माझी नोकरी
माझी नोकरी


काय म्हणू बरं तिच्याबद्दल? नोकरी, सखी ,सोबती ,मैत्रीण, पालक सर्वकाही. तिच्यामुळेच आज मी समाजात ताठ मानेने जगू शकते. माझ्या कोणत्याही छोट्या मोठ्या गरजांसाठी मला कोणावर आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहावे लागत नाही .यासाठी पुन्हा जन्मदात्यांचे आभार. कारण , तीन मुलींना सर्वांनाच उत्तम शिक्षण आणि संस्कार देऊन पायावरती उपयोग केलं. आम्हाला भाऊ नाही, माझी आई त्या काळामध्ये म्हणायची मुलींनो तुमची नोकरी हाच तुमचा भाऊ. आमच्या पाठीमागे तुमचं माहेरपण तुमची नोकरीच करेल .
असो ते खरे आहे
1982- 83 ला बारावी झाले आणि जे जे हॉस्पिटल सारख्या ठिकाणी नर्सिंगच्या कोर्सला ऍडमिशन घेतले. पुढे नोकरी देखील लागली . त्या काळामध्ये नोकऱ्या मिळत असत.
माझे तेवढ्यावर समाधान नव्हते ,पुढे मी सायट्रिक नर्सिंग मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आणि मनोविकृती तज्ञ परिचारिका म्हणून जवळ-जवळ 23 वर्षे मनोरुग्णालयात काम केले . लोकांच्या मनामध्ये मनोरुग्ण आणि मनोरुग्णालय याबाबत खूपच संभ्रम असतात , भीती असते, आणि कुतूहल देखील असते. परंतु एकदा जे काम तुम्ही स्वीकारलं ना, ते आनंदाने केलं तर एकदम छान दिवस जातात. मनोरुग्णालयात खरोखर माझे दिवस खूप छान गेले. त्या रुग्णांशी आमचा एक प्रकारचा lPR(interpersonal relationship) निर्माण झालेला असतो जसे सिनेमात पाहतात तसे मनोरुग्ण कधीच नसतात हा शंभरात एखादा excite, violent असतो मनोरुग्णालयात काम करायचे म्हणजे एखादी थोबाडीत एखादा फटका कधी तरी खायची तयारी ठेवली पाहिजे .पण ते मनाने खूप चांगले असतात आपण त्यांना कसे आहात ?विचारण्याऐवजी तेच आपल्याला कसे आहात ? विचारतात... आपल्या मुला बाळापासून नवऱ्या पर्यंत सगळ्या चौकशा करतात. काल का आला नाही ? बरं नाही का? डोकं दाबून देऊ का ? वगैरे वगैरे
ते आपल्याशी खूप प्रेमाने वागतात आता जसं तुम्ही वागाल, तसं समोरचा वागतो. त्यांना खरी प्रेमाची, आपुलकीची ,गरज असते तेच त्यांच्या बरे होण्याची अर्धी थेरेपी असते. आणि सिनेमात दाखवतात तसे शॉक त्यांना दिले जात नाहीत. तर पूर्णपणे भूल देऊन मग शॉक दिले जातात. समाजात प्रत्येक जण कुठे ना कुठे , मनोविकृत असतोच फक्त तो समाजात राहताना आपली पातळी ओलांडत नाही कोणत्याही भावनेचा अतिरेक झाला कि ती मनोविकृती झाली मग तो आनंदाचा अथवा दुःख त्यांच्यामध्ये या भावना कमी-अधिक प्रमाणात कमी- जास्त असतात .
तर अशी माझ्या नोकरीची 23 वर्ष मनोरुग्णालयात गेली खूप छान गेले म्हणजे अक्षरशा मनोरुग्णालय सोडताना इतरांसाठी नाही पण माझ्या मनोरुग्णांसाठी रडू येत होते. आता पुढची नोकरी मी प्रमोशन वरती नर्सिंग ऑफिसर म्हणून मालाड येथे करत आहे ही जनरल हॉस्पिटल ची नोकरी आहे. पण मनोरुग्णालयाच्या नोकरीत त्या वातावरणा बाबत रुग्णां बाबत रुग्णालया बाबत जो आपलेपणा होता तो आता वाटत नाही माझ्या आयुष्यातील 23 वर्ष सोनेरी दिवस होते