Hanamant Padwal

Others

5.0  

Hanamant Padwal

Others

जीवनात श्रमाचे महत्त्व

जीवनात श्रमाचे महत्त्व

3 mins
1.0K


   

हतभर देहाला आणि टिचभर पोटाला जपण्यासाठी रात्रनं दिवस खपणारी माणसं आसपास आपण पाहत असतो. पण खपता खपता समाधान मिळविणारी माणसं विराळच दिसतात. कारण त्यांचं खपणं हे सरळ मार्गाचं नसतं.जीवनाचं सार्थक निव्वळ कष्ट करण्यातच आहे असं नाही. पण हरामाचं खाण्यापेक्षा श्रमातून मिळालेलं धन वा सुख नक्कीच समाधान देतं. भरलेल्या पोटात भर घालण्यात कसला आलाय आनंद. उपाशीपोटाला चटणी भाकरीचाही आधार समाधान देऊन तृप्त करतो. हेच समाधान आणि हिच तृप्ती श्रमातून मिळत असते. पण श्रम हे सरळ मार्गावरलं असलं पाहिजे.पैशाच्या मागं धावणारं श्रम धन देऊन जाईल पण समाधान नाही देणार. आणि या श्रमाला नैतिकता असेलच असंही सांगता येत नाही. परंतु जीवनात श्रमाला महत्व निश्चितच आहे. त्याचं महत्व केवळ सांगून कोणाच्या सहजच लक्षात येईल असं नाही. अनुभवातून श्रमाचं महत्व लक्षात येत असतं.

महात्मा गांधी यांच्या सहवासातील एक युवक गांधीजीना म्हणाला, " बापु, मी भुकेने मरत आहे. मला कोणी नोकरी देत नाही की माझ्या जवळ नोकरी साधनही नाही.. " बापु म्हणाले, " तु मला सांग बघु मुंगी, कातिन, मधमाशी तसेच जंगलातील लाखो जीव कोणत्या कारखान्यांत नोकरी करतात? त्यांच्या जवळ नोकरीचे कोणते साधन आहे?तरीपण

ते काय उपाशी रहातात? "तरुणाला कळले की संपतीची कमतरता नाही, मनाची आहे. त्या दिवसापासून तो परिश्रम करू लागला. खरं पाहिलं तर संधी सर्वांनाच उपलब्ध असते पण ती संधीच आहे याची जाण असणे आवश्यक आहे. माणसं घडतात आणि बिघडतातही, आता तो काळ राहिला नाही की घरामध्ये एक व्यक्ती कमवती आणि बाकी त्याच्या जीवावर जगत असायचे. आनंदात राहत असायचे. दिवस बदलत गेले तद्वतच माणासांच्या उत्तुंग गरजाही वाढल्या आणि त्यातूनच आर्थिक संतुलन बिघडत जावून स्वतःचा खर्च स्वतःला भागवण्यासाठी दमछाक होवू लागली. आणि पैसा हाच भगवान समजून धावणाऱ्या जगात कांहीच्या वाट्याला तर अप्रामाणिकपणे वागल्याशिवाय जगणेच अवघड बनते. अशा परिस्थितीत आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी नव्या पद्धतीने विचार करून शांत चित्ताने उपाय शोधावे लागतील. त्यामुळेच अशांत परिस्थितीतून मार्ग निघेल. रोजच्या जगण्याच्या लढाईत महागाई होऊ शकत नाही.जेवण, आरोग्य, शिक्षण, आतिथ्य, सण समारंभ आदि खर्च कमी होऊ शकत नाही. अशा परिस्थितीत आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एकच उपाय दिसतो की घरातील प्रत्येक समर्थ आणि वयस्कर व्यक्तिने कांही तरी कमाई करावी अर्थात श्रम करावे आणि आता खरं तर तशीच वेळ आली आहे की जेव्हा सर्व कमावतील, तेव्हाच सर्वांचे पोट भरेल.एकाची मिळकत येवढी नसते की सर्वाच्या आवश्यकता व्यवस्थितपणे पूर्ण होऊ शकतील. या संदर्भात श्रमाचे, कष्टाचे महत्व सांगणारी एक छोटी गोष्ट मला आठवतेय, आपल्या आळशी मुलाची वडिलांना सतत काळजी वाटायची की हा कांही कमवत नाही कष्ट करत नाही, कांही श्रम करत नाही. तेव्हा त्यांनी एक शक्कल लढवली की किमान एक रुपया तरी तूला रोज दयावा लागेल. तेव्हाच तुला जेवायला मिळेल. तेव्हा त्या मुलांने काका, मामा मावशी यांच्याकडून एक रुपया आणून वडिलांना दयायचा. वडिल तो रुपया घ्यायचे नि अंगणातील विहिरीत टाकायला लावायचे.असे करत तो मुलगा नातलगाकडून रोज एक रुपया आणायचा, एक दिवस सर्वानीच रुपया देण्यास नकार दिला तेव्हा त्याने मजूरी करुन एक रुपया मिळवला. वडिलांनी नेहमीप्रमाणे तो विहिरीत टाकायला सांगितला. तेव्हा तो चिडून म्हणाला, ' "माझ्या कष्टाचा तो रुपया आहे. मी आज तो मुळीच फेकणार नाही.वाया घालवणार नाही. " वडील आनंदित होऊन म्हणाले, " आज स्वतःच्या कष्टाची कमाई म्हणून तू ती टाकून देत नाहीस. हीच आत्मीयता तुला वाडवडिलांच्या पैशाबद्दल वाटली तर तुझे जीवन सफल होईल. मी पण घाम गाळून तुझ्यासाठी पैसा जमवतो व तू कांही न करता नुसता उडवून टाकत आहेस. त्याचा उपयोग करुन स्वतःच्या पायावर उभा रहा. " मुलाला काय समजायचे ते समजले. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात कष्टाला, श्रमाला खरेच किती महत्व आहे.केवळ स्वावलंबनासाठी महत्व नाही तर आपले स्वस्थ्य आणि आरोग्य योग्य राखण्यासाठी सुध्दा श्रमाचे महत्व आहे. पण आजकाल 'दे रे हरि पलंगावरी ' ही ऐतखाऊ प्रवृती स्वतःसाठी, घरासाठी, परिसर समाज व पर्यायाने देशासाठी घातक अशीच आहे. तेव्हा आपण रमावे कष्टात कारण तेथेच देव, तेथेच शांती आणि तेथेच समाधान आहे. म्हणून कष्टाचे महत्त्व ज्यानी ओळखले त्यांनी म्हंटले आहेच की, " कार्यमग्न हे जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती. "

         


Rate this content
Log in