हाडाची शिक्षिका
हाडाची शिक्षिका


जीवनात संकट येत असतात पण त्यांना घाबरून पळून जायचं नसतं. येणारं प्रत्येक संकट आपल्याला नवीन काहीतरी शिकवतं असतं. काही अनुभव देत असतं. संकट आले की त्याला धैर्याने तोंड द्यावं. असं बालपणापासून आम्हांला शिकवत असणार्या आणि प्रत्यक्ष कृतीत आणणार्या राधाबाई म्हणजे एक विलक्षण रसायन आहे. राधाबाई सदाशिवराव साठे असं त्याचं पुर्ण नाव. राधाबाई म्हणजे उत्साहाचं मूर्तिमंत प्रतीक.
राधाबाई म्हणजे आमच्या नूतन मराठी विद्यालय या शाळेत गणिताचे अध्यापन करणार्या एक उत्कृष्ट शिक्षिका. गणिताची सुत्र आणि त्यावर आधारित उदाहरणे शिकवावी ती राधाबाईनी. राधाबाई गणित शिकवणारं म्हटल्यावर आम्हा मुलांना एक वेगळा आनंद व्हायचा. गणित कठीण नसतं आपल्या मनात ते कठीण आहे असं वाटतं हे त्या आम्हांला वेळोवेळी सांगत असायच्या. वर्गात त्या गणितीय क्रिया समरसून शिकवायच्या. एका पद्धतीने उदाहरण समजलं नाही तर दुसर्या पद्धतीने समजून सांगायच्या, जोपर्यंत आम्हांला ते उदाहरण समजत नाही तोपर्यंत त्या काही आमचा पिच्छा सोडत नव्हत्या.
राधाबाईंचा गणित शिकवण्यातला हातखंडा ज्ञात असल्यामुळे आणि त्यांच्या प्रेमळ वागणुकीमुळे त्या आम्हा सर्व मुला मुलींमध्ये लोकप्रिय होत्या. आमची काही समस्या असली तरी ती समजून घेऊन त्यातून मार्ग काढायचा त्या प्रयत्न करायच्या. शाळेची सहल, स्नेह संमेलन अशा कितीतरी कार्यक्रमात त्या उत्साहाने काम करायच्या. सहल, स्नेह संमेलन यात आम्ही सहभागी व्हावे म्हणून प्रोत्साहन द्यायच्या.
सर्व काही सुरळीत चालू होते. आम्ही त्यावर्षी दहावीत होतो. राधाबाईंनी दहावीचे गणित चांगल्या प्रकारे समजावले होते. अभ्यासक्रम पुर्ण केला. पण राधाबाई वरचेवर आजारी राहू लागल्या. त्यांच्या पाठीत चमक यायची आणि त्यांना इतका त्रास व्हायचा की त्याचे वर्णन करणे शक्य नाही. अशा परिस्थितीतही त्या आमचे नुकसान होवू नये म्हणून रजा न घेता शाळेत येत होत्या. राधाबाईंचे दुखणे खुपचं वाढले होते. आता त्यांना शाळेत येणे शक्य नव्हते. डॉक्टरांनी त्यांना पाठीचे ऑपरेशन करायला लावले. ऑपरेशन झाल्यावर एक दोन दिवसांनी आम्ही त्यांना भेटायला गेलो आणि जे पाहिले त्यावर आमचा विश्वास बसत नव्हता. कारण राधाबाई चक्क दवाखान्यात आराम न करता काहीतरी लेखन करत होत्या. आम्हांला पाहिल्यावर त्यांना आनंद झाला आणि म्हणाल्या अरे तुमचं दहावीच्या गणिताचा तुम्हाला जास्तीत जास्त सराव करता यावा म्हणून प्रश्नपत्रिका काढत होते.खरचं स्वतःचे दुःख बाजुला ठेवून आमच्या हितासाठी धडपड करणार्या राधाबाईंना थॅक्स म्हणावे तरी कसे त्यांचे हे काम थॅक्स या शब्दापलिकडचे आहे.