नासा येवतीकर

Others

5.0  

नासा येवतीकर

Others

कानमंत्र

कानमंत्र

4 mins
1.6K


सर वर्गात आले. हजेरी घेतली. सर्वांनी आपापल्या गृहपाठाच्या वह्या टेबलावर ठेवल्या. सरांनी सर्व वह्या तपासून कोणाचे काय चुकले हे सांगत वही परत करत होते. नाव घेऊन बोलावत होते आणि वही देत होते. शेवटी गृहपाठाची वही कोण आणले नाही त्यांना उभे राहायला सांगितले. तसे वर्गातील मीना, लता, सुरेश, आणि ज्योती उभे राहिले. एका-एकाने कारणे सांगायला सुरुवात केली. जसे ही ज्योतीचा नंबर आला की, ती काही सांगण्याच्या अगोदरच रडायला सुरु केली. तशी ज्योती ही चौथ्या वर्गातली अत्यंत हुशार, प्रामाणिक आणि रोज गृहपाठ पूर्ण करणारी मुलगी होती. त्यामुळे ती का रडत होती हेच सरांना कळेना. सरांनी तिला खूप समजावून सांगितल्यावर ती चूप झाली. तास संपला. मध्यंतरची बेल झाली. सर वर्गाबाहेर गेले. तशी ती सरांच्या मागे मागे गेली. सर ऑफिसमध्ये गेले तशी ती पण ऑफिसमध्ये गेली. परवानगी घेऊन आत गेली आणि सराजवळ जाऊन पुन्हा एकदा रडत रडत म्हणाली, " सर, रात्री माझ्या घरी माझ्या आई-बाबाचे भांडण झाले. बाबाने आईला खूप मारलं आणि सकाळी उठून घर सोडून जा असे म्हणाले. सकाळ झाली. आई उठली आणि पहिल्या गाडीला जाण्यासाठी मला आणि सोमाला घेतली आणि निघाली. पण माझे मन होत नव्हते. मी आईला खोटे बोललो की, आज शाळेत परीक्षा आहे. तेवढी परीक्षा देऊन येतो आणि दुपारच्या गाडी ला जाऊ या. बाबाने या गोष्टीला मान्यता दिली. पण आत्ता आई येणार आहे दुपारच्या गाडीला घेऊन जाण्यासाठी " असे म्हणत ती अजून रडू लागली. सरांना काही सुचेना. तिला रडू नको गप्प होय म्हणून शांत केले आणि सर म्हणाले, " मग आत्ता काय करायचं ? " तेंव्हा ती भरल्या गळ्याने म्हणाली, " सर मला कोठे हि जायचे नाही, येथेच शाळा शिकायचे आहे, तुम्ही सांगा कि, बाबाला समजावून ..!" सरांसमोर खूप मोठा प्रश्न पडला. काय करावे कळेना. तरी तिला " ठीक आहे " असे बोलून वर्गात जाऊन बसण्यास सांगितले. दुपारची वेळ झाली. मुले सर्व जेवायला बसली होती. ज्योती आणि सोमा देखील जेवायला बसले होते. तेवढ्यात त्यांची आई शाळेत आली. रात्रभर रडून रडून डोळे खोल गेले होते, अंगावर मळकट कपडे होते, केसं विस्कटलेले होते, भूक लागलेली आहे हे स्पष्ट जाणवत होते, तिची स्थिती पाहून सरांना कसे तरी वाटले. सकाळपासून पोटात अन्नाचा कण देखील नव्हता. सरांनी तिला ऑफिस मध्ये बोलावलं. खिचडी शिजवणाऱ्या मावशीला सांगून पहिल्यांदा तिला जेवायला दिलं. ती जेवायला तयार होईना तेंव्हा खूप वेळ समजाविल्यानंतर कशी तरी दोन घास जेवली. त्या दरम्यान तिच्याकडून रात्री घरात काय घडलं याचा इतिवृत्तात ऐकून घेतला. तोपर्यंत मुलांचे देखील जेवण झाले. सरांनी म्हटले की, ज्योती आणि सोमा तुमच्या सोबत येत नाही असे बोलत होती काय करणार ? तिला खूप मोठा प्रश्न पडला. काय करावे हेच कळेना. सर म्हणाले अजून थोडा वेळ इथेच बसा मी ज्योतीच्या बाबाला बोलावून घेतो. पाचव्या वर्गातील माधवला बोलून घेऊन ज्योतीच्या बाबाला सरांनी शाळेत बोलाविले म्हणून निरोप पाठविला. थोड्याच वेळात ते शाळेत आले. त्याच्या चेहऱ्यावर अजून ही तो राग दिसत होता. सरांनी त्याला बसायला सांगितले. अगदी शांतपणे सरांनी ज्योती आणि सोमाच्या शिक्षणाविषयी त्याच्याशी चर्चा केली. ज्योतीच्या गृहपाठाच्या वह्या, तिची प्रगती हे सारे सांगितले. ती जर आई सोबत गेली तर तिची आणि सोमाची शाळा बुडेल. आत्ता राहिले फक्त तीन-चार महिने त्यानंतर उन्हाळी सुट्या लागतात. तेंव्हा पुढील निर्णय एका-दोन महिन्यानंतर तुम्हाला काय घ्यायचे ते घ्या. असे म्हणून सरांनी ज्योतीच्या आईला घरी पाठविले, बाबांनी रागातच होकार दिले. आत्ता ज्योतीच्या डोळ्यात अश्रू होते, ते आनंदाचे. तिने सरांचे आभार व्यक्त केले. त्यावेळी सरांनी ज्योतीला जवळ बोलावून घेऊन एक कानमंत्र दिला. ते म्हणाले, तुझे आई-बाबा एकत्र रहावे असे वाटत असेल तर तुला खूप अभ्यास करून शिष्यवृत्तीच्या परीक्षेत यश मिळवायला हवे. तुझ्या हातात तीन चार महिने आहेत. ज्योतीला सुद्धा सरांचा कानमंत्र पटला. त्यादिवशी पासून ती खूप अभ्यास करू लागली. शिष्यवृत्ती परीक्षा जवळ येऊ लागली तशी तिचे काळीज धडधड करू लागले. अखेर परीक्षा संपली. शाळेची परीक्षा देखील संपली. तीन महिन्याचा करार देखील संपला. शाळेला सुट्या लागल्या. ज्योती, सोमा आणि त्यांची आई माहेरी निघून गेल्या. सरांसमोर खूप मोठा प्रश्न होता. ज्योतीला दिलेला कानमंत्र काम करेल काय ? याची काळजी लागली होती. शिष्यवृत्ती परिक्षेचा निकाल लागला आणि काय आश्चर्य ज्योती या परीक्षेत जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होऊन शिष्यवृत्तीधारक बनली होती. त्यानिमित्त जिल्हास्तरावर तिचा आई बाबा सोबत सन्मान केला जाणार होता. पण ज्योतीला प्रश्न पडला की, कोणा सोबत जाऊ. गावात सर्वानी ज्योतीच्या वडिलांचे खूप कौतुक करून अभिनंदन केले. पोरीने बापाचे नाव काढलं असे म्हणू लागली. हे सगळं ऐकून आणि पाहून त्याला राहवले नाही. ज्यादिवशी सत्कार करायचा दिवस होता त्यादिवशी तो सकाळीच उठला आणि पहिल्या गाडीने सासरवाडीला गेला. सकाळी सकाळी बाबाला पाहून ज्योतीला रडूच कोसळले. ती धावत धावत जाऊन बाबांच्या गळ्यास पडली. बाबांनी तिचे अभिनंदन केले. सोमा त्याची आई, ज्योती आणि तिचे बाबा सर्वजण तयार झाले आणि सत्कार घेण्यासाठी जिल्ह्याला गेले. त्याठिकाणचा सत्कार समारंभ पाहून त्यांच्या डोळ्याचे पारणे फिटले. परत सासरवाडीला जाऊन एक दोन दिवस राहून तेथील पाहुणचार घेऊन सर्व जण गावी परत आले. शाळेला सुरुवात झाली. ज्योती पुढच्या वर्गात गेली होती पण पुढील वर्ग त्या शाळेत नव्हते म्हणून ती टीसी नेण्यासाठी बाबाला घेऊन आली. पण सरांनी आईला बोलावून आणल्याशिवाय टी सी मिळणार नाही असे म्हटल्यामुळे लगेच आईला बोलावून घेतले. शाळेत सरांकडून ज्योतीच्या आई बाबांचा सत्कार करण्यात आला. तेव्हा ज्योतीच्या बाबांनी एकच वाक्य बोलले, " पोरीच्या शाळेने आमचा संसार तारलं " त्यावेळी ज्योती सरांकडे पाहू लागली. सरांना त्यांचा कानमंत्र कामाला आला याचा आनंद वाटत होता.


Rate this content
Log in