Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.
Best summer trip for children is with a good book! Click & use coupon code SUMM100 for Rs.100 off on StoryMirror children books.

Avanee Gokhale-Tekale

Others


2  

Avanee Gokhale-Tekale

Others


गंधाली… गंधाच्या प्रतीक्षेत ती

गंधाली… गंधाच्या प्रतीक्षेत ती

2 mins 562 2 mins 562

ती फक्त पळते.. पायाला भिंगरी लावून.. डोक्यावर फुलाची पाटी घेऊन.. या ट्रेन मधून त्या ट्रेन मध्ये.. तिच्या पाटीतले रंग मोहक.. तिच्या पाटीतले गंध मोहक.. पण आत्ता तिच्या पर्यंत ते पोचत आहेत का नाहीत माहीत नाही.. ती फक्त पळते.. पायाला भिंगरी लावून.. 

ट्रेन च्या गर्दीत माणसांच्या घामाचे वास घेऊन पिचलेले चेहरे आणि त्यांच्या कपाळावरची आठी सपाट होते जेव्हा ती धावत पळत त्या डब्यात शिरते.. ती फुलाची पाटी बघून कोणी मोहरते.. कोणी फुलते.. कोणी उमलते.. कोणी आठवते.. कोणी स्वप्नाळते.. कोणी गंधाळते.. पण ती.. ती फक्त गंध विकते.. ती हसऱ्या चेहऱ्याने पैसे घेते.. बटव्यात टाकते आणि पुढच्या स्टेशन ला पळत खाली उतरते.. पलीकडे प्लॅटफॉर्म बदलून दुसऱ्या ट्रेन मध्ये चढते.. ती फक्त पळते.. 

तिनी कधी नशिबाला दोष नाही दिला.. तिनी कधी आत्महत्येचा प्रयत्न नाही केला.. तिनी कधी भीक मागायला हात नाही पसरले.. तिनी शाळेचा चेहरा नसेल बघितला पण या जगाने खूप शिकवले तिला.. तिला जेवढी माणसं कळतात तेवढी आपल्यालाही नाही कळणार.. तिला नाही कळत women empowerment चा अर्थ.. पण तिला आपल्या डोक्यावरची पाटी कशी सांभाळायची ते कळत.. तिला child labour चा अर्थ नाही कळत.. पण आपलं पोट कसं भरायचं एवढं कळत.. तिला abuse शब्दाचा अर्थ नाही कळत.. पण कोणी पैसे देताना हात दाबायचा प्रयत्न केला तर त्याला गुलाब देता देता काटा कसा रुतावायचा हे तिला अचूक कळत.. ती आक्रोश करत बसत नाही.. चिडत नाही.. रडत नाही.. नियतीने तिच्या डोळ्यातलं पाणी कधीच अटवल आहे.. पण तरीही तिच्या चेहऱ्यावर निरागस हसू अजून टिकून आहे.. उमलत जाणाऱ्या कळी प्रमाणे.. मार्ग काढत राहते.. पुढे जात राहते.. पळत राहते.. पायाला भिंगरी लावून.. 

ती रोज दिसते.. तिच्या केसात कधीच नाही पाहिले एखादे फूल लावलेले.. एका फुलाची किंमत तिच्याएवढी कोणाला कळणार.. ते विकत घेण्याएवढा तिचा बटवा अजून उबदार नाही झाला.. ती रोज पळते.. गंध विकते.. पण गंधाच्या दुनियेत राहूनही गंधाच्या प्रतीक्षेत आहे ती.. तिच्या मनात एकच स्वप्न छोटंसं.. जे पूर्ण होण्यासाठी धावत आहे ती.. 

"एक दिवस आपणही एक फूल विकत घेऊन केसात माळावं.. तोऱ्यात मिरवावं.. उगाच गालात हसावं.. थोडंसं मोहरावं.. थोडंसं फुलावं.. थोडंसं झुलावं.. थोडंसं गंधाळावं.. आपल्या पैशानी एक फूल विकत घ्यावं.. हक्काचं"

हे स्वप्न मनात घेऊन ती फक्त पळते.. पायाला भिंगरी लावून.. डोक्यावर फुलाची पाटी घेऊन.. या ट्रेन मधून त्या ट्रेन मध्ये.. तिच्या पाटीमधले रंग मोहक.. गंध मोहक… पण आत्ता तिच्या पर्यंत ते पोचत आहेत का नाहीत माहित नाही.. ती फक्त पळते.. पायाला भिंगरी लावून..


Rate this content
Log in