गदा, कौरव मूर्त्या, इंद्रसभा, देवादिकांच्या मूर्त्या या सर्व लेण्यात आहेत. मूर्त्यांची शिल्पकता वाखाणण्यासारखी आहे.


श्री त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिर

श्री त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिर नाशिकपासून 28 कि.मी.अंतरावर स्थित आहे.गोदावरी नदीचे उगम स्थान असलेल्या ब्रम्हगिरी पर्वताच्या पायथ्याशी त्रयंबकेश्वर वसलेले आहे. सध्याचे मंदिर तिसरे पेशवे बाळाजी बाजीराव ( सन 1740 ते 1760 ) यांनी जुन्या मंदिराच्या जागेवर बांधले आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराचे व्यवस्थापन हे त्रयंबकेश्वर मंदिर हे ट्रस्टकडुन केले जाते. ट्रस्टकडुन भक्तांसाठी निवासाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.


श्री सप्तश्रृंगी गड

श्री सप्तश्रृंगी गड नाशिक पासुन 60 कि.मी अंतरावर कळवण तालुक्यात स्थित आहे.देवीचे मंदिर 7 शिखरांनी वेढलेले असुन समुद्रसपाटीपासुन 4659 फुट उंचीवर आहे. यास महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी ‘’अर्ध शक्तीपीठ’’ मानले जाते.देवीची आठ फुट उंचीची मुर्ती पाषाणात कोरलेली असुन दोन्ही बाजुस 9 असे एकुण 18 हात व त्यात विविध आयुधे असलेली आहे.या ठिकाणी माता भगवती निवास करते. ‘’सप्तश्रृंग’’ हया शब्दाचा अर्थ ‘’सातशिखरे’’ असा आहे.गडाच्या पायथ्याशी नांदुरी गाव आहे. गडाच्या शिखरावर विविध औषधी वनस्पती आढळतात. गडावर कालीकुंड, सुर्यकुंड, दत्तात्राय कुंड अशी कुंड आहेत.गडाच्या पुर्वीस खोल दरीने विभागला गेलेला ‘’मार्कंडेय डोंगर’’ आहे.हया ठिकाणी ऋषी मार्कंडेय यांचे वास्तव्य होते, असे मानले जाते.या ठिकाणी त्यांनी दुर्गासप्तशतीची रचना केली चैत्र व अश्विन नवरात्रात येथे मोठी यात्रा भरते.


सीता गुंफा

नाशिक शहरात मध्यवर्ती बस स्थानकापासुन 3 कि.मी.अंतरावर पंचवटीत सितागुंफा स्थित आहे. वनवासादरम्यान माता सीता येथे रहात होत्या असे म्हटले जाते. पहिल्या मुख्य गुंफेत राम, सीता व लक्ष्मण यांच्या मूर्ती असून, दुसऱ्या लहान गुंफेत शिवलिंग आहे. माता सीता भगवान शिवाची आराधना केल्याशिवाय अन्नग्रहण करत नसल्याने त्यांचे सोयीसाठी हे शिवलिंग स्थापित करण्यात आले असे म्हटले जाते. या ठिकाणावरुन रावणाने सीताहरण केले. सीता गुंफेसमोर रामायणातील मारिच वध, सीताहरण असे देखावे लावण्यात आलेले आहेत.


श्री रेणुका माता मंदिर चांदवड

हे मंदिर राणी अहिल्याबाई होळकर यांनी बांधले असुन चांदवड शहराच्या बाहेर नाशिक – धुळे रस्त्याच्या लगत (राष्ट्रीय महामार्ग क्र.3 ) स्थित आहे. या मंदिराच्या परिसरात चंद्रेश्वर महादेव मंदिर व गणपती मंदीर आहे.चांदवड येथे श्रीमंत अहिल्याबाई होळकरांनी बांधलेला प्रसिद्ध रंगमहालसुद्धा पाहण्यासारखा आहे.


श्री सोमेश्वर मंदीर

हे मंदिर नाशिक मध्यवर्ती बस स्थानकापासुन 8 कि.मी अंतरावर गंगापुर रस्त्यावर आहे.गोदावरी तीरी असलेल्या हया मंदिरात भगवान शिव व हुनुमानाची मुर्ती असुन परिसर वृक्षवेलींनी वेढलेला आहे.दर्शनांनतर नदीत बोटिंग व पोहण्याचा आनंद घेता येतो. सोमेश्वर हे चित्रपटांच्या शुटींगसाठी देखील प्रसिध्द आहे.सोमेश्वरला जातांना ‘’आनंदवल्ली’’ नावाचा परिसर लागतो.या परिसराचे नांव पेशवे राघोबादादा यांचे पत्नी आनंदीबाई यांचेमुळे ठेवण्यात आले आहे.त्यांचा हया ठिकाणी काही काळ निवास होता. त्यांनी आनंदवल्ली येथे गोदावरी तिरावर नवश्यागणपतीचे आकर्षक मंदिर बांधले आहे. 


गंगा गोदावरी मंदीर

हे मंदिर रामकुंडाजवळ आहे. हे मंदिर सन 1775 मध्ये श्रीमती गोपिकाबाई पेशवे यांनी बांधले होते. या मंदिरात गोदावरी व भगीरथ देवांच्या मूर्ती आहेत. हे मंदीर कार्तिक पोर्णिमेच्या दिवशी 12 वर्षातून एकदा उघडले जाते आणि सिंहस्थ कालावधीत 13 महिने उघडे असते. इतर 11 वर्ष हे मंदीर बंद असते.


रामकुंड

रामकुंड हे नाशिक येथे गोदावरी नदीपात्रात असून मध्यवर्ती बसस्थानकापासून दोन कि.मी. अंतरावर आहे. वनवासादरम्यान या ठिकाणी प्रभुराम स्नान करीत होते अशी मान्यता असल्याने यास पवित्र समजले जाते. या कुंडा जवळच ‘’अस्थिविलय तीर्थ ‘’ आहे. रामकुंडाचे बांधकाम सातारा जिल्हयातील खटावचे जमिनदार श्री. चित्रराव खटाव यांनी 1696 मध्ये केले. श्री श्रीमंत माधवराव पेशवे (चौथे पेशवे) यांच्या मातोश्री श्रीमती गोपिकाबाई यांनी नंतरच्या काळात रामकुंडाची दुरुस्ती केली.भाविक आपल्या मृत नातेवाइकांच्या अस्थि, अस्थिविलयकुंडात विसर्जित करतात.महात्मा गांधी,पंडीत नेहरु,इंदिरा गांधी,यशवंतराव चव्हाण यांचेसह अनेक महान नेत्यांच्या अस्थि रामकुंड येथे विसर्जित करण्यात आल्या आहेत.


धम्मगिरी

एस. एन. गोयंका द्वारा स्थापित, धम्मगिरी एक ध्यान केंद्र आहे. विपश्यना (अंतर्ज्ञान चिंतन) मध्ये भारतातील बुद्ध, 2500 वर्षांपूर्वी शिकवलेल्या तंत्रात अभ्यासक्रम देते. मोठे गोल्डन पॅगोडा, धम्मगिरीचे केंद्रिय थीम इगतपुरीसाठी एक महत्त्वाचे स्थान म्हणून कार्य करते. केंद्र भारत तसेच देशाच्या विविध भागापासून बरेच लोक आकर्षित करते


Rate this content
Log in