जय हनुमान
जय हनुमान
आज हनुमान जयंती... "लाॅक डाऊन" मुळे कुठे देव देव करायला देखील जाता आले नाही. माझ्या कामाच्या रस्त्यामध्ये एक मंदिर आहे तेथे येताना पाया पडायला गेले. दोन-तीनच पुजारी होते. त्यामुळे सोशल डिस्टन्सचा नियम पाळत आत दर्शनाला गेले.
आज सकाळीच लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. माझे वडील खूप पुण्यवान त्यांच्या मांडीवर तीन-तीन देव खेळायचे. वडील विठ्ठल मंदिराचे पुजारी. त्यामुळे पांडुरंगाच्या देवळात "राम जन्म" व्हायचा "कृष्ण जन्म" व्हायचा आणि पाळणा झाल्याबरोबर वडील त्या राम किंवा कृष्णाला मांडीवर घेऊन आंघोळ घालायचे. म्हणजे खरीखुरी अंघोळ नव्हे तर मानस पूजेतील आंघोळ. त्यावेळचा एक अभंग देखील ठरलेला आहे-
न्हाणी न्हाणी
निर्मळ ती न्हाणी
गंगा गोदा
घालीत असे पाणी
वडील बाळाला आंघोळ घालण्याची ॲक्शन करीत असत व नंतर त्याला न्हाऊ माखू घालून पाळण्यात ठेवले जाई. त्यावेळी भजनी मंडळातील एखादा सुरेल आवाजात वरील अभंग म्हणत असे.
<
p>
पण हनुमानजन्माची बातच वेगळी, तो काही पाळण्यात बसला नाही. तर जन्माला आल्याबरोबर एखादे फळ समजून सूर्याला पकडायला गेला. फक्त सातारा जिल्ह्यातील सज्जनगडाच्या पायथ्याशी परळी या गावामध्ये हनुमानाचा जन्म पाळण्यामध्ये होताना बघितला. तो मारुतीदेखील समर्थस्थापित मारुती आहे.
त्यादिवशी इतर दिवसांपेक्षा लवकर उठावे लागे. सुर्योदयाची वेळ पाहून हनुमानाचा जन्म होई. पुढे केव्हातरी थोडं मोठं झाल्यावर आठवणीने हनुमान जन्माच्या दिवशीचा सुर्योदय बघितला त्या दिवशीचा सूर्य आपल्या नजरेला खरोखरी कापलेल्या कलिंगडासारखा वाटतो.
रात्री झोपताना वडिलांना सांगून ठेवलेले असायचे. काका मला उद्या तुमच्याबरोबर उठवा बरं. वडीलही हो म्हणायचे. पण जेव्हा जाग यायची तेव्हा सूर्य उगवलेला असायचा आणि वडिलांच्या मांडीवर तेथे हनुमान खेळत असायचा आणि अभंग चालू असायचा-
न्हाणी न्हाणी
निर्मळ ती न्हाणी
गंगा गोदा
घालीत असे पाणी