लॉकडाऊन
लॉकडाऊन
'आई, लई भूक लागली, काही तरी दे की खायला ...? ' भुकेच्या व्याकुळेने लहान पोरं ओरडून ओरडून आईला सांगत होती. ती आई तरी काय देणार बिचारी, घरात होतं नव्हतं सर्व संपलं होतं, खायला तिचं शरीर तेवढं राहिलं होतं. ती देखील शून्य नजरेने घराच्या छताकडे पाहत होती. तिच्या पोटात देखील कावळे ओरडू लागले होते, भूक लागली म्हणून ती कोणाला सांगणार होती? तिचा धनी बाजारात गेला होता काही खायला मिळेल का याचा शोध घेण्यासाठी. तास दोन तास झाले तरी धनी काही येत नव्हता, ती आपल्या बाळाची समजूत काढत होती, 'रडू नको माय, येतीलच बाबा आता, काही तरी घेऊन.....!' सायंकाळची रात्र झाली. पोरं रडून रडून तशीच झोपली. रात्र वाढत होती, ती आपल्या धन्याची वाट पाहत होती. रात्री दहा वाजले असतील त्या वेळी दारावर कोणीतरी लंगडत लंगडत येत असल्याचे तिला जाणीव झाली. तसं ती बाहेर आली, बघते तर काय तो तिचा धनीच होता. त्याला धड चालतादेखील येत नव्हते, तो कण्हत कण्हत येत होता. घरात पोटाला खायला पैसे नाहीत, मेला आज भी दारू पिऊन आला, मेल्याला दारूला पैसे भेटतात पण घरात लेकराला खाऊ घालायला काही भेटत नाहीत, अशी मनात ती कुरकुर करू लागली. ती धन्यावर मोठ्यानं ओरडणार त्याच वेळी त्याने रडतरडत आवाज दिला, 'मेलो गं मेलो, त्या पोलिसांनं लई बदडलं, काठीनं लई मारलं गं...' असे ऐकल्याबरोबर ती धन्याजवळ पळत गेली आणि त्याला सहारा देऊन घरात आणलं.
खरंच त्याला खूप मार लागलं होतं. त्याने सारी कहाणी सांगितली. सायंकाळच्या वेळेला कुठं काही मिळते का म्हणून तो घराबाहेर पडला. रस्त्यात जागोजागी पोलीस गस्त घालत होते कारणही तसेच होते ना. कोरोना व्हायरसमुळे शहरात गेल्या पाच दिवसापासून लॉकडाऊन झालं होतं. कोणीही घराबाहेर पडू नये अशी सूचना सर्वाना देण्यात आली होती. शहरातील सर्वच दुकाने आणि कारखाने बंद करण्यात आली होती. रस्त्यावर गल्ली बोळात शुकशुकाट होता. तरीही तो पोलिसांचे नजर चुकवून कुठंतरी काहीतरी खायला मिळते का याचा शोध घेत फिरत असतांना पोलिसांच्या तावडीत सापडला. पोलिसांना त्याने आपली करूण कहाणी सांगितली पण ते ऐकायला तयार होईना. त्यातच एका पोलिसाने आपला दंडुका त्याच्यावर चालवला, लगोलग दुसऱ्या पोलिसाने ही दोनचार मार दिले. एवढंच नाही तर पोलीस स्टेशनमध्ये नेऊन बसवलं. तीन चार तासानंतर सोडून दिलं. तो तसाच लंगडत लंगडत घरी आला. तिने त्याला जरासे शेकलं आणि सर्वजण त्या रात्री तसेच झोपी गेले. दुसऱ्या दिवसाची सकाळ कशी उजाडेल? याची कल्पना करून तिला तिला रात्रभर झोप लागली नाही.
आई मला भूक लागली काही तरी खायला दे या आवाजानेच तिला जाग आली. बाबाने रात्री काहीतरी आणलं असेल या आशेपायी ती मुलं आशाळभूत नजरेने पाहत होती. मात्र बाबाची परिस्थिती मुलांना काय माहित? तशी आई काहीच बोलत नव्हती. रोज मोलमजुरी करून आपलं कुटुंब चालविणारे, तिच्या घरात आज काही नव्हतं, मुलांना खाण्यास देण्यासाठी. ती मनोमन देवाची प्रार्थना करत होती. देवा, यापेक्षा आम्हांला तू बोलावून घे, या कोरोनापेक्षा आम्हाला भुकेचा आजार खूप मोठा आहे. देवा, सोडव रे या काळजीतून..! फक्त देवाचा धावा करण्यापलीकडे तिच्या हातात काहीच नव्हतं. तिचा धनी निदान चार दिवस तरी उठू शकणार नाही अशी त्याची स्थिती झाली होती. ती जिथे काम करायला जाते, तो कारखाना गेले पाच दिवस झाले बंद होते त्यामुळे ती तेथे काम करायला जाऊ शकत नव्हती. मुलांच्या शाळाही बंद होत्या त्यामुळे त्यांचे शाळेतील एकवेळचे जेवणही बंद झाले होते. निदान तिथे ही मुलं पोटभर भात तरी खात होते. बऱ्याच वेळा तर ते डब्यात देखील आणत होती. काय करावे तिला काही एक सुचत नव्हते. मुलं भुकेने धाय मोकलून रडत होते.
तेवढ्यात दारावर कोणी तरी दस्तक दिली. गळलेलं अवसान एकत्र करून ती दारावर गेली पाहते तर काय..? कारखान्याचा मालक उभा होता. त्याच्या सोबत चार-पाच माणसंदेखील होती. सर्वांच्या हातात भरलेल्या पिशव्या होत्या. मालकाने एकाला पुढे बोलावलं आणि तिच्या हातात पिशवी द्यायला सांगितलं. तिने पिशवी हातात घेतली आणि त्यात पाहिलं तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पिशवीमध्ये आठवडाभर पुरेल एवढं धान्य होतं. मालकांनी तिला धीर दिला आणि म्हणाला, 'घाबरू नका, लॉकडाऊन संपेपर्यंत तुमच्या घराची काळजी मी घेईन', हे मालकांचे बोलणे ऐकून ती त्यांच्या पाया पडली. मालकांचे आणि देवाचे मनोमन आभार मानले.