हुशार चिमणा
हुशार चिमणा


एकदा एक चिमणा-चिमणी,
राही जसे राजा-राणी,
त्यांची पिल्ले मोठी शहाणी!
चिमणा गेला गावी,
चिमणी पिल्लांना भरवी,
इतक्यात आली चेटकी
तिने वाजवली चुटकी!
चुटकी वाजवताच चिमणी मेली,
पिल्ले बिचारी रडू लागली!
इतक्यात आपला चिमणा,
खात आला चणा-फुटाणा,
पिल्लांनी सांगितली कहाणी
चिमणा चिडला, 'करतो चटणी!'
घेतली लाकडाची गाडी,
जोडली बोकडांची जोडी,
वाटेत भेटले फुटाणे,
म्हणाले, 'कुठे चाललात शहाणे?'
चिमणा म्हणाला, ‘लाकडे की गाडी है,
बोकडोंकी जोडी है,
चेटकीने चिडी मारी,
झगडे को जाता है!’
'मी येणार', म्हणाले फुटाणे,
गाऊ लागले स्फुर्ती गाणे!
मग भेटला एक मोठा विंचू
म्हणे, खाऊ, गिळू की चाऊ?
चिमणा म्हणाला, चल बरोबर,
शोधतो आहे चेटकी घरोघर!
भेटला त्यांना वाटेत वरवंटा,
त्याच्यासोबत होता सोटा,
मग भेटली एक छोटी सुई,
म्हणाली मी फार लहान बाई!
भेटला त्यांना एक वाघ
म्हणाला, आवडते मला बाग!
सर्वांनी मिळून रचला कट,
चेटकी त्याने मेली झटपट!
डोक्यात पडला वरवंटा,
मारू लागला तिला सोटा!
सुई लपली पलंगात,
विंचू लपला बाटलीत,
फुटाणे लपले विस्तवात,
अन् वाघ लपला बागेत!
सुई तिला टोचली,
विंचवाने नांगी बोचली,
फुटाणे उडाले तडातड,
वाघाने खाल्ले कडाकड!
आनंदी आनंद झाला,
चेटकीला धडा मिळाला!