जेव्हा सारे जग ठप्प होते
जेव्हा सारे जग ठप्प होते


लॉक डाऊन चा सतरावा दिवस 10 एप्रिल 2020
प्रिय रोजनिशी,
आज गुड फ्रायडे ची सुट्टी आहे त्यामुळे घरातच आहे.
सकाळी उठून आमच्या ब्रुनोला फिरवून आणले.
सकाळी सकाळी लवकर गेल्यावर पोलीस अडवत नाहीत.
त्यानंतर घरी येऊन रोजची नित्यकर्मे सकाळी ब्रेकफास्ट, दुपारी जेवण, संध्याकाळी हलकी-फुलकी खिचडी.
दिवसभरात एकूण चार तास टीव्ही रामायण-महाभारत
रामायणात आता लंकादहन झाले बिभीषण रामाला येऊन मिळाला.
महाभारतात युधिष्ठिराला युवराज पद देण्यात आले, रुक्मिणी हरणाचा कार्यक्रम झाला .आम्ही व आमचे दोन्ही मुले आवडीने वरील कार्यक्रम बघतो
इकडे लाॅक डाउन तुमच्यासाठी आहे, निसर्गासाठी नाही. निसर्गाने आपलं वसंत ऋतुचे आगमन दर्शवायला सुरुवात केली आहे. बहावे फुलंलेत . कुंपणावर च्या कागदी फुलांना बहर आलाय रंगीबेरंगी पांढरी, गुलाबी, पिवळसर फुललेली फुले दिसतात
बहाव्याच्या झाडाखाली सोनफुलांचा पिवळा जर्द सडा पडलाय.
आमच्या कॉम्प्लेक्समध्ये देखील पिवळ्या फुलांचा सडा पडलाय
गुलमोहर फुललाय. आणि एकमेव झाड आहे नाव माहीत नाही त्याला निळी फुले येतात
कोकीळ कवीने आपला पंचम स्वर लावलाय.
काल आरोग्य मंत्र्यांची राजेश टोपे यांची टीव्हीवर मुलाखत बघितली बहुदा सरकारी बंगला असावा परंतु त्या मुलाखती पेक्षा पाठीमागच्या पक्षांचा किलबिलाट, चिवचिवाट लक्षात राहिलाय. त्यामध्ये कुळव्या पक्षी सतत कुळव, कुळव, कुळव म्हणून ओरडत होता. मधेच पोपटाचा आवाज देखील येत होता.
माणसांच लाॅक डाऊन चाललंय आणि निसर्गाच फुलण सोबत चाललंय.
दुपारच्या वामकुक्षी नंतर थोडेसे योगाचे प्रकार श्वसनाचे प्रकार शाळेतील आठवून आठवून व्यायाम प्रकार केले.
बाकी दिवस ठीक ठीक