मी आजची सावित्री
मी आजची सावित्री


पुराण कालापासून स्त्रियांबाबत समाजाचा दृष्टीकोन चांगलाच आहे, असं म्हणता येत नाही. पण काही ठिकाणी स्त्रियांचे चांगले चित्र उभं केलेले आहे. खरं तर स्त्रीयांचे कर्तृत्व हे तेव्हाही चांगलेच होते आजही चांगलेच आहे. तेव्हापेक्षा आज अधिक जोमाने आणि धाडसाने स्त्रीचा वावर दिसतो आहे. 'चूल आणि मूल'चा जमाना केव्हाच मागं पडला आहे. मनु संस्कृतीत अडकलेली प्रवृत्ती स्त्रीयांना हीन वागणूक देत आलीआहे.पडद्यामध्ये स्त्रियांना ठेऊन हवा तसा तिचा भोग घेत आलेला समाज विचाराने फार प्रगल्भ झाला आहे, असं आजही म्हणता येत नाही. पण आपल्या बुद्धीने आणि जिद्दीने स्त्री पुढेपुढे जात आहे. इंग्रजांचे जुलमी राज्य होते पण सुधारणावादीपण होते हे मात्र नक्की. म्हणूनच लार्ड बेंटींगच्या प्रयत्नाने आणि राजाराम मोहनराय या भारतीय सुधारकाच्या मेहनतीने जुलमी सती प्रथा बंद झाली. स्त्री स्वातंत्र्यावर जुलमी आणि जाचक असणारी ही प्रथा स्त्रियांना दुय्यम स्थान दर्शविणारी अशीच होती.
पुराणात आणि इतिहासात अनेक स्त्रिया या नावलौकिक आणि कर्तृत्व गाजवून गेल्या आहेत. पण त्यांचा गौरव समाजापुढं हवा तेवढा झाला नाही, होऊ दिला नाही. पुरुषप्रधान संस्कृती आणि पुरुषी अहंकार नेहमीच स्त्रियांना दुय्यमस्थानी ठेवत आला आहे. आपल्या मनगटातील नेटानं तिनं दाखवलेला एखादा पराक्रमही पुरुषांना पचनी पडत नाही.
शिक्षणापासून कोसोदूर असणारी स्त्री केवळ भोगवस्तू म्हणून होती. तिला ना विचाराचे स्वातंत्र्य ना आचाराचे वा बोलण्याचे स्वातंत्र्य होते. रुढी आणि परंपरा जपण्याचे वा त्या सक्तीने पाळण्याचा जणू तिच्यासाठी दंडकच होता. घरातील कर्त्या पुरुषाने घेतलेला निर्णय आणि लादलेली जबाबदारी तिला विनाविरोध निभवावी लागत असे. बालविवाहासारख्या अनिष्ट रितीने तर बालपण हरपून आणि करपून जात असे. पुराणात रामाबरोबर सीतेला वनवास भोगावा लागला, ऊर्मिलेला तर घरी राहून का वनवास सहन करावा लागला? भर सभेतच द्रौपदीचे वस्त्रहरण, रामाचा सीतात्याग, तिची अग्निपरीक्षा काय काय आणि कशीकशी वागणूक केली आहे स्त्रीबरोबर. भारतावर अनेक परकीय आक्रमणे झाली त्यातही शत्रूची पहिली शिकार स्त्रीच होत आली आहे, अगदी आजही तीच गत आहे.
ज्योतिराव व सावित्रीबाई फुले यांच्या अलौकिक प्रयत्नामुळे चित्र बदलत गेलं. पण प्रवृत्तीची मुळं खोलखोल रूतलेल्या समाजाला शिक्षण घेतलेली स्त्री पण रुचेना गेली. भ्रामक कल्पना आणि परंपरेला चिकटलेला माणूस मुलीला जन्म देण्यापासून स्वत:ला रोखू लागला. मुली आईच्या गर्भातच गुदमरु लागल्या... त्या तिथंच मरु लागल्या, त्यांना तिथंच मारले जाऊ लागले... मुलांपेक्षा मुली
ंचा जन्मदर घटला, समाजात असमतोल निर्माण झाला. गुन्हेगारी, बलात्कार अतिप्रसंग, विनयभंग नाना प्रकार वाढत गेले, चाललेत. हुंड्यासारख्या प्रथा मुलींच्या बापाला पापाच्या वाटेला घेऊन जातात. हुंडा देऊनही मुलीच्या सुखाची शाश्वती नसते. मग मुलीलाही आपल्या जन्माचं ओझं होतं, स्वत:ला शोधते आणि स्वगत म्हणते...
स्त्री म्हणून
दु:खानं भरलेली दुनिया सारी
पण माझं दु:ख आगळं सर्वापरी
स्त्री म्हणून मी जन्माला आले
आई वडिलांनाही दु:खच झाले...!
मातेनेच जन्म दिला पुरुष मुलांना
मग तुच्छ का लेखावे स्त्री मुलींना
स्त्री म्हणून मी जन्माला आले
जगण्यातला आनंद विसरुनच गेले....!
वयाआधीच लग्न उरखले
हुंड्यासाठी त्यांनी छळले
स्त्री म्हणून मी जन्माला आले
जीवनात मी कित्येकदा मेले....!
तोडण्या रुढी श्रृंखला घेते मी पुढाकार
तेव्हा समाजच करतो माझा धिक्कार
स्त्री म्हणून मी जन्माला आले
अन्यायाशिवाय कांही न भोगले..!
फार भोगले फार सोसले
लढण्या आता सिद्ध मी जहाले
भावनेने पेटले स्त्रीत्वाच्या
तोडीन श्रृंखला पुरुष बंधनाच्या..!!
या भावनेचा उद्रेक झालेली आज स्त्री दिसते आहे. सैराट जीवनशैली जगण्याची आस घेऊन पुढं आलेली स्त्री सर्व क्षेत्रात व्यापून राहिलेली स्त्री धाडसीच म्हणावी लागेल. खेळ, शिक्षण, व्यवसाय, संगीत, आकाश, विज्ञान, तंत्रज्ञान... कोणतंही क्षेत्र शिल्लक नाही जिथं स्त्री पोहचली नाही. जखम बरी होते पण ओरखडा किंवा व्रण शिल्लक राहतो त्याप्रमाणे स्त्री कितीही पुढं गेली किंवा आकाश कवेत घेतलं तरी दर्जाहीन प्रवृत्तींना ही गोष्ट पचत नसते. तेव्हा या धाडसी महिला, पोरींच्या जिद्दीला आणि धाडसाला आपण पुरुषांनी ताकद दिली पाहिजे. जी मी दिली आहे... मी स्वाभिमानाने सांगतो आणि वागतो आहे दोन मुलींचा बाप म्हणून..! मला दोन मुलीच आहेत याची खंत नसून अभिमान आहे मला. भयमुक्त जीवन जगण्याचा आपल्याएवढाच मुलींना, आजच्या सावित्रींना अधिकार आहे. तसं त्या भित्र्या मुळीच नाहीत पण गरज आहे ती फक्त तुमची आमची विचारसरणी बदलण्याची.
तिच्या धाडसाला तुमची ताकद लावण्याची...
कारण ती तर म्हणतेय...
"देखना ही चाहते हो मेरी उडान को
तो जरा उंचा करो आसमान कों"