नासा येवतीकर

Others

2.5  

नासा येवतीकर

Others

गोष्ट एका आंबेगावाची

गोष्ट एका आंबेगावाची

5 mins
2.2K


मोहन आज पाच वर्षानंतर मामाच्या गावाला जायला मिळणार म्हणून फारच खुशीत होता. त्यापूर्वी तो उन्हाळी सुट्टीत दरवर्षीच जायचा. पण मोहनच्या वडिलांची बदली जिल्ह्याच्या ठिकाणी झाल्यापासून तो मामाच्या गावाला गेला नव्हता. त्याची दहावीची परीक्षा नुकतीच संपलेली होती. पण लहान बहीण नीताच्या परिक्षेमुळे तो अडकून पडला होता. नीता यावर्षी सातवीला होती. सुमारे पाच वर्षांपूर्वी म्हणजे पाचवीला असतांना त्याला मामाच्या गावी जायला मिळाले होते. त्यानंतर तो आज मामाच्या गावी जाणार होता आणि सोबत त्याची आई आणि बहीण नीता दोघे जण होते. सकाळी पहिल्या गाडीला जाण्यासाठी ते तिघे घराबाहेर पडले. आंबेगावला जाणारी बस फलाट क्रमांक चार वर लागली होती. मोहन आता हुशार झाला होता कारण बस मध्ये दस्ती ( रुमाल ) टाकून सीट राखीव करण्याचे काम आज त्याने केलं होतं. तिघेही बसमध्ये चढले. खिडकीला बसण्यावरून मोहन आणि नीता यांच्यात वाद सुरू झाला. पण आईने मध्यस्थी करून शेवटी नीताला खिडकीला बसविले, आई मध्ये बसली आणि मोहन बाजूला हिरमुसला होऊन बसला. आज त्याने सीट धरून देखील त्याला खिडकी मिळाली नाही याचा राग आला होता. बस सुरू झाली तशी त्याचा राग देखील निवळला. बस ज्या वेगाने मामाच्या गावाच्या दिशेने धावू लागली त्याच वेगात मोहनचे मन देखील मामाच्या गावाच्या दिशेने धावू लागलं. मामाचं गाव आंबेगाव म्हणजे खरोखरच त्या गावात खूप आंबे पिकायचे. प्रत्येकांच्या शेतात एक तरी आंब्याचे झाड होते. उन्हाळ्यात मामाच्या गावात खूप आंबे खाण्यात यायचे. आंबे ते ही खूपच गोड. मोहनला आंबे खूपच आवडायचे. आंबे खाण्यासाठीच तो मामाच्या गावी जाण्याचा हट्ट धरायचा. मामाचे शेत त्यांच्या घरापासून फार दूर नव्हते. सकाळी जेवण झाले की, मामा-मामी मामेभाऊ सुरेश, त्याचा मित्र सचिन, सोहेल, भूषण आणि मामे बहीण राणी हे सारे जण त्या शेतातल्या आंब्याच्या झाडाखाली एकत्र यायचे. मामा-मामी शेतात ऊन होण्याच्या अगोदर थोडे काम करायचे आणि दुपारच्या वेळी झाडाखाली येऊन बसायचे. दुपारचं जेवण देखील त्याच झाडाखाली होत असे. हे सारे चित्र त्याला जशास तसे दिसू लागले होते. त्याच शेतात पलीकडे चिंचेचे मोठे झाड होते. आंब्यासोबत चिंचादेखील खाण्याची मजा यायची. लांबुळी चिंच आठवताच मोहनच्या तोंडाला पाणी सुटलं होतं. चिंचेच्या झाडाला लागून एक लिंबाचे झाड होते. त्या झाडाखाली सुरेश आणि त्यांच्या मित्रांसोबत मोहन देखील खेळ खेळायचा. गोट्या खेळण्याचा डाव खूप रंगत असे. मोहनचा राजा राणी हा गोट्याचा आवडता खेळ होता. दूर दुरून गोट्या नेमाने उडवण्यात मोहन तरबेज होता. आंब्याच्या कोयीचे ही खेळ खेळायचे. सोमवार-मंगळवार खेळ खेळताना खूपच मजा यायची. पकडम पकडाईचा खेळ संपला की ते सर्वजण सूरपारंब्याचा खेळ खेळायचे. राणी आणि नीता दुरून त्यांचा खेळ पाहत बसत. शेतात झाडांची संख्या भरपूर होती त्यामुळे ऊन कुठे जाणवतच नव्हतं. दुपार झाली की मग थोडंस काही तरी खायचे. मामी सर्वांची आवडती उडदाची दाळ आणि भाकर आणायची. सर्वजण छान पैकी जेवण झाल्यावर त्यांच्या गप्पा रंगायच्या. मामाच्या शेताजवळून एक हायवेचा रस्ता गेलेला होता. त्यामुळे सर्व मुले रस्त्यावरील गाड्या पाहून उड्या मारत असे. सोहेल नावाचा मित्र प्रत्येक गाड्याचे नाव ओळखण्यात खूपच हुशार होता. प्रत्येक गाडीची तो माहिती देत असे. मोहनला राहून राहून सोहेलचे आश्चर्य वाटायचे. एवढी माहिती त्याने कशी गोळा केली ? याचा तो विचार करत असे. यातच सायंकाळ केंव्हा व्हायची काही पत्ता लागायचा नाही. सूर्य अस्ताला जाऊ लागला की सारे जण आनंदाने नाचत नाचत घरी परतत असे. मामाचं घर काही मोठं नव्हतं मात्र अंगण खूप मोठं होतं. रात्रीचे जेवण उरकले की, सारे जण त्या अंगणात शुभ्र चांदण्याच्या प्रकाशात गप्पा, गाणी गोष्टी करत झोपी जात असत. याच विचारांच्या तंद्रीत मामाचे गाव कधी आले मोहनला कळालेच नाही. आईने त्याला हलवून जागे केले, मोहन, चल आंबेगाव आलं. हे ऐकून मोहन जागे झाला आणि बसच्या खाली उतरला. दुपार झाली होती. बसमधून उतरल्या बरोबर मोहन सभोवती नजर फिरवली. पाच वर्षांपूर्वीचा आंबेगाव त्याला कुठेच दिसत नव्हते. ज्या झाडाखाली बस थांबत होती ते झाड दिसत नव्हते. तो आईला म्हणाला, आई हे मामाचं गाव नव्हे, हे बघ इथे ते मोठं झाडच नाही जेथे बस थांबते. यावर मोहनची आई त्याला समजावून सांगितली की, हेच मामाचे गाव आहे. ते झाड आत्ता राहिलं नाही. इथे बसस्थानक होणार आहे म्हणून त्याला तोडलं, चल आत्ता. रस्त्याने जातांना मोहनला उन्हाचे चटके जाणवत होते. लहान असताना मामाच्या गावात कधीच एवढं ऊन लागलं नाही असे मनात विचार करू लागला. मामाचं घर बसस्थानकाच्या जवळच होतं. पाच एक मिनिटांत मामाच्या घराजवळ आले. मामाचे ते छोटेसे घर आत्ता वाढलं होतं. समोरच्या अंगणात टिन शेड टाकून मामाने घराचा विस्तार केला होता. रात्रीला चांदण्याच्या शुभ्र प्रकाशात झोपण्याचा मोहनचा मोह आत्ता पूर्ण होणार नव्हता. आंबेगावात पूर्ण बदल झाल्यासारखा वाटत होता. मोहनला कधी एकदा शेतात जाऊ असे वाटत होते. हात-पाय धुण्यासाठी न्हाणीघरात गेला तर तेथे दोन-तीन बकीट पाणी शिल्लक होतं. मामी स्वयंपाक घरातून आवाज दिली. आज नळाला पाणीच आलं नाही. कमी पाण्यात हात-पाय धुवा. मोहनला कसं तरी वाटलं. पाच वर्षांपूर्वी दोन-दोन बकीट भरून पाण्याने अंघोळ करायचो तर आज हात-पाय धुवायला पाणी नाही. कसे तरी हात-पाय धुवून घरात आल्याबरोबर मोहनने सुरेशला घेतलं आणि शेताकडे जाण्यास निघाला. मामीने अरे थांब म्हटल्यापर्यंत ते घराच्या बाहेर पडले होते. सुरेशचे मित्र बरेच जण बाहेरगावी शिकायला गेले होते. फक्त एक सोहेल तेवढा घरी होता. त्यालाही सोबत घेतले आणि तिघेजण शेतात गेले. शेतात गेल्यावर मोहनने जे चित्र पाहिले ते पाहून त्याला रडायलाच कोसळले. शेतात सर्वत्र ऊन म्हणजे ऊन, तेही रखरखतं ऊन एवढंच दिसत होतं. त्या शेतात आंब्याचे, चिंचाचे आणि लिंबाचे कोणतेच झाड दिसत नव्हते. शेताचा आकार देखील खूप कमी झाला होता. शेताच्या बाजूने जो हायवे रस्ता होता तो मात्र पूर्वीपेक्षा खूप मोठा झाला होता. एका वेळी चार वाहने जातील एवढा मोठा झाला होता. हे सारं पाहून तो खूप नाराज झाला. हिरमुसला चेहरा घेऊन तो मामाच्या घरी परत आला. त्याला कशात ही मन रमेना. सायंकाळी जेवताना त्याने मामाला याचे कारण विचारले असता मामा म्हणाला, शेताच्या बाजूने सरकारने मोठा हायवे रस्ता काढला, ज्यात आपली अर्धी शेती गेली. त्या अर्ध्या शेतात आंब्याची, चिंचाची, लिंबाची आणि इतर सर्व झाडे गेली. त्याच्या बदल्यात आम्हाला सरकारने पाच लाख रुपये दिले. त्या रस्तावरील अनेकांच्या शेतातील झाडे तोडली गेली. आता आमचे गाव आंबेगाव म्हणण्यासारखे नाही असे म्हणून मामा देखील नाराज झाला. ती सर्व कहाणी ऐकून मोहन खूप नाराज झाला. रात्री त्याला काही केल्या झोप येत नव्हती. शेवटी मनात एक विचार करून झोपी गेला. सकाळ झाली. मोहनने सुरेशला कानात काही तरी सांगितलं. तसे सुरेशनी तयारी केली. कुदळ आणि फावडे घेऊन मोहन, सुरेश आणि सोहेल शेतात गेले. शेतात दहा-वीस खड्डे केली आणि त्या दहा-वीस खड्यात आंब्याची कोय टाकून ठेवली. सुरेश आणि सोहेलला काळजी घेण्याविषयी सुचविले. दहा-पंधरा दिवसांनी मोहन आपल्या गावी परत आला. पावसाळा सुरू झाला. श्रावण महिन्यात जोरदार पाऊस झाला. असेच एके दिवशी पोस्टमन मोहनच्या घरी एक पत्र घेऊन आला. ते पत्र सुरेशचे होतं, त्यात त्यानं लिहिलं होतं की, सर्वच खड्यातून आंब्याची रोपे बाहेर आली. त्याला काटेरी कुंपण करण्यात आले आहे. मोहनला त्याचे पत्र वाचून खूप आनंद झाला. मग त्याने सुरेशला पत्र लिहिलं, 

प्रिय मित्र सुरेश,

आंब्याची रोपे बाहेर आली हे वाचून खूप आनंद झाला. त्या झाडांची नीट काळजी घे. पावसाळा संपल्यावर रोज त्याला पाणी घाल. मला परत तुझ्या घरी खूप खूप आंबे खायची आहेत. परत एकदा आपलं गाव आंबेगाव करायचं आहे, हे ध्यानात ठेव. मी परत येणार आहे उन्हाळी सुट्टीत. सोहेलला माझा नमस्कार सांग आणि मामा-मामीला साष्टांग दंडवत. 


तुझाच मित्र 

मोहन


पत्र घेऊन तो पोस्टात गेला आणि पोस्टाच्या डब्यात तो पत्र टाकल्यावर खूप आनंदी मनाने घरी परतला. Rate this content
Log in