जेव्हा सारे जग ठप्प होते
जेव्हा सारे जग ठप्प होते


प्रिय रोजीनिशी
आज सुट्टी आहे त्यामुळे आज घरातच आहे. असाही लाॅकडाऊनचा एक फायदा आहे, तो म्हणजे सगळी मंडळी घरात असतात. नाहीतर एरवी आमचा रविवार म्हणजे मी घरात, मिस्टर नाईटला, एक मुलगा घरात, एक सेकंड शिफ्टला नाहीतर, रात्रपाळीला त्यामुळे रविवारी सकाळी पण एकत्र बसून नाश्ता व्हायचा नाही. आज मटकी घालून पोहे केले.
दुपारचं जेवण एकदम "गावरान मेनू "बेसन, भाकरी, मिरचीचा ठेचा असा होता. दुपार वामकुक्षीत जाते. शिवाय चार तासाचा टाईमपास करायला रामायण-महाभारत आहेतच. ते पुन्हापुन्हा बघताना खूप मजा येते, जुन्या दिवसांची आठवण येते त्यावेळी सोबत आई-वडील देखील होते. तसा आमच्या घरात टीव्ही नव्हता, अख्या आळी मध्ये एक ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही तिथे आम्ही आरक्षण करूनच बसायचो. हे सारं महाभारत, ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर पाहिलेल आहे.
संध्याकाळी जरा मी आणि आमचे श्रीमान दोघे मिळून एका छोट्या बाॅलने हॉल मध्ये फुटबॉल खेळलो. तेवढाच व्यायाम देखील झाला नाहीतरी एरवी असा फुटबॉल आम्ही तरी कुठे खेळलो असतो. आता संध्याकाळी नऊ वाजण्याची प्रतीक्षा होती. बरोबर नऊ वाजता सर्व लोकांनी लाईट मालवले आणि मेणबत्ती, पणती, मोबाइल टॉर्च इत्यादी गोष्टी लावल्या. आमचे एक मोठे कॉम्प्लेक्स आहे. लोकांना उत्साह दांडगा लोकांनी "भारत माता की जय" "वंदे मातरम " गो कोरोणा" इत्यादी इत्यादी घोषणा दिल्या शिवाय टाळ्या देखील वाजवल्या घरात राहून राहून लोकांची ऊर्जा खूप साठलेली आहे ती कुठेतरी बाहेर काढायचीच असते. लोकांनी घोषणा देऊन आपली एनर्जी दाखवली. शिवाय त्यातून आपली एकतादेखील दिसली. आपल्या पंतप्रधानांच्या पाठी इतकी सारी जनता आहे, ते घेतील तो निर्णय योग्य असेल असा जनतेला विश्वास आहे हे देखील दिसले. काल आलेले मानसिक टेन्शन आज कुठल्या कुठे पळाले. शिवाय आज अजून एक गोष्ट म्हणजे मोठ्या चिरंजीवांनी चीज मोमो बनवून खायला घातले आज संध्याकाळच्या स्वयंपाकाला मला सुट्टी होती. आजचा दिवस छान गेला.
गुड नाईट