जेव्हा सारे जग ठप्प होते
जेव्हा सारे जग ठप्प होते
प्रिय रोजनिशी,
आज आमच्या कामावर कोरोंटाईन केलेल्या पेशंटपैकी एक पेशंट पॉझिटिव आला, आणि सगळ्यांची दाणादाण उडाली. अगदी डॉक्टरांपासून ते वर्ग-4 कर्मचाऱ्यांचे पर्यंत सगळेजण हवालदील झाले. प्रत्येकजण विचार करू लागला अरे मी आत गेलो होतो का? त्यावेळी मी सर्व संरक्षक उपकरणे वापरली का? मी रुग्णांला असाच हात लावलेला आहे का? इत्यादी- इत्यादी तसे डॉक्टर पासून सर्व जण माझ्यापुढे लहानच आहेत. मग त्यांची समजूत घातली काही मंडळी तर रडायलाच लागली, की आमची मुलं लहान आहेत,
माझ्या नवऱ्याला इन्फेक्शन होईल, माझ्या मुलीला इन्फेक्शन होईल शेवटी मी वैतागले "अरे! म्हटलं तुम्ही तर असं वागताय जसा काय यमराज तुमच्यापुढे आता उभा आहे आणि तुम्हाला न्यायलाच आलाय !शांत बसा सगळे जण, आणि एकदम बी पॉझिटिव रहा. सकारात्मक दृष्टिकोन ठेवा यातून लगेच काही मला इन्फेक्शन होणार नाही असा विचार करा
"भगवान ने जितनी साॅसें दि है वो पुरी होने के पहले तुम्हे कोई नही उठा सकता! 2/4 तास तर त्या टेन्शन मध्ये गेले. मग जी रुग्ण पॉझिटिव आली तिला मोठ्या हॉस्पिटलला पाठवले. सर्व ठिकाणी इन्फॉर्म केले. त्याचे पण एक वेगळे प्रोसिजर आहे फक्त कोरोणा लोकांसाठी एक वेगळे 108 अॅबुलान्स आहे. इतर गाड्यांमध्ये सदर रुग्णाला नेत नाहीत. इतकेच काय त्यांचा कचरा देखील वेगळ्या गाडीने नेला जातो. त्याचा चार्ज देखील जास्त आहे. लोकांना घराच्या बाहेर पडताना टेन्शन असते पण आमच्या मेडिकल स्टाफला घरी जाताना टेन्शन असते की, आपल्या मुळे आपल्या घरच्या मंडळींना हा त्रास होऊ नये. आज मी देखील घरी येताना टेन्शनमध्ये होते.
घरी आल्या आल्या सगळे कपडे साबण आणि डेटाॅलमध्ये बुडवून ठेवले .अगदी छोट्या-मोठ्या वस्तू चष्मा, मोबाईल, घड्याळ, इत्यादी वस्तूदेखील निर्जंतुक केल्या. त्याच्यावरती स्प्रे मारला, आंघोळ केली आणि मग घरात शिरले त्यामुळे आज घरी आल्यावर थकल्यासारखे झाले होते असो.
बाकी रुटीन डे टुडेचे सारखेच सकाळ, संध्याकाळचा स्वयंपाक. साठ किलोमीटरचा प्रवास, देवाजीचे नामस्मरण इत्यादी इत्यादी.
गुड नाईट