नासा येवतीकर

Others

2  

नासा येवतीकर

Others

हरवलेले डोळे

हरवलेले डोळे

3 mins
307


प्रिय रोजनिशी,


शालेय जीवन संपले न् संपले अन् कॉलेजच्‍या वेगळ्या दुनियेत मन रमून गेलं. गावापासून जवळपास पन्‍नास कि.मी. वर जिल्‍ह्याच्‍या ठिकाणी कॉलेज जवळच रेल्‍वेस्‍थानक असल्‍यामुळे रोज रेल्‍वेचा प्रवास ठरलेलाच. रोज सकाळी लोकलने जाणे आणि लोकलने येण्‍याचा नित्‍यक्रम. त्‍यामुळे रेल्‍वेत ब-याच लोकांशी संबंध यायचा; परंतु तेवढ्याच गाडीतल्‍या डब्‍यापुरते.


मी विज्ञान शाखेचा विद्यार्थी असल्‍यामुळे खूप अभ्‍यास करणे आणि आपले ठरवलेले ध्‍येय गाठणे एवढेच माझे लक्ष्‍य होते. त्‍यामुळे रेल्‍वेत मिळालेल्‍या फावल्‍या वेळेचा सदुपयोग करताना पुस्‍तकातील महत्‍वाच्‍या ओळी अधोरेखित करून घरी त्‍याची टिपण तयार करायची.


तारूण्‍य आणि कॉलेजचे जीवन हे दोन्‍ही पण एकमेकांच्‍या हातात हात घालून येतात. त्‍यामुळे कॉलेजातील मुलांकडे समाज एका वेगळ्या नजरेतून पाहत असतो. कॉलेजची पोरं म्‍हणजे शिकणे कमी आणि पोरीच्‍या मागे धावणे जास्‍त. योग्‍य त्‍या वयात योग्‍य ते कार्य वयाला साजेसे करणे यालाच तर प्र.के.अत्रे यांनी जीवन म्‍हटले आहे.


म्‍हातारपणी प्रेम करणे जमत नाही तसे तारूण्‍यात शहाणपणाच्‍या गोष्‍टी समाजाला रूचत नाही. खूप शहाणा झालास हे वाक्‍य हमखास ऐकायला मिळते. जर तारूण्‍यात शहाणपणा दाखवला तर! प्रत्‍येक मुलगा तरूण मुलगी दिसली की शायनिंग मारतो, आपल्‍याकडे आकर्षित करून घेण्‍याचा सर्वतोपरी प्रयत्‍न करतो. हा त्‍याचा दोष नसून तो तारूण्‍याचा आहे.


तसे आमचे मित्रमंडळी रेल्‍वेत एखादं पाखरू (कॉलेज विश्‍वात सुंदर मुलींना पाखरू म्‍हणत) दिसते का? म्‍हणून प्रत्‍येक पाखरू असेल त्‍या ठिकाणी घुटमळत राहात. मला सोबत नेण्‍याचा त्‍यांचा हेका रोजच असे. मात्र माझे उत्‍तर ठरलेले, “तुम्‍ही शोधून या तोवर मी येथेच बसतो.” पुस्‍तकी कीडा म्‍हणून डिवचत सारे मित्र पाखराच्‍या शोधार्थ डबा न् डबा फिरत असत.


दिवस मजेत जात होते. हळूहळू अंतिम परीक्षेची तारीख जवळ येत चालली तसा एकाकी होऊ लागलो. सराव परीक्षा सुरू झाली. त्‍या दिवशी गणिताचा दुसरा पेपर होता. मला तो विषय कठीण असल्‍यामुळे सोबत आणलेल्या नोटस् काढून रेल्‍वेत चाळत बसलो. त्‍या डब्‍यात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे लोक होते. सर्वांवर एक नजर टाकली आणि अभ्‍यासाला लागलो.


माझ्या अगदी समोर एक पडदानशीन महिला होती. तिचे फक्‍त डोळे तेवढे दिसत होते. तिच्‍या आजुबाजूला कदातिच तिचे आई-वडील बसले होते. पंधरा-वीस मिनिटांच्‍या प्रवासानंतर मी एकटक त्‍या महिलेकडे पाहिलं. तिच्‍या डोळ्यात मला करूणा, कीव जाणवली. तेव्‍हा तिच्‍या आजुबाजूला बसलेल्‍या दोघांचे निरीक्षण केले असता ते दोघे कदाचित मुस्लिम धर्मीय जाणवत होते.


परीक्षा असल्‍यामुळे ते सर्व विचार बाजूला सारून परत अभ्‍यासाकडे डोळे वळविले, पण का? कोण जाणे? वाचनात लक्षच लागत नव्‍हते. परत एकदा त्‍या महिलेकडे पाहिले तेव्‍हा तिचे डोळे अश्रुंनी पाणावलेले दिसले. ती का रडत होती? तिचे ते दोघे खरेच आई-वडील किंवा नातलग असतील काय? अशा नाना शंका मनात आल्‍या; पण करावे तरी काय? विचार करता करता माझं कॉलेजचं स्‍टेशन आलं. तसं त्‍या गावात ते तिघेपण उतरले.


परीक्षेची वेळ जवळ येत होती. यांचा पाठलाग करावा तर परीक्षा बुडेल! त्‍यांच्‍यामागे मागे ऑटो स्‍टँण्‍डपर्यंत गेलो; परंतु ते कोठे चालले याचा पत्‍ता लागला नाही. ती ऑटो भुर्रकन निघून गेली. मी तसाच त्‍या पाणावलेल्‍या डोळ्यांचा विचार करीत कॉलेजकडे चालू लागलो. त्‍या दिवशी परीक्षेचा पेपर जेमतेम गेला.


परीक्षा लवकर संपल्‍यामुळे सायंकाळच्‍या ऐवजी दुपारच्‍या गाडीने निघालो. मनाने हताश झालेलो. स्‍टेशनवर आलो आणि मनातील मरगळ दूर करण्‍यासाठी डबे फिरू लागलो. या डब्‍यातून त्‍या डब्‍यात फेरफटका मारताना त्‍या पडदानशीन सोबत असलेले ते दोघे मला दिसले; परंतु त्‍यांच्‍यासोबत ते डोळे दिसले नाहीत. आता मात्र माझं मन संशयाच्‍या खाईत पडलं.


काय केलं असेल या दोघांनी तिच्‍यासोबत. हे जर आई-वडील किंवा नातलग असतील तर तिच्‍या डोळ्यांत अश्रू का आले? त्‍याच तंद्रीत माझं गाव आलं, मी उतरलो. गाडी दोन शिट्या वाजवून निघून गेली. मी मात्र एकसारखा त्‍या धावत्‍या गाडीकडे पाहत राहिलो. मी त्‍या असहाय महिलेला मदत करू शकलो नाही याची खंत मला वाटत राहिली. एकन्एक दिवस ते हरवलेले डोळे मिळतील काय? या प्रतीक्षेत अजूनही रेल्‍वेचा प्रवास नित्‍य नियमाने लोकल टू लोकल चालूच आहे.


Rate this content
Log in