लाॅकडाउन चौथा दिवस
लाॅकडाउन चौथा दिवस


प्रिय रोजनिशी,
आज मला सुट्टी होती त्यामुळे आता घरात काय करायचं हा मोठा प्रश्न होता. अर्थात कामवाली बाई नसल्यामुळे अर्धा दिवस तरी स्वयंपाकात जातो. सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, परत संध्याकाळचे जेवण.
सकाळी नाश्त्याला पोहे केले, दुपारी साधेसुधे भाजी, चपाती, वरण, भात... असेही मी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असल्याने काही वेळ टीव्ही बघण्यात जातो, तर काही वेळ मोबाईलवरती जातो. घरातून बाहेर पडले नाही तरी चैन पडत नाही.
आमच्या घरात एक पाळलेला कुत्रा आहे. त्यासाठी आम्ही दोघे भल्या पहाटे उठून बाहेर एक चक्कर मारून येतो त्यावेळी बाहेर कोणी नसते. मोठा मुलगा तर "वर्क फ्रॉम होम" करीत असल्यामुळे दिवसाचे नऊ- साडे नऊ तास कॉम्प्युटरपुढे असतो.
मला आणि छोट्याला कामावर जायचे असते. पण आज मला सुट्टी आहे. दुपारी थोडीशी वामकुक्षी, त्यानंतर सोसायटीमधील एक भटका कुत्रा आजारी आहे त्यासाठी डॉक्टरांना बोलावून त्याला सलाईन वगैरे लावले. इतर रोडवरच्या भटक्या कुत्र्यांना सकाळी-संध्याकाळी आम्ही दोघांनी चेहऱ्याला मास्क बांधून बिस्किट खाऊ घातली. कारण आता सध्या रोडवरील गाड्या वगैरे बंद झाल्यामुळे सगळी कुत्री रोडावलेली आहेत, त्यांना कोणीतरी बाहेर पडून खाऊ घातले पाहिजे.
आमच्यासारखे अजूनही अनेक डॉग लव्हर आहेत तेदेखील कुत्र्यांना खाऊ घालतात. घरात कधी-कधी चर्चा चालू असते अर्थात "कोरोना" विषयी... रात्री मोठ्या मुलाने ग्रील सँडविचेस करून सर्वांना खायला घातली. त्याने हॉटेल मॅनेजमेंट केलेली आहे त्यामुळे अधेमधे आपल्या रेसिपीची चुणूक दाखवत असतो. असो! एकंदरीत आजचा घरातला दिवस बरा गेला.