Jyoti gosavi

Children Stories Inspirational

4  

Jyoti gosavi

Children Stories Inspirational

मिठाईचा वास

मिठाईचा वास

3 mins
675


विजय नगर मध्ये राजा कृष्णदेवराय यांच्या पदरी तेनाली रामा नावाचा एक बुद्धिमान ब्राह्मण त्यांचा सल्लागार म्हणून काम करीत होता. तेनालीरामाच्या बुद्धिमत्तेची दूरदूरपर्यंत ख्याती पसरलेली होती. गोरगरिबांवर अन्याय होत असताना, त्यांना तेनाली रामा त्यातून उत्तम मार्ग काढून देई. आणि अन्याय करणाराला सजा मिळत असे. 

असाच तेनालीरामाच्या बुद्धी चातुर्याचा एक किस्सा आता ऐकू या. 

एकदा एक गरीब मनुष्य एका मिठाईच्या दुकानाच्या जवळून जात होता. काउंटर वरती मिठाईच्या परातीच्या पराती भरून ठेवलेल्या होत्या. त्यामध्ये बुंदीचे लाडू, रसरशीत भगव्या रंगाची जिलेबी, मावा बर्फी खोबरे बर्फी पेढे इत्यादी गोष्टी ठेवलेल्या होत्या .

ताज्या ताज्या मिठाईचा घमघमाट आजूबाजूला सुटलेला होता. 

त्याने रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या कोणाचे पण मन लालचावले असते. असाच एक गरीब मनुष्य त्या रस्त्याने चालला होता मिठाईच्या वासाने त्याची जीभ चाळवली. परंतु खिशामध्ये पैसा नसल्याने तो फक्त तेथे उभा राहून त्या मिठाईचा सुगंध घेत होता. इतक्यात दुकानदाराचे लक्ष त्या मनुष्याकडे गेले, हा तर एकदम भिकारी दिसतो हा काही आपली मिठाई विकत घेणार नाही. परंतु आपल्या मिठाई चा हा फुकट वास घेत आहे. हा जर येथे असाच उभा राहिला तर दुसरे गिऱ्हाईक देखील आपल्या दुकानाकडे फिरकणार नाही .

त्यापेक्षा या भिकाऱ्याला अशी अद्दल घडवतो की पुन्हा कुठल्याच मिठाईच्या दुकानासमोर उभा राहणार नाही. दुकानदाराने त्याला आवाज दिला 

काय बाबा! काय पाहिजे?


 काही नको महाराज. 


असे तसे एवढा वेळ तुम्ही आमच्या दुकानापुढे उभे राहिलात, तर तुम्हाला काहीतरी घेतलेच पाहिजे. 


नाही महाराज माझ्याकडे पैसे नाही. 


मग तुम्ही दुकाना पुढे का उभे राहिलात?


 महाराज ! गरिबाने फक्त वास घेतला. त्याच्यावरच तृप्ती मानतो आहे. 

मिठाई खरेदी करायला माझ्याकडे पैसे नाहीत. 


 पण तू आमच्या मिठाईचा वास घेतलास,त्याने तुझे मन तृप्त झाले. तुला पोट भरल्यासारखे वाटले! मिठाई खाल्ल्या सारखे वाटले !होय कि नाही? 

खरे की नाही? 


होय महाराज अगदी खरे, मी तर नुसत्या मिठाईच्या वासाने तृप्त झालो .


तर मग तू आता मिठाई खाल्ल्याचे पैसे दे. 


असे कसे महाराज! मी जर तुमची मिठाई घेतलीच नाही, तर मी त्याचे पैसे का देऊ? 


अरे पण तूच आता बोललास ना! की तुझे मन तृप्त झाले, तुला मिठाई खाल्ल्या सारखे वाटले. मग त्याचे पैसे तू द्यायला नको? 


महाराज मज गरिबाकडे जर पैसे असते मी तर मिठाई विकत घेतली नसती का? 


म्हणजे तुला आता आमच्या मिठाईचे पैसे द्यायचे नाहीत? तुला सारे फुकट पाहिजे. 

बर! पैसे नसतील तर ही मिठाई बनवलेली सर्व भांडी घासून दे. दुकानाची झाडलोट करून दे. 


पण महाराज मी फुकट तुमचे काम का करू? तुम्ही मला मिठाई देणार असाल तर मी करेन. 


अरे मिठाई तर तू मगाशीच खाल्लीस, तूच म्हणालास ना? की मिठाई खाल्ल्या सारखे तृप्त वाटले म्हणून. 


अशा रीतीने त्या दोघांमध्ये भांडण सुरू झाले. रस्त्यावर मंडळी जमली. 

कोणी दुकानदाराच्या बाजूने बोलू लागले, तर कोणी भिकाऱ्या च्या बाजूने बोलू लागले. शेवटी हा झगडा राजा कृष्णदेवराय यांच्या दरबारात गेला. 

त्यांनीच तेनालीराम यांच्याकडे तंटा सोडवण्यासाठी पाठवला. त्यांने दोन्ही बाजू ऐकून घेतल्या आणि भिकाऱ्याला सांगितले. 

तू यांच्या मिठाईचा वास घेतलास आणि मिठाई खाल्ल्या सारखे तृप्त वाटले. असे कबूल केलेस. त्यामुळे तुला आता पैसे दिले पाहिजेत. 

त्याबरोबर व्यापारी आणि त्याच्यासारखी श्रीमंत माणसे यांच्या चेहऱ्यावरती हसू आले, तर भिकारी आणि त्याच्यासारखे गरीब माणसे त्यांचे चेहरे रडवेले झाले. 

कारण त्यांना असे वाटत होते की तेनाली रामा तरी आपल्याला न्याय देईल. आजपर्यंत त्याच्या बुद्धिचातुर्य ची ख्याती ऐकली होती .

तो महाराजांचा मुख्य सल्लागार होता. पण शेवटी म्हणतात ना गरिबांना कोणी वाली नसते .पैसेवाला पैसे वाल्याची बाजू घेतो .अशी चर्चा गरीब लोकांमध्ये सुरू झाली .परंतु तेनाली रामा ने असे सांगितले की तू आत्ताच्या आत्ता व्यापाऱ्याला आमच्या समोर पैसे द्यायचे. परंतु मी सांगतो तशा पद्धतीने द्यायचे. 

आता तेनाली काय करतो म्हणून सर्व दरबार उत्सुकतेने बघू लागला .

राजा कृष्णदेवराय देखील उत्सुकतेने तेनाली रामाकडे बघू लागले. 

तेनाली रामा ने आपल्या खिशातून काही सुट्टी नाणी काढली आणि भिकार्‍याच्या खिशात टाकली, आणि सांगितले याचा खुळखुळ आवाज कर. त्या बरोबर व्यापार्‍याला विचारले पैशाचा आवाज ऐकला ना? 

व्यापारी म्हणाला, ऐकला! 

मग आता तुम्हाला पैसे मिळाले. 

व्यापारी म्हणू लागला असे कसे? पैशाचा फक्त खुळखुळ आवाज ऐकला. त्याने पैसा कसा मिळेल? मग तेनाली रामा ने विचारले तुझ्या मिठाईचा फक्त वास घेतला तर माणसाचे पोट कसे भरेल? 

तू वास घेतल्याचे पैसे मागितलेस. 

 म्हणून पैशाचं आवाज ऐकला की तुला पैसे मिळाले असे समज.

उलट्या गरीब माणसाला त्रास दिल्याबद्दल तुला दोन मोहरा दंड करण्यात येत आहे आणि तो दंड त्या गरीब भिकाऱ्याला देण्यात यावा. 

 त्याबरोबर तो व्यापारी मान खाली घालून दरबारातून निघून गेला आणि उरलेल्या लोकांनी राजा कृष्णदेवराय आणि तेनाली रामा यांचा जय जयकार केला. 


Rate this content
Log in