Hanamant Padwal

Others

5.0  

Hanamant Padwal

Others

माझ्या अस्तित्वाची पाऊलवाट

माझ्या अस्तित्वाची पाऊलवाट

3 mins
797


पाठीमागे वळून पाहत असताना, आपला जन्म आणि आपल्या जन्मानंतरचा काही काळ तिथपर्यंत नजर पोहोचत नसली तरी जो काळ आठवतो,तिथपर्यंत निश्चितच आपल्याला अवलोकन करता येईल.सुखदुःखाची चढउतार करत असताना अनेक प्रसंगांना तोंड देत आज इथपर्यंत आपण पोहोचलो आहोत. सुखाचे दिवस आल्यानंतर दुःखे विसरावी म्हणतात.परंतु दुःखाची जाणीव ज्याच्या हृदयात खोल रुतून बसलेली आहे अशाच लोकांना सुखाची किंमत कळत असते. तरीही सुखदुःखापेक्षा कांही गंमतीदार गोष्टीही आपल्या आयुष्याला चिकटून राहतात.... माझ्या अस्तित्वाच्या पाऊल खुणा शोधत असताना या जगातील माझे येणे हे अत्यंत गमतीशीर आहे. माझ्या आईला मुलगी हवी होती. मुलीची वाट पाहता पाहता आम्ही पाच भावंडे जन्मला आलो. माझ्या जन्माच्या वेळी निश्चितच मुलगी होईल या आशेने घरातील सर्वजण मंडळी वाट पाहत होती. परंतु माझ्या  जन्माने घरातील सर्वांची निराशा झाली. आणि कार्टेच जन्मले या शब्दानी माझ्या जन्माचे स्वागत झाले. मी जसजसा मोठा होत होता तसतसे आई मला मुलीची संबोधने लावून वाढवत होती एवढेच नाही तर मला गिरिजा या नावाने बोलावले जाई समाजातील आजची विदारकता पाहिल्यानंतर आणि पूर्वी मुलीबद्दल ओढ असणारी माझी आई .हा विचार केल्यानंतर या दोन्हीतील तफावत माझ्या लक्ष्यामध्ये येते आणि मन दुखी होते.त्या काळात देखील मुलींची अपेक्षा होती आणि आज समाजामध्ये मुलींना नाकारले जाते ही दुर्दैवाची गोष्ट आहे. इयत्ता तिसरी चौथी शिकलेली माझी आई विचाराने प्रगल्भ होती हे मला आज पटते आहे.इयत्ता वाढत जाणारी प्रमाणपत्रे गोळा करत शिक्षण घेतलेली आजची पिढी आणि जुन्या काळातील कमी शिक्षण घेतलेली असून सुद्धा सुसंस्काराची शिदोरी जपणारी मानसं आठवल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते,शिक्षण आणि संस्कार या गोष्टी निश्चितच वेगळे आहेत किंवा जी शिकलेले आहेत त्यांना संस्कार संभाळता येतीलच असे सांगता येत नाही. आणि जे शिकलेले नाहीत त्यांच्याकडे संस्कार नाहीत असेही म्हणता येत नाही. अल्पशिक्षित आईच्या संस्कारात मी वाढत गेलो. आणि माझ्या कर्तृत्वावर आईचा असणारा विश्वास मला बळ देत गेला. कोणत्याही कार्यामध्ये मी मग्न होत गेलो आणि ते कार्य तडीस नेण्याचे सामर्थ्य मला तिच्यात असणाऱ्या प्रेरणेतून प्राप्त होत गेले. अनेक प्रकारची यशस्विता प्राप्त करत गेलो. माझ्या उत्कर्षाचा काळ माझ्या आईला पाहता आला नाही.हे माझ्या मनात सलत असणारे दुःख घेऊन आजही मी वावरतो आहे. सांस्कृतिक कला गुणांचा घरात वारसा नसताना देखील अभिनय करण्याची कला माझ्यामधे निश्चितच होती. छोटी छोटी नाटके, व्यावसायिक नाटके मित्रांच्या सोबतीने मी करत होतो.आणि अभिनयाचा ठसा लोकांच्या मनावर बिंबवत होतो.यातूनच पुढे मी वक्तृत्व कला जोपासत गेलो. कॉलेज जीवनामध्ये वक्तृत्वाचा झेंडा अनेक जिल्ह्यात रोवून आल्यानंतर माझं कौतुक आई गावभर सांगत होती.आज जिल्हाभर उत्कृष्ट सूत्रसंचालक म्हणून प्रसिद्धी पावत आहे. माझ्या सूत्रसंचलनाला मंत्री, साहित्यिक, सिनेकलाकार आदीनी दाद दिली आहे.याचा आजही मला सार्थ अभिमान वाटतो आहे.त्याशिवाय लेखनाची आवड निर्माण होत गेली. काव्य,प्रसंगीक लेख, वात्रटिका त्याचबरोबर कविता हे सर्व प्रकार साहित्यिकांच्या सोबत राहून शिकत आणि जोपासत गेलो. माझ्या कर्तृत्वाचा अभिमान बाळगणारी माझी आई आज नाही अशा वेळेला माधव जूलियन च्या कवितेच्या ओळीची आठवण मला होते. नोकरीच्या निमित्तानं मी घरापासून दूर गेलो घरामध्ये असताना साधा चहा देखील मला करता येत नव्हता आणि दूर पुणे जिल्ह्यामध्ये डोंगरी गावात मला प्रथम नेमणूक मिळाली मी शिक्षक म्हणून त्या ठिकाणी रुजू झालो. अंगामध्ये चांगुलपणा, लोकांना जवळ करण्याचा गुण, सर्वासमक्ष आणि सर्व लोकांमध्ये मिळून-मिसळून राहण्याचे कौशल्य माझ्यात असल्याकारणाने मित्रत्व ही माझ्या जिव्हाळ्याची गोष्ट मी कायम संभाळत आलो आहे.माझा मित्रपरिवार व्यापक आहे. आणि तीच खरी माझी संपत्ती आहे. नोकरीच्या गावी माझा पार्टनर असणारा माझा मित्र माझ्या आणि त्याचा लग्नाअगोदर चार वर्ष मला स्वयंपाक करून घालत होता माझ्या आयुष्यातील ही एक अविस्मरणीय गोष्ट आहे. शिक्षक चळवळीमध्ये काम करत असताना संघटने मधून अनेक पदावरती मी काम केलेले आहे.प्राथमिक शिक्षकाच्या जिल्हा सोसायटीचे चेअरमन पदही मला प्राप्त झाले होते. आईकडून प्राप्त झालेली सडेतोड वृत्ती आणि वडिलांकडून प्राप्त झालेल्या सामाजिक कार्याचा वसा आणि प्रामाणिकपणाचा गुण जोपासत मी आपल्या सहवासा पर्यंत पोहोचलो आहे. स्त्रियांबाबत कायमच कणव आणि आदर जोपासत लोकहिताला प्राधान्य देण्याची माझी वृत्ती आजही कायम आहे. माझ्याबद्दल मीच अधिक काही सांगत गेलो तर ती आत्मस्तुती होईल. त्याकरिता मी आपल्या सहवासात आलोच आहे.तेव्हा आपणही माझे परीक्षण करावे. माझ्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा चे निरीक्षण करून भविष्यातील वाटचालीसाठी मार्गदर्शन करावे.


दुर दूर चालताना

मागे वळुन बघताना

दूर दिसतात मजला

आठवणी येताना.....


पाय नाही ओढवत 

पुढे नाही जाववतं

गुंते जीव क्षणात

दिवस मोजताना.....


परतुनी माघारी

उजळीत पाऊल खुना

हरखुन बसतो मी

आठवणी वेचताना.....


कधी अशी कधी तशी

जीवा करी वेडीपीशी

छळते मज आठवण

रोज जगताना....


Rate this content
Log in