जेव्हा सारे जग ठप्प होते
जेव्हा सारे जग ठप्प होते


लाॅक डाऊन चा पाचवा दिवस २९ मार्च २०२० प्रिय रोजनिशी आज रविवार दोन दिवसाची जोडून सुट्टी, पण यावेळी कधी कामावर जाऊ असं वाटलं .दोन दिवसात देखील घरात बसून कंटाळा आला .इतरवेळी दोन दिवसाची सुट्टी कमी पडते आणि उद्या कामावर जायचं याचं दुःख होत असतं पण आता वातावरण निर्मिती अशी झालेली आहे की, जळी, स्थळी, काष्टी ,पाषाणी कोरोना चा अदृश्य जंतू दिसू लागलाय, पण मनाला मात्र असं वाटतं की हॉस्पिटलला आपली गरज आहे आपण कामावर गेल पाहिजे. रविवारची रोजनिशी काही फारशी वेगळी नाही. मात्र दूरदर्शनमुळे दिवसातले चार तास छान पैकी भक्तिभावात आणि पॉझिटिव्ह वातावरणामध्ये जातात. दूरदर्शनने 1987 गाजलेल्या दोन्ही मालिका रामायण आणि महाभारत दाखवायला सुरुवात केली आहे. त्यामुळे छान वाटतं, घरातील सगळे मेंबर एकत्र बसून टीव्ही पाहतो , शिवाय आता घरात बसलेल्या आणि इंग्रजी मीडियम मध्ये शिकलेल्या नवीन पिढीला रामायण, महाभारत ही महाकाव्ये माहित तरी होतील. नेहमीप्रमाणे सगळ्यांनी एकत्र मिळून सकाळचा नाश्ता दुपारचे जेवण रात्री हलके-फुलके खिचडीचे जेवण. रोजच्या दैनंदिनीत नावीन्य असं काही नाही दिवसेंदिवस टीव्ही वरचा कोरोना रुग्णांचा वाढता आकडा पाहून मन हवालदिल होते. आपल्या एवढ्या मोठ्या खंडप्राय देशात जर तिसरी स्टेज सुरू झाली तर काय होणार याची भीती देखील वाटते पण, नाही ! ,आमच्या भारतीय माणसांचा मनोनिग्रह चांगला आहे. आणि मला वाटते आपल्या लोकांची इम्युनिटी पाॅवर देखील चांगली असावी त्यामुळे आपल्याकडील डेथ रेट कमी आहे सो मना , बी पॉझिटिव बी हॅपी.