जेव्हा सारे जग ठप्प होते
जेव्हा सारे जग ठप्प होते


प्रिय रोजनिशी,
आज कामावर जायचे होते सकाळी उठून पोळी भाजी करून रोजच्याप्रमाणे बस पकडली. आता बसमध्ये एकदम कडक एन्ट्री आहे. दोन-तीन लोकांचे आयडी असूनदेखील त्यांना खाली उतरवले. कदाचित ते अत्यावश्यक सेवेमध्ये नसतील. कामावरती जी इमारत क्वारंटाईनसाठी दिलेली आहे. तिच्यामध्ये काल 50 संशयित रुग्ण ठेवलेले आहेत.
रस्त्याने प्रवास करताना बरेच दिवस झाले माझ्या निदर्शनास एक गोष्ट आली, ती म्हणजे लॉकडाऊन पाळणाऱ्यांची दोन टोके आहेत. एक गट असा आहे व्यवस्थित कॉम्प्लेक्समध्ये किंवा टाॅवरमध्ये राहतो. हे लोक सगळी काळजी घेतात घराच्या बाहेर पडत नाही सॅनिटायझर वापरतात आणि सर्व नियम पाळतात. त्याविरुद्ध चाळीमध्ये किंवा स्लम एरियात राहणारा एक असा ग्रुप आहे याला कोरोनाबद्दल जराही गांभीर्य नाही.
ते बिनधास्तपणे नाक्यानाक्यावर गप्पा मारत असतात. इकडेतिकडे फिरत असतात. तरुण वर्ग उगाचच टू व्हीलर काढून चकरा मारत असतो. आता ज्यांची घरेच काडेपेटीएवढी असतील आणि घरात सात-आठ माणसे राहत असतील त्यानी काय करावे? एकतर असे पण गरमीचे दिवस सुरू झालेत अशा वेळी बऱ्याच वेळा स्लम एरियामधील मंडळी बागेत किंवा इतरत्र बाहेर असतात. असो.
कामावरती सर्वजण मानसिक तणावाखाली असतात. सर्दी खोकल्याच्या रुग्णांना बाहेर सेंटरला बसूनच पाहतात. प्रत्येक जण आपल्या परीने स्वतःची काळजी घेतो. आम्हाला हॉस्पिटलतर्फे प्रोफिलॅक्सिस ट्रीटमेंट म्हणून हैड्रॉक्सी क्लोरोक्वीन चालू केलेल्या आहेत. एकूण दिवसभरात साठ किलोमीटरचा प्रवास करून आले. घरी आल्यावर एक तास रामायण, एक तास महाभारत, संध्याकाळचा स्वयंपाक, जेवण आणि रोजनिशी...