Jyoti gosavi

Others

4.0  

Jyoti gosavi

Others

मराठीची गळचेपी

मराठीची गळचेपी

2 mins
168


आज काल आपण जिकडे तिकडे मराठीची गळचेपी होते, मराठी भाषा वाचली पाहिजे .अशी ओरड ऐकतो, वाचतो, पण आपण स्वतः मराठी भाषा वाचवण्यासाठी काय करतो? किती हातभार लावतोय? काय प्रयत्न करतो? याचा विचार कधी कोणी केलाय का? 


मराठी वाचवण्यासाठी, आपली मुले मराठी शाळेत घातलीच पाहिजे असा काही दंडक नाही.आजकालच्या बदलत्या काळानुसार इंग्लिश ही जग भराची भाषा झाली आहे. त्यामुळे पुढे करिअर करण्यासाठी त्याची आवश्यकता आहे.कारण इंग्लिश येत नसेल तर आपल्या मुलांना बाहेरच्या जगात बोलताना न्यूनगंड निर्माण होतो.


पण मुलांशी बोलताना घरात कटाक्षाने मराठीतच बोलले पाहिजे .त्यांच्यावर ती आपल्या संस्कृतीचे, आपल्या सणावारांचे, संस्कार केले पाहिजेत.त्यांना आपल्या मातृभाषेत बोलण्याची लाज वाटून देऊ नका. इतर प्रांतीय लोकांशी तुलना केली तर, ते लोक त्यांच्या भाषेतच एकमेकांशी बोलतात.त्यांच्या भाषेचे सिनेमे बघतात.


मात्र मराठी सिनेमाला आजही निर्मितीसाठी सरकारी ग्रॅंट मिळावी लागते.आणि थेटर मध्ये प्रेक्षकांची वाट पाहावी लागते.त्यामुळे आपणच आपल्या मराठी सिनेमांना, मायबाप प्रेक्षक बनून आधार दिला पाहिजे. राष्ट्रपती पदावर असताना माननीय अब्दुल कलाम देखील दौऱ्यावर गेल्यावर, त्यांच्या भाषेत आपल्या लोकांशी बोलत होते.भाषण देताना मातृभाषेत देत होते. आपल्या मराठी भाषे सारखी समृद्ध भाषा नाही.अगदी चौदाव्या शतकापासून ज्ञानोबाराय यांनी समृद्ध केलेली ही भाषा, 

"माझ्या मराठीची बोलू कौतुके 

अमृतातेही पैजा जिंके"

 असं ज्ञानदेवांनी सांगून ठेवलला आहे .


त्यात तुकोबांनी ,रामदासांनी, नाथांनी, मोरोपंतांनी कवी, मुकुंदराज आणि अशा अनेक अगणित व्यक्तींनी आपल्या परीने तिला समृद्ध केले.

अशी मराठी आज राजदरबारी अक्षरशः जुने नेसून दारात उभी आहे. इंग्रजी आणि आता तिच्या पाठोपाठ हिंदी देखील तिथे भरजरी वस्त्रे घालून मिरवत आहेत आणि माझी मराठी माय मराठी मात्र स्वतःच्या घरात पण  परकी झाली आहे.


"ज्ञानोबांची, तुकयाची मुक्तेश्वरची जनाईची

 माझी मराठी चोखडी रामदास शिवाजीची


तिला पुन्हा मानाचे स्थान, आणि मानाचे पान दिले पाहिजे. आज मुंबईमध्ये दोन मराठी माणसे एकमेकांशी बोलताना प्रथम हिंदीमध्ये बोलतात, आणि मग मराठी आहे असे वाटले तर एकमेकांशी मराठीत बोलतात. काही मराठी माणसांना तर सांगून सुद्धा मी मराठी आहे! मराठीत बोला! तरी ते लोक आपल्याशी हिंदीत बोलत राहतात. उच्चभ्रू संस्कृतीतल्या माणसांना तर, मराठीत बोलण्याचा कमीपणा वाटतो . गरीब माणसांना, अगदी शिकलेल्यांना देखील, करार मदार कोर्टाची कागदपत्रे यावर नाही समजले तरी सह्या करून द्यावे लागतात.यासाठी शासनाने पुढाकार घेऊन मराठी सगळीकडे सक्तीची केली पाहिजे.


नोकरीधंद्यात भूमिपुत्रांना प्राधान्य दिले पाहिजे.समाजातील सर्व स्तरांत मराठी वाहिन्या बघणे, मराठी पुस्तक विकत घेऊन वाचणे, मराठी नाटक, सिनेमे पाहणे , एकमेकाशी मराठीतच बोलणे ,इतके जरी पथ्य पाळले ना! तरी मराठीला सुखाचे दिवस येतील.


Rate this content
Log in