STORYMIRROR

Nilesh Desai

Others

3  

Nilesh Desai

Others

माणूसपणाचा आधार

माणूसपणाचा आधार

7 mins
596


ट्रिंग् ट्रिंग् ट्रिंग्ग् ...... सकाळी फोन वाजला तसा अजयने उचलला. खरंतर त्याच्या रिंगचा गोंधळ रूममधल्या शांततेचा भंग करत होता म्हणूनच तो लवकर उचलला गेला. "हॅलो.... हा बोला...." अजय.

पलीकडून ओळखीचा आवाज ऐकला तसा तो अंथरुणातून उठून बसला. गावाहून आईचा फोन होता. पंधरावीस मिनिटं आईशी बोलून झाल्यावर त्याने आवरायला घेतलं. तसा रविवार असल्याने उठायला जीवावर आलेलं त्याच्या. पण आईच्या सांगण्यावरून अजयला लवकर तयार व्हायला हवं होतं. घड्याळ पाहीले तर नऊ वाजलेले. इतक्यात मामा येईल हे लक्षात घेऊन त्याने भरभर तयारी सुरू केली.


आईने सांगितले त्याप्रमाणे अजयच्या बाजूच्याच गावातल्या एका मुलीचे स्थळ सांगून आले होते. अजयच्या दूरच्या आत्याने मध्यस्थी करून त्याच्या नातेवाईकांसमोर आणि आईसमोर हा प्रस्ताव मांडला होता. अजयचे बाबा दोन वर्षांपूर्वीच आजारामुळे जग सोडून गेले होते. अजय मुंबईत कामाला तर गावी आई आणि लहान बहीण. त्याच्या या दूरच्या आत्याने नेहमीच यांना पाण्यात पाहीलेले. काही माणसं नाही का विनाकारण एखाद्याचं वाईट चिंतीत असतात. अगदी त्याच यादीतली ही दूरची आत्या. होणार्या पाहुण्यांची ईस्टेट, पैसा आणि दोन मुली, मुलगा नाही अशी छाप तीने अजयच्या आईकडे टाकली होती. आणि काही गोष्टी सोईस्कर जाणीवपूर्वक सांगायचं टाळले होते. कारणही तसेच होते. हे लग्न जमल्यास अजयच्या आत्याला एक लाख रूपये मिळणार होते.


इकडे अजयची आई आतापर्यंतच्या गरीबीमुळे यापुढे तरी मुलाचं भविष्य चांगलं होईल या भोळ्याभाबड्या आशेने या प्रस्तावाला पाहत होती. तसं आईनं अजयला फोनवर सांगितले की "तू मामाबरोबर मुलगी पाहून ये, अन तुझं तू ठरव. कसलीही जबरदस्ती नाही." त्यासाठीच अजय तयार होत होता. मामा दहा वाजेपर्यंत येईल असे आईने सांगितले होते. लग्नाच्या विषयाने नकळत अजयच्या मनात संमिश्र तरंग उमटत होती. किती पटापट हल्लीची काही वर्षे निघून गेली. आपली आजपर्यंतची वाटचाल हलकेच त्याच्या विचारांत तरळू लागली.



अजय... बाबांच्या जाण्यामुळे थोडं लवकर घरची जबाबदारी अंगावर घेतलेला होतकरू तरूण. सुरूवातीला तालूक्याच्या ठिकाणी एका कपड्याच्या दूकानात काम केले. पण पुढे बहीणीचे शिक्षण आणि भविष्यात लागणारी पैश्याची निकड जाणून मुंबईत आला. बीए पास अजय मामाच्या ओळखीने एका हाॅटेलचे कॅश काऊंटर सांभाळत होता. महीना सात हजार रूपये पगार. त्यात आपलं भागवून गावी पैसे पाठवायचे आणि वर शिल्लकही ठेवायची अशी तारेवरची कसरत कशीबशी तो सांभाळत होता. दोन तीन महीन्यातच तो तिथे चांगलाच रूळला होता. चाळीत मामाच्या वन रूम किचनच्या समोरच्या मंदीरात झोपायचीही सोय झालेली. 


गरीबीच्या झळा सोसत अन् मन मारून जगण्याची सवय अंगवळणी पाडून घेत अजय समाधानाने आला दिवस ढकलत होता. कामात सर्वांशी अदबीने वागणे, ग्राहकांशी आदराने बोलणे आणि महत्त्वाचे म्हणजे त्याचा प्रामाणिकपणा यामुळे मालकही त्याच्यावर खुश होता. रोज येणार्या ग्राहकांशी अजय हसून बोलून राहायचा. बरेच ग्राहकही आपुलकीने त्याची विचारपूस करायचे. प्रतिभा मॅडमही त्यातल्याच एक होत्या. एक दिवस हॉटेलमध्ये दोन वेटर्सनी एकदम सुट्टी मारली. मग काऊंटर सांभाळत अजय ग्राहकांना जेवण सर्व्ह करत होता. प्रतिभा मॅडम सकाळी नाश्ता करायला म्हणून आलेल्या. त्यांची ऑर्डर घेऊन अजय निघाला तोच प्रतिभा मॅडमनी अजयला त्याच्या शिक्षणाबद्दल विचारले. अजय बीए पास असून त्याच्यातले पोटेन्शिअल आणि वागणूकीतले गुण प्रतिभा मॅडमनी हेरले होते. अजयला त्यांनी एक फोन नंबर आणि पत्ता दिला आणि दुसर्या दिवशी त्या पत्त्यावर इंटरव्हयूसाठी जायला सांगितले. 



दुसर्या दिवशी अजय ठरलेल्या वेळेवर तिथे पोहोचला. एका मोठ्या रिटेल कंपनीचे सात मजली असे ते हेडऑफिस होते. एचआर रूममध्ये पोहोचल्यावर त्याने आतमध्ये पाहीले आणि आश्चर्याची एक छटा त्याच्या चेहर्यावर आली. प्रतिभा मॅडम आणि त्यांचे सहकारी आतमध्ये बसले होते. कंपनीत ज्यूनिअर बायरची जागा रिकामी होती. आणि त्यासाठीच प्रतिभा मॅडमनी अजयची वर्णी लावली होती. अजयची रूजू होण्यासाठीची सगळी औपचारिकता प्रतिभा मॅडमनी अगोदरच पूर्ण करून ठेवलेली. संबधित विभागातही तशी कल्पना त्यांनी दिली होती. अजयला आत बसवून प्रतिभा मॅडमनी त्याच्या हातात अपाॅईंटमेंट लेटर दिले आणि एक नजर मारायला सांगितले. 



अजयने लेटर उघडून सर्व नीट वाचले, पगाराच्या आकड्यांत पंधरा हजार रुपये त्याने चारपाच वेळा तरी पाहीले. त्याच्या डोळ्यांत आनंदाश्रू येऊ लागले आणि प्रतिभा मॅडमकडे हात जोडून आभार मानायला तो पुढे सरसावला. त्याच्या चेहर्यावरचे हावभाव पाहून मॅडम बोलल्या... "कोणताही माणूस पैशाने, शरीररचनेने कधीच कमजोर नसतो, माणूस फक्त त्याच्यातल्या विचारांनी कमीअधिक प्रमाणात कमजोर वा शक्तीशाली होत असतो..." "मलाही असंच कुणीतरी हात दिला जेव्हा मी कमजोर होते..." 


"तुलाही कोणीतरी भेटेल ज्याचं मन चांगल असेल पण काही कारणास्तव त्याला सावरणारं कोणी नसेल..." "अशा व्यक्तींना तू हात द्यायला विसरू नकोस..." प्रतिभा मॅडम.



फ्लॅशबॅकमधून बाहेर आलेल्या अजयच्या मनात प्रतिभा मॅडमचे ते शब्द ठळकपणे कोरले होते. त्या प्रसंगानंतर दोन वर्षे गेली. प्रतिभा मॅडम दुसर्या शहरात प्रमोट होऊन गेल्या. इकडे अजय त्याच कंपनीत परमनंट होऊन सिनीयर बायर झाला. पगारही पंचवीस हजारावर पोहोचलेला आणि वर परफॉरमन्स बोनस वर्षाला लाखभर रूपये मिळत होता. अजय आता कंपनीच्याच गेस्टहाऊसमध्ये राहत होता.



अंघोळ नाश्ता आवरून अजय तयार होऊन मामाची वाट पाहत बसला. दहा वाजता मामा आला आणि दरवाज्यातूनच त्याने अजयला घाईत निघायला सांगितले. थोड्याच वेळात ते मुख्य रस्त्यावर आले. मामाने सांगितल्याप्रमाणे मुलीचे वडील शहरात बर्यापैकी जम बसवलेले एक बिल्डर होते. कल्याणमध्ये त्यांचे स्वतःचे तीन फ्लॅट होते. शिवाय भाड्याने चालवायला दिलेले एक गॅरेजही होते. मुळचे अजयच्याच बाजूच्

या गावातले. गावीही मोठा बंगला बांधला होता. मुलीला एकच लहान बहीण. आईवडील आणि दोन मुली असा त्यांचा संसार. 



साधारणतः एक तासात अजय आणि मामा मुलीच्या घरी पोहोचले. मुलगी अगोदरपासूनच सोफ्यावर येऊन बसली होती. छान फिकट हिरव्या रंगाच्या साडीत तिचा गौरवर्ण अधिकच खुलून दिसत होता. मोजूनमापून केलेला हलकासा मेकअप तिच्यातल्या साधेपणाचा परीचय देत होता. अजयला पाहता क्षणीच ती आवडली होती. ओळखपाळख होऊन कांदेपोहेंचा कार्यक्रम सुरू झाला. पण कांदेपोहे घेऊन नोकर आला आणि अजयच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. मुलीच्या बाबांनी अजयच्या चेहर्यावरचे भाव ओळखून लगेच विषयाला हात घातला.



"बघा अजयराव, पैश्याची काहीच कमी नाही आम्हाला." "आणि आमची पोरगीही सरळ संमजस आहे. तुम्हाला लग्नानंतर कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही..." मुलीचे बाबा.


अवाक् होऊन ऐकत असलेल्या अजयने त्यांना विचारले.. "म्हणजे नेमके कश्याबाबतीत बोलावयाचे आहे तुम्हाला."



मुलीचे बाबा पुढे बोलले.. "म्हणजे बघा, तुमचं कामाचं स्वरूप, तुमचा स्वभाव, तुम्ही कुठे राहता याची सगळीच माहीती मी अगोदरच गोळा केली आहे. लग्नानंतर कल्याणमधलाच आमचा एक फ्लॅट तुम्हाला मिळेल शिवाय एक गॅरेज आहे ते पण तुमच्या नावे.. बाबांचं वाक्य पूर्ण होण्यापूर्वीच मुलगी सोफ्यावरून उठून त्यांच्याकडे लंगडत जाऊ लागली. हो.. ती एका पायाने अधू होती. बाबांना शांत करून ती अजय आणि त्याच्या मामाकडे वळून पाहू लागली. मामाला याची पूर्वकल्पना होतीच. अजयने तीला छानशी स्माईल देऊन विचारले... "आपण दोघेच बोलू शकतो का?" 

मुलीने प्रश्नार्थक नजरेने बाबांकडे पाहीले. त्यांनीही मानेनच हॉलच्या बाहेर असलेल टेरेस दाखवलं. 



हातात पोह्यांची डिश घेऊन अजय आणि ती टेरेसवर होते. "तुमचं नाव? .. अजय. "वेदान्ती.." ती उत्तरली. अर्धापाऊन तास त्याच्यात एकमेकांविषयी चर्चा झाली. वेदान्ती या नावाबरोबरच तिचा मनमोकळा आणि स्पष्ट स्वभाव अजयला भावला. तिनं सगळे सांगितले त्याला की ती जन्मापासूनच एका पायाने अपंग आहे. ऐम कॉम पूर्ण केलेलं. कॉलेजमध्ये झालेले एकतर्फी प्रेम पण विचारण्याची न झालेली हिम्मत ईथपासून ते बाबांनी आतापर्यंत आणलेली तीन चार स्थळ या सर्वात मनातून खचलेली ती. आता तीची लग्न करण्याची मूळात इच्छाच नव्हती पण बाबांच्या आग्रहाखातर तीला हे सर्व मानावं लागत होतं. "अन् आज तर बाबा सरळसरळ तुमच्यापुढे आर्थिक व्यवहाराच्या भाषेत बोलत आहेत जणू मी त्यांनाही इथे जड होऊ लागलीयं... " तीने मन मोकळं केले.



डिशमधला पोह्यांचा शेवटचा घास खाऊन अजयने विचारले.. "पोहे तू बनवलेत का..? " त्याच्या विषयापासून भरकटलेल्या प्रश्नावर किंचितसं गोंधळून तीनं "हो" म्हणून सांगितले. "पोहे माझा जीव की प्राण आहेत..." तो. "म्हणजे अगदी रोज जरी कोणी मला पोहे खाऊ घातले तरी मी आनंदाने खाईन, अन् त्यातही ते इतके स्वादीष्ट कोणी बनवणारं असेल तर सोने पे सुहागा..." उरलंसुरलं सगळं मनातलं बाहेर काढत अजयने वेदान्तीला प्रतिभा मॅडम विषयी सर्व सांगितले. 


"आणि हो मला तर तू पाहताक्षणीच पसंत पडलेयस, अर्थात तूझं मत तू कळवू शकतेस." "तुझा होकार असेल तर सांग मला थोडी तयारी करावी लागेल." "तसंही मी तुझ्यापेक्षा थोडा कमी शिकलेलो आहे मग बाहेरून मला अॅडमिशन घ्यायला हवे काॅलेजला..." अजय.



वेदान्तीने कल्पना केली नव्हती अजय असे काही बोलेल याची. मनातून ती फारच आनंदी होती पण तरीही कसलेतरी दडपण तिच्यावर होते. पुढे अजून स्पष्टीकरण देत अजय म्हणाला.. "पहा वेदान्ती, तू सुरूवातीपासूनच स्वतःमधल्या उणीवांचा विचार करत राहीलीस. कदाचित तुला तुझं कॉलेजमधले प्रेम मिळालं ही असतं पण तु ते व्यक्त केले नाहीस अन् स्तःमध्येच उणेपणा बघत आलीस. काय झालं की तू ही अशी आहेस, तुझ मन तर कमजोर नाही ना.. मग कशाला फुकाचा न्यूनगंड बाळगून राहायचे. आणि हो आता हे पण लक्षात घ्या की सध्या शिक्षणाने मी तुझ्यापेक्षा उणा आहे मग निर्णय तुझा आहे." अजयने प्रेमळ चतुराईने स्वतःला तीच्याहून कमी लेखले होते.



वेदान्तीच्या मनात अजयला नकार द्यायला कुठे जागाच नव्हती. तरीही अजून होकाराचा निर्णय द्यायला ती कचरत होती. काही न बोलता ती आत हॉलमध्ये आली. मागोमाग अजयही आला. इकडे वेदान्तीचे आईबाबा आतुरतेने अजयच्या निर्णयाची वाट पाहत होते. थोडावेळ शांततेत गेल्यावर अजयने त्याच्या मनातलं वेदान्तीच्या आईबाबांसमोर मांडले. पुढे अजून पुष्टी करत अजय बोलू लागला... 



"खरंतर मी इथे लग्नासाठी फक्त मुलगी बघायला आलो होतो. पण आताच मला घाईत माझ्याकडून होकार कळवावा लागला. याला कारणही तसेच आहे, तुमची मुलगी खरंच खुप गोड स्वभावाची आहे. तुमचा फ्लॅट, गॅरेज यापैकी मला काही नको किंबहुना मी त्या अपेक्षेने आलेलोही नाही. मला इथे आल्यानंतरच तुमच्या मुलीविषयी कळाले. आणि तुमच्या मुलीशी पहील्या भेटीतच मला लव्ह ऍट फर्स्ट साईट काय असते याची कल्पना आली.." "आज किंवा भविष्यातही तुमच्याकडून काही घेऊन मी माझ्या प्रेमावर स्वार्थाचे मळभ नाही पसरवू शकत. तुमच्या मुलीला जमेल तसे खुश ठेवण्याचे सर्व प्रयत्न मी माझे करेन."



अजयचा एकएक शब्द वेदान्तीच्या आईबाबांना कृतकृत्य करून जात होता. अन् मघापासून वेदान्तीच्या होकारात आड आलेली तणावाची हलकीशी रेघ हळूहळू पुसट होत जात होती. तिच्या मनात अजयबद्दल आपुलकी आणि आदर या दोन्ही भावना एकाचवेळी निर्माण झाल्या.



पुन्हा सर्वांसमोर स्पष्टपणे अजयने वेदान्तीला विचारलं... "विल यू मॅरी मी...?"



वेदान्तीच्या होकाराने घरातलं सगळं वातावरण आनंदमय झालं. तीची लहान बहीण मिठाईने सर्वांचं तोंड गोड करू लागली.



अजयला त्याच्या हलाखीच्या दिवसात प्रतिभा मॅडमनी त्याला दिलेला माणूसपणाचा आधार आठवला. 


Rate this content
Log in